शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने प्रजासत्ताकदिनाच्या घटनेनंतर राकेश व नरेश टिकैत यांच्याभोवती कार्यकर्त्यांचे जमा झालेले मोहोळ उत्तर प्रदेशातील जाट आणि मुस्लिम समाजाच्या ऐक्यामे दर्शन घडवत आहे. त्याने उत्तर प्रदेशातील सत्ताधारी भाजपच्या पोटात गोळा आला आहे.
प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चाच्या वेळी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनावेळी हिंसाचार झाला. त्यामुळे प्रदीर्घ काळ आणि चिकाटीने चाललेले आंदोलन काहीसे विस्कळित होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. जेव्हा चार शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते मागे फिरण्याची तयारी करत होते, तेव्हा तिथे हिंसक प्रकार घडला. त्यामागे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाखालील कार्यकर्ते होते. शेतकरी संघटनेत फूट पडेल, या इराद्याने झालेल्या हल्ल्यानंतर उलट सगळे शेतकरी गट अधिक जवळ आले. ‘भारतीय किसान युनियन’चे नेते राकेश टिकैत इतके भावूक झाले की, त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याने शेतकऱ्यांच्या जखमांवर मलमपट्टीच केली. एवढेच नव्हे तर जे आंदोलन सोडून जाऊ पाहात होते त्यांचे पायही पुन्हा मागे फिरले व त्यांनी पुन्हा आंदोलनाला बळ दिले.
भाजपसाठी टिकैत यांची प्रतिक्रिया ही, "जर शेतकरीविषयक कायदे मागे घेतले नाहीत तर मी माझ्या जिवाचेच काहीतरी बरेवाईट करेन'', असे सांगणारी होती. या आधी टिकैत उघडपणे भाजपचे समर्थक होते. ते अचानक त्याचे शत्रू बनून गेले, एवढेच नव्हे तर ते उघडपणे सत्ताधारी पक्षासोबत राहिल्याबद्दल खेदही व्यक्त करू लागले. त्यानंतर राकेश टिकैत यांच्या महापंचायतीतील भूमिकेने ते भाजपसाठी अधिक त्रासदायक, डोकेदुखी करणारे झाले. २०१३मधल्या कुप्रसिद्ध मुजफ्फरनगर दंगलीने पश्चिम उत्तर प्रदेशात समाजात फूट पडलेली होती, पण आता यावेळी जाट आणि मुस्लिम एकत्र आल्याचे चित्र होते.
भाजपसोबत जाटांना नेण्याचे श्रेय अमित शहा यांचे. त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे फूट पाडत, या प्रदेशात भाजपच्या बाजूने जाट समाजाला वळवण्याचे काम केले होते. जत्थ्या-जत्थ्याने भाजपमागे जाट समूह जात होता. नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीतील घणाघाती भाषणांनी भाजपमागील जाटांचे संघटन अधिक दृढ होऊ लागले होते. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या राष्ट्रीय लोकदलाला सोडून ही मंडळी भाजपकडे वळत होती. शेतकरी नेते असलेल्या चौधरी चरणसिंहांपाठी जाट समूह उभा राहिला होता. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र अजितसिंह आणि नातू जयंत चौधरी यांच्यामागे समाजाचे पाठबळ होते. पण, २०१४मध्ये भाजपमागे जाटांचे बळ उभे राहू लागले. २०१४,२०१७, आणि २०१९च्या निवडणुकांत जाटांचा भाजपला वाढता मिळत होता. टिकैत यांनी भाजपवर डागलेल्या तोफेने अगदी जादूच्या छडीसारखे काम केले. मुजफ्फरनगरच्या दंगलीच्या जखमेवर हळूवार फुंकर घातली गेली, या दंगलीने ६७ जणांचा बळी घेतला होता आणि हजारो बेघर झाले होते. अशा फुंकरीने काम केल्याने उत्तर प्रदेशातील जाट आणि मुस्लिम एकोपा होणे ही राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. भाजपच्या अंतर्गत गोटात, अशी कुजबूज ऐकायला मिळते की, जेव्हा शेतकरी निदर्शनस्थळावरून बाहेर पडत होते, तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन त्यांच्यावर हल्ला करण्याची काय गरज होते? अशा कृत्याला कोणी पाठीशी घातले, याचे गुपित फोडायला कोणी तयार नाही. मात्र त्याचवेळी नेतृत्वाने हिरवा झेंडा दाखवल्याशिवाय कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले आहे, हेदेखील कोणी नाकारत नाही. म्हणूनच पक्षाच्या दिल्लीतील बड्या नेत्यांनी घटनेची गांभीर्याने नोंद घेतलेली आहे.
संघर्षाचा पवित्रा
ते काहीही असो, उत्तर प्रदेशातील सरकारने निदर्शनाबाबत संघर्षाची भूमिका केवळ कायमच ठेवली नाही, तर अधिक टोकदार केली. देशाच्या राजधानीत प्रजासत्ताकदिनासारखी घटना घडू नये, म्हणून अगदी टोकाची कडक पावले उचलली असताना, आम्ही त्याहीपेक्षा कडक भूमिका घेवू शकतो, असे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आंदोलन चिरडण्यासाठी आपण टोकाला जाऊ शकतो, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. गाझीपूरजवळील निदर्शनस्थळाचा वीजपुरवठा तर आधी तोडलाच पण त्याहीपुढे जावून तेथे पाठवलेले पिण्याच्या पाण्याचे टॅंकरही मागे घेतले गेले.
टिकैत काय करणार?
राज्य सरकारने टिकैतांचे आंदोलन काहीसे मनावर न घेता दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला. दिवंगत महेंद्रसिंह टिकैत यांच्यावरील श्रद्धेपोटी राकेश आणि नरेश टिकैत यांच्यामागे कार्यकर्त्यांचा संच आहे, असा समज करून घेतला. ऐंशीच्या दशकात महेंद्रसिंह टिकैत यांनी दिल्लीतील बोट क्लबवर धरणे धरले होते आणि कॉंग्रेस सरकारला हादरवून सोडले होते, त्याने टिकैत यांचे जाट समाजावरील निर्विवाद वर्चस्व निर्माण झाले होते. महेंद्रसिंह टिकैत यांच्या निधनानंतर राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी या दोन्हीही भावंडांपैकी एकानेही समाजावर आपला प्रभाव दाखवला नाही. राकेश यांना तर निवडणुकीत अनामतही गमवावी लागली. तथापि, प्रजासत्ताकदिनाच्या घटनेनंतर राकेश यांचे भवितव्यच पालटले. त्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडे अचानक मोठे पाठबळ मिळाले. ही स्थिती लक्षात घेऊन आता, भाजपचे नेतृत्व आकाशपाताळ एक करून त्याला सुरूंग कसा लावता येईल, याच्या विचारात आहे. टिकैत भाजपच्या जाळ्यात पुन्हा अडकतात का, भाजपच्या व्यूहरचनेला बळी पडतात का, हा लाखमोलाचा प्रश्न आहे.
केवळ गावातीलच पाणी पिणार!
जाट समाजातील महिला व पुरूष विविध खापमध्ये विभागालेले आहेत, तरीही त्यांच्यात टिकैत यांचे नाव घेवून शपथ घेतली किंवा घातली जात आहे. राकेश टिकैत यांनी, "मी केवळ माझ्या गावातीलच पाणी पिणार'', असे जाहीर केले. त्यानंतर त्यांच्या शिसैली गावातून त्यांच्यासाठी पाणी घेवून येण्यासाठी लागलेली अहमहिकेतून त्यांच्यामागील वाढता पाठिंबा स्पष्ट होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.