दुभंगाची विखारी लक्षणे

अमेरिकी निवडणुकीतील प्रचाराच्या निमित्ताने समोर येत आहे, ती केवळ स्पर्धेची नव्हे तर द्वेषाची भावना.
दुभंगाची विखारी लक्षणे
दुभंगाची विखारी लक्षणेsakal
Updated on

चालू वर्ष हे जगभरात निवडणुकांचे वर्ष म्हणून ओळखले जात आहे. याला ‘लोकशाहीचा उत्सव’ असे म्हणण्याचा मोह अनेकांना होतो; परंतु असे म्हणणे कितपत वास्तवाला धरून असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे कारण निवडणूक हा लोकशाहीप्रणालीचा केवळ एक भाग. त्या सांगाड्यात लोकशाहीची प्राणप्रतिष्ठा तेव्हाच होते, जेव्हा सहिष्णुता हे मूल्य सार्वजनिक जीवनाचा भाग बनते. व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि संस्थांची स्वायत्तता जपली जाते. मुख्य म्हणजे सत्तास्पर्धेत हिंसाचाराला कोणतेही स्थान नसते. एरवी या प्रकारची शिकवण आशिया-आफ्रिकेतील विकसनशील किंवा गरीब देशांना देण्याचा प्रघात आहे.

पण अशी ‘शिकवणी’ देण्यात एरवी पुढाकार घेणाऱ्या अमेरिकेलाच आता आपल्या पायाखाली काय जळते आहे, हे जरा पाहा, असे सांगण्याची वेळ आलेली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प प्रचारसभेत बोलत असताना त्यांच्यावर एका युवकाने गोळ्या झाडल्या. त्यांच्या कानाला दुखापत झाली, पण ते सुदैवाने बचावले. या प्राणघातक हल्ल्यामागचा हेतू कळेल तेव्हा कळेल. पण वीसवर्षीय मारेकऱ्याला सुरक्षारक्षकांनी तत्काळ गोळ्या घालून ठार मारल्याने ते कळणेही आता दुष्प्राप्‍य झाले आहे. त्यामुळे यामागची ‘घातसूत्रे’कोणती याविषयी अनेक कथानके, उपकथानके तयार होऊ लागली आहेत.

समाजमाध्यमांतून ती वेगाने फैलावलीदेखील. ही भीषण घटना कळताच डेमोक्रॅटिक पक्षाच्या अनेक समर्थकांनी हा ट्रम्प यांनीच घडवून आणलेला बनाव आहे, असे कथानक पसरविण्यास सुरवात केली. ‘सिक्रेट एजंट’नी त्यात ट्रम्प यांना सहाय्य केले आणि ट्रम्प यांचे खाली बसणे, नंतर रक्तबंबाळ अवस्थेत उठून जनसमुदायापुढे लढण्याची खूण करणे हे सगळे ठरवून, संहितेबरहुकूम झाल्याचा आरोप केला गेला. हे केवळ समाजमाध्यममग्न ऐऱ्यागैऱ्यांनीच केले असे नव्हे. डेमोक्रॅटिक पक्षाशी संबंधित राजकीय सल्लागार दिमित्री मेहलहॉर्न यांनीही याच आशयाची `पोस्ट’ टाकल्याने या कथानकाला बळ मिळाले. दुसऱ्या दिवशी त्यांनी क्षमायाचना करीत या हल्ल्याचा निषेध केला; पण तोपर्यंत उशीर झाला होता. दुसरीकडे ट्रम्प यांना लक्ष्य करणाऱ्या प्रक्षोभक प्रचारामुळे; त्यांना सतत फॅसिस्ट, देशासाठी धोकादायक, सर्वात खोटारडे अशी दूषणे दिली गेल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाच्या समर्थकांनी सुरू केला.

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करताना बायडेन यांनी प्रचाराचे ‘तापमान’ मर्यादेबाहेर गेले आहे, याचा उल्लेख करून दोन्ही पक्षांना ते कमी करण्याचे आवाहन केले. ते तिथल्या वातावरणाची, प्रचारपातळीच्या घसरणीची कल्पना आणून देणारे आहे.

सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींची चौकशी वगैरे आता होईल. अमेरिकेतील ‘गन कल्चर’ला आळा घालण्यासाठी त्यावर नियंत्रण आणण्याची मागणीही जोर धरेल. परंतु हा विषय एवढ्यापुरता मर्यादित नाही. हे खरे आहे की, अशाप्रकारचे हल्ले होण्याची ही अमेरिकेतील पहिलीच वेळ नाही. देशातच नव्हे तर जगातही ज्यांची लोकप्रियता होती, त्या जॉन एफ. केनडी यांची हत्या झाली. आजवर ना त्यामागच्या शक्ती कोण हे कळले, ना मारेकरी सापडला, ना त्याचा हेतू कळला.

माजी अध्यक्ष फ्रॅंकलिन रुझवेल्ट यांच्यावरही (१९१२) हल्ला झाला होता. हल्ला झाला की सहानुभूतीची लाट येते, असा समज असतो. पण त्यानंतर लगेच झालेल्या निवडणुकीत रुझवेल्ट पराभूत झाले होते. हल्ल्याच्या अशा अनेक घटना सांगता येतील. पण मुद्दा असा आहे की त्यावेळची आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. त्यावेळी राजकारणातील दुभंग संपूर्ण समाजात पसरला नव्हता. ध्रुवीकरण एवढे टोकाला गेले नव्हते. राजकीय प्रचारात विखाराचा आजच्यासारखा प्रादुर्भाव कधीच नव्हता. प्रत्येकाच्या हातातील समाजमाध्यमे हे याचे एकमेव कारण नाही. तसे मानणे ही आत्मवंचना ठरेल. एकूण राजकीय -सामाजिक जीवनातच हे अधःपतन दिसून येते आहे आणि त्याची कारणे शोधली पाहिजेत.

डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि समर्थकांमध्ये परस्परांविषयी कमालीचा अविश्वास आहे. मतमोजणीच्यावेळी प्रतिस्पर्ध्यांकडून घोळ केला जाईल, असा आरोप करीत ‘कॅपिटॉल हिल’वर ट्रम्प समर्थकांकडून झालेला हल्ला हे याचे ठळक उदाहरण. त्याआधी २०१६मध्ये ट्रम्प यांच्याकडून झालेला पराभव डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांना आणि त्यांच्या पक्षालाही पचवता आला नव्हता. विजयाचे उन्मादात आणि पराभवाचे द्वेषात रूपांतर होणे लोकशाही व्यवस्थेत अपेक्षित नसते. नेमके तेच त्या काळापासून तीव्रतेने अमेरिकेत सुरू झाले. तेथील ध्रुवीकरण विकोपाला गेले आहे. युरोपातील चित्र वेगळे नाही. फ्रान्सच्या निवडणुकांनंतर तेथे हिंसाचार झाला.

उजव्यांची मुसंडी डाव्यांना अस्वस्थ करणारी ठरली, हे समजू शकते, पण त्याचा परिपाक हिंसाचारात व्हावा, हे निषेधार्ह आहे. हे सगळे पाहता राजकारणाचा पोत बदलतो आहे आणि समाजजीवनातील खदखद वाढत आहे, याची नोंद घ्यायला हवी. ब्रिटनमध्ये अलीकडेच झालेल्या निवडणुकीतील मतदानाचे प्रमाण खूपच कमी होते, हे राजकीय वर्गावरील वाढत्या अविश्वासाचे लक्षण म्हणावे लागेल. राजकीय विरोधकाला शत्रू मानण्याची वाढती प्रवृत्ती जगाच्या अनेक भागांत लोकशाहीचा संकोच करीत आहे आणि अमेरिकेसारखी प्रगत महासत्ताही याला अपवाद नाही, हे वास्तव ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याइतकेच काळजीचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com