संजय शितोळे-देशमुख
ही दिवसांपूर्वीच पुणे शहरातील ‘बी.के.एस.अय्यंगार मेमोरियल योग गार्डन’चे उद्घाटन झाले. ऐंशी वर्षे भारतासह चीन, युरोप, अमेरिकेत योग प्रसार करून पुण्याला योगाचे जागतिक केंद्र करणाऱ्या योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार गुरुजींच्या योगकार्याचा गौरव करण्याकरिता भारतीय लष्करातील सर्वात मोठे युनिट असलेल्या ‘सदर्न कमांड’ने स्वतः पुढाकार घेतला व त्यांच्या मुख्यालयापासून जवळ रेसकोर्सच्या मेन गेटवरील अर्जुन रोडवर हे मेमोरियल व गुरुजींचा नटराजा सनातील पुतळा उभारला आहे. त्याचे उद्घाटन गुरुजींचे सुपुत्र व आंतरराष्ट्रीय कीर्तिचे योगसंशोधक प्रशांत अय्यंगार यांच्या हस्ते झाले.
वृक्षांनी वेढलेल्या प्रशस्त योग वाटिकेमध्ये हिरवळीवर लष्कराच्या दक्षिण विभागाचे कमांडर लेफ्टनंट जनरल ए. के. सिंग (PVSM,AVSM,SM,VSM) यांच्या उपस्थितीत, लष्करी शिस्तीत व भव्यतेत हा कार्यक्रम पार पडला. स्वतः उत्तम गिर्यारोहक, सायकलपटू, संस्कृत व योगपारंगत असलेल्या या सेनानीने गुरुजींच्या जीवनकार्याचा गौरव केला. ते म्हणाले, “योग ही लष्कराची गरज होती, ती ‘अय्यंगार योगा’च्या माध्यमातून पूर्ण होत आहे. गुरुजींचे स्मारक पुण्यात नसावे, ही खंत होती ती आज या मेमोरियलने दूर होत आहे. गुरुजींचा पुतळा हा ‘लाईट ॲान योगा’सारखा लष्करासाठी, भारतीयांसाठी, पुणेकरांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरणार आहे.”
१९३७ मध्ये गुरुजींनी योगप्रसाराची सुरुवात पुण्यात केली. त्या काळात योग हा सर्वसामान्यांसाठी नसून साधू-संन्यासी-बैराग्यांसाठी आहे, असा समज समाजात होता. योगाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवण्यासाठी गुरुजींना अक्षरक्षः भगीरथ प्रयत्न करावे लागले. पं. नेहरू, श्रीमती रुझवेल्ट, इंदिरा गांधी गुरुजींच्या भेटीने खूपच प्रभावित झाले व त्यांनी आसनांचा अल्बम ठेवून घेतला. जागतिक कीर्तिचे व्हायोलिनवादक यहुदी मेन्युहीन, बेल्जियमच्या राजमाता, जे. कृष्णमूर्ती, जयप्रकाश नारायण, डॉ. मुरली मनोहर जोशी, अटलबिहारी वाजपेयी हे तर त्यांचे शिष्यच होते. पंतप्रधान असताना अटलजींनी गुरुजींवरील आदरापोटी पुणे इन्स्टिट्यूटला भेट दिली होती.
आंतरराष्ट्रीय खेळाडू, उद्योगपती, कलाकार या सर्वांच्या जीवनात योगसाधनेद्वारे आनंद निर्माण करणाऱ्या आणि रोगजर्जर व्यक्तींना दिलासा देणाऱ्या गुरुजींनी योगाच्या प्रसारार्थ अनेक देशी- विदेशी विद्यार्थी, योगशिक्षक घडवले, पुस्तके लिहिली. परदेशात ‘लाईट ॲान योगा’ हा त्यांचा ग्रंथ तर ‘बायबल ॲाफ योगा’ म्हणून ओळखला जातो. अनेकांना आश्चर्य वाटेल; पण लष्कर व ‘अय्यंगार योगा’चे नाते सात दशकांचे आहे.
योगासने व प्राणायाम
एन. डी. ए. खडकवासल्याचे पहिले कमांडट मेजर जनरल हबीबउल्ला यांनी १९५५ मध्ये गुरुजींना कॅडेट्स व प्रशिक्षकांकरिता योग क्लास घ्यायचा आग्रह केला. त्यांनी तो घेतला व त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. कित्येक वर्षे गुरुजींनी स्वतः, नंतर गीताजींनी, प्रशांतसरांनी नियमित योगासनवर्ग एन.डी.ए.मध्ये जाऊन घेतले. आजदेखील लष्करातील अनेक विभागात इन्स्टिट्यूटतर्फे सातत्याने योगाचे उपक्रम घेतले जातात. लष्करातील खडतर आयुष्य, सीमेवरील जवानांची मानसिकता, अतिउंचीवरचे शरीरावर होणारे परिणाम याचा विचार करून योगासने व प्राणायमाचे नियोजन केले जाते. प्रशांतसर, गीताजींच्या व गुरुजींच्या शिष्या ‘श्रीयोग इन्स्टिट्यूट अय्यंगार योगा’च्या राजश्री तुपे या काश्मीरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सलग आठ दिवसाचे योगवर्ग लष्करी अधिकारी व जवानांसाठी घेत आहेत. आजच्या योग दिवसानिमित्त भारताच्या सीमेवर ‘अय्यंगार योगा’ची साधना लष्कराकडून सुरू आहे. पुण्यातील ‘रमामणी मेमोरियल योग इन्स्टिट्यूट’मधून प्रशांतसरांच्या मार्गदर्शनाखाली देशातील व परदेशातील १५० हून जास्त अय्यंगार योग केंद्रे योगप्रसार करत आहेत. तसेच गुरुजींची नात अभिजाता अय्यंगार या योगशिक्षणाचे पवित्र कार्य करत आहेत.
पुण्याला कर्मभूमी मानलेल्या योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार गुरुजींचा अतुलनीय असा सन्मान गुजरातपासून केरळपर्यंत पसरलेल्या; पण पुण्यात मुख्यालय असलेल्या ‘सदर्न कमांड’ या लष्करी संस्थेने करावा हा विलक्षण योग आहे. यासाठी लष्कर, सदर्न कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग (ए. के. सिंग) यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
(लेखक आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक, सायकलपटू व ३० वर्षांपासून ‘अय्यंगार योगा’चे अभ्यासक आहेत.)
पुण्याला योगाचे जागतिक केंद्र करणाऱ्या योगाचार्य
बी.के.एस. अय्यंगार गुरुजींच्या योगकार्याचा गौरव करण्याकरिता लष्कराच्या दक्षिण विभागाने स्वतः पुढाकार घेतला. आजच्या ‘योग दिवसा’निमित्त या कार्यक्रमाची माहिती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.