हौस ऑफ बांबू : मोर, मोर, वन्समोर..!

नअस्कार! मुलांनो, आज शिकायचं की गोष्ट सांगायची?...गोष्ट? बऽऽरं…कुमार गण्या, दार लावून घे बरं वर्गाचं. मोठे सर आले तर म्हंटील, शिक्वायचं सोडून तुम्ही गोष्टी कसल्या सांगताय लहान मुलांच्या?
Hous of Bamboo
Hous of Bamboosakal
Updated on

नअस्कार! मुलांनो, आज शिकायचं की गोष्ट सांगायची?...गोष्ट? बऽऽरं…कुमार गण्या, दार लावून घे बरं वर्गाचं. मोठे सर आले तर म्हंटील, शिक्वायचं सोडून तुम्ही गोष्टी कसल्या सांगताय लहान मुलांच्या? तर ऐका! एकदा काय झालं की जंगलात एक मैफल ठरली. आता मैफल कसली असणार? गाण्याची? गण्या, मारीन हां…गटारी हे काय उत्तर झालं का? तुझी तक्रारच करायला हवी. गटारी म्हणे!

तर मुलांनो, मैफल होती गाण्याची. गाणी आवडतात ना तुम्हाला प्राण्यांची?

तशीच ही कविता-कम-गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी…पूर्वीच्या काळी म्हंजे जुन्या काळी हं…पूर्वी म्हंजे ती भाव्यांची पूर्वी नव्हे. ‘लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना, खरं म्हणा, खोटं म्हणा, तिथं येती रोगी नाना’ असं गाणं होतं तेव्हा. सुधीर फडके म्हणून होते, त्यांनी म्हटलं होतं, नि कुणीतरी गदिमा होते, त्यांनी हे गाणं लिहिलं होतं. होतं सो-सोच. पण तेव्हा लोकांना भारी आवडत असे.

तसंच आणखी एक बंडल गाणं होतं. ‘शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा’ असं काहीतरी होतं. हे का लहान मुलांचं गाणं आहे? हे तर शतप्रतिशत पोलिटिकल गीत आहे. पण तरीही गाजलं. त्यापेक्षा आपल्या पहिलीच्या पुस्तकातली कविता किती छॉऽऽन आहे.

जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल

अस्वल म्हणालं, ही तर हत्तीची अक्कल

…किती अप्रतिम रुपक आहे हे! मैफल ठरली जंगलात, पण ती नुसती गाण्याची नाही, नाचही होता. हत्तीला नाचात भयंकर इंटरेस असणार!! स्वत: बोजड, कंबर हलवता येत नै धड, आणि निघाला नाचायला. ही आयडिया अस्वलानं ओळखलीन. अस्वल खूप हुशार असतं हं. गुदगुल्या करुन मारतं. प्राणी हसत हसत मरतो. गुदगुल्या करुन कोण मारतं हल्ली? हो की नै?

पुढच्या ओळी बघा -

तबल्यावर होती कोल्होबाची साथ

वाघोबा म्हणाले, नाही ना बात?

पेटी मी वाजवतो किती सुंदर

हसत हसत म्हणाले साळिंदर

…व्वा! कोल्हा तबल्याची साथ करतोय, पण सम गाठताना घोटाळे करतोय. त्याला वाघोबानी नंतर धाधिंधिंधा धुतला असणार!! पेटी वाजवणाऱ्या साळिंदराला अस्वलानं गाठलं असणार की नाही? त्याशिवाय ते कशाला हसेल? यानंतर मग गुंडु-पांडु नावाचे लांडगे आले, आणि तंबोरे वाजवू लागले. यमक तर छान जुळवलंय, पण नशीब गुंडुपांडुचं यमक नाही जुळवलंन!!

लांडगेच ते, त्यांची अशीच नावं असणार म्हणा. मग चिकीमिकी नावाचे दोन माऊस आले. माऊस म्हणजे काय मुलांनोऽऽ…उंदिऽऽर! करेक्ट!! ते संतुर वाजवू लागले कारण त्यांच्या संतुर मम्मीनं त्यांना तेच वाद्य शिकवलं होतं. सगळ्यात शेवटी नाचत आला मोर, तेव्हा काय घडलं? वन्समोर, वन्समोर झाला शोर!!

मोर हा तर जंगलातला प्रोफेशनल डान्सरच आहे. बाकी कुठलाही प्राणी किंवा पक्षी डान्सबिन्स करत नाही. मोर आल्यामुळे सगळ्यांनी वन्समोअर दिला ते ऑबव्हिअस नाही का? फक्त वाघोबांनी दिला नाही. का सांगा मुलांनो?

चूक…मोरानं

विंगेतून एण्ट्री घेतली, तेव्हा वाघोबा

स्टेजवर मधोमध बसले होते, आणि मोर पुढ्यात पाठमोरा नाचत होता!!

तात्पर्य : कविता करु नयेत. केल्या तर पाठ्यपुस्तकात छापू नयेत. छापल्या तर त्याची समीक्षा करु नये. हल्ली घरोघर काव्यसमीक्षक बसलेले असतात. त्यांना कविता जाम कळते. समीक्षा केली तर ती सोशल मीडियावर टाकू नये. सोशल मीडियावर टाकली तर...वारंवार मिळेल वन्समोअर!

किती रे शोर करता तुम्ही किशोरांनो?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.