Ghoomer Movie : ‘घुमर’मध्ये सापडला ‘नवा’ चेंडू!

ही गोष्ट मी भारतीयांच्या लाडक्या क्रिकेटमध्ये आणली आणि अपघातात एक हात तुटलेली मुलगी दोन हातानं करतात तशी गोलंदाजी कशी करेल...
Ghoomer Movie
Ghoomer Movie Esakal
Updated on

‘घुमर’ चित्रपटाची कथा कशी सुचली?

आर. बाल्की ः माझा सहकारी राहुल सेनगुप्तानं एका नेमबाजाची गोष्ट मला सांगितली. तिचा उजवा हात तुटतो आणि डाव्या हातानं खेळत ती पदक जिंकते. मी या गोष्टीपासून प्रेरणा घेतली. आपण कायमच खेळाकडून प्रेरणा घेतो, मात्र आम्ही खेळामध्येच काही नवं शोधण्याचा प्रयत्न केला.

ही गोष्ट मी भारतीयांच्या लाडक्या क्रिकेटमध्ये आणली आणि अपघातात एक हात तुटलेली मुलगी दोन हातानं करतात तशी गोलंदाजी कशी करेल, हे आम्ही ‘घुमर’च्या गोष्टीत सांगण्याचा प्रयत्न केला. हा ‘चेंडू’ आम्हाला सापडला आणि तिथंच चित्रपटाची कथाही सापडली.

त्यामुळं ‘घुमर’ इनोव्हेशनची कथा आहे. काही अपंगत्व आल्यास ती व्यक्ती नवीन, इनोव्हेटिव्ह शोधण्याचा प्रयत्न करते. अशावेळी अपंगत्व पूर्णपणे मागं पडतं. या कथेत प्रशिक्षक आणि अपंग खेळाडू एकत्र येऊन नव्या गोष्टी शोधतात.

प्रशिक्षक तिच्या अपंगत्वाबद्दल सहानुभूती व्यक्त करीत नाही, तर तिला लढायला शिकवतो. अपंगांना सहानुभूती नव्हे, तर पाठिंबा हवा असतो. अपंगत्वामुळं त्यांच्या मनाची ताकद दहा पट वाढलेली असते. चित्रपटातील सर्व घटनांत, विचारांत, नातेसंबंधात घुमर, म्हणजेच ट्विस्ट आहे.

महिला क्रिकेटपटूची गोष्ट काल्पनिक सांगण्यामागचा उद्देश काय?

मी पुरुष किंवा महिला क्रिकेटपटू असा भेद करीत नाही. एखाद्या व्यक्तीकडं काय नाही, यापेक्षा त्याच्याकडं काय आहे, हे पाहण्याचा माझा प्रयत्न असतो आणि चित्रपटामध्ये मी तेच केलं आहे. एखाद्या गाजलेल्या खेळाडूची गोष्ट पुन्हा सांगण्यापेक्षा मी नवीन काही तरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

अभिषेक व सयामीची निवड कशी झाली?

या भूमिकेसाठी अभिषेक बच्चन शिवाय दुसरं कोणीच योग्य ठरलं नसतं. तो आधुनिक विचारांचा कलाकार आहे. त्याच्या अभिनयात खोली व संवेदनशीलता आहे. अभिनय करताना तो भावनांना महत्त्व देतो आणि त्याचं व्यक्तिमत्त्वही खूप वेगळं आहे.

कथेतील त्याचा रुक्षपणा एका उद्देशासाठी आहे व तो त्यानं नेमकेपणानं टिपला आहे. सयामी खेर संवेदनशील कलाकार आहे. ती क्रिकेट खेळू शकते हा बोनस होता. तुम्ही क्रिकेटवरील चित्रपट दाखवताना काहीही खोटं दाखवू शकत नाही. गोलंदाजाची एखादी ॲक्शन चुकली, तरी प्रेक्षकांच्या लगेच लक्षात आली असती. इथं सयामीच्या अनुभवाचा उपयोग व मदत झाली.

अमिताभ बच्चन यांच्यासमवेत तुम्ही अनेक चित्रपटांत काम केलं. त्यांच्याबद्दल काय सांगाल?

अमिताभ बच्चन स्टार किंवा ॲक्टर नाहीत, ते केवळ ‘अमिताभ बच्चन’ आहेत. स्टार असतात, सुपरस्टार असतात आणि त्यांच्या वर अमिताभ बच्चन! अभिनयात त्यांच्याकडून आपण काहीच काढून घेऊ शकत नाही.

मला आवडणारे अमिताभ मी त्यांच्या प्रत्येक भूमिकेत शोधतो. ‘पा’मधील तेरा वर्षांच्या मुलातही मला अमिताभच दिसले. ते तेरा वर्षांचा मुलगा साकारताना कसे दिसतात, एवढंच मला पाहायचं होतं. त्यांनी एखादा व्यवस्थापक साकारला, तर तो आजपर्यंत साकारलेला सर्वांत वेगळा व्यवस्थापक ठरेल, एवढी ताकद त्यांच्या अभिनयात आहे.

अशा कलाकारांच्या अभिनयात तुम्ही ढवळाढवळ करू शकत नाही. प्रत्येक शॉटमध्ये ते काही वेगळे देऊन जातात, तुम्हाला आश्चर्यचकित करतात. कॅमेरा सुरू होताच ते एक वेगळी व्यक्ती बनतात. ते अभिनय एन्जॉय करतात आणि अभिनयावर प्रेमही करतात.

‘घुमर’चं वेगळेपण काय ठरलं?

काही चित्रपट काळानुसार आपला प्रभाव वाढवत जातात. हा चित्रपट हळूहळू प्रेक्षकांपर्यंत पोचत आहे. प्रेक्षकांकडून ‘घुमर’ला खूप प्रेम मिळालं. हे प्रेम ४०० कोटी रुपयांचा गल्ला जमवणारं नसलं, तरी ते खरं प्रेम आहे.

माझा उद्देश चित्रपटातून मनोरंजन करण्याचा असतो. मी कथेत फारसं गांभीर्य न आणता, ती मनोरंजक पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोचवतो. चित्रपट पूर्ण झाल्यावर मी काही काळ आराम करतो आणि नवी कल्पना सुचल्यावर पुन्हा जोमानं कामाला लागतो.

‘मास्टर’कडून कौतुक अविस्मरणीय : सयामी

मी सचिन तेंडुलकर यांना ‘मास्टर’ म्हणते. ते ‘घुमर’ पाहायला आले होते. मी त्यांना टाकून दाखवलेल्या चेंडूचं सोशल मीडियावर खूप कौतुक झालं. खरंतर, शूटिंग पूर्ण झाल्यानंतर जवळपास एका वर्षानंतर मी तो चेंडू टाकला होता. चेंडू व्यवस्थित पडला आणि त्यांनी कौतुक केल्यावर मी म्हटलं, ‘‘तुम्ही देव आहात म्हणून माझा चेंडू व्यवस्थित पडला.’’ माझ्यासाठी ते सर्वांत मोठे हिरो आहेत.

‘घुमर’ चित्रपटाची कथा कशी सुचली, एक हात तुटलेल्या खेळाडूनं टाकलेला ‘नवा’ चेंडू कसा सापडला, अभिषेक बच्चन आणि सयामी खेरच्या कामाची वैशिष्ट्यं काय, अमिताभ बच्चन स्टार, सुपरस्टार या पदांच्याही वर जाणारा अभिनेता कसा आहे... सांगत होते ‘चिनी कम’, ‘पा’, ‘शमिताभ’ अशा गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक आर. बाल्की...

- महेश बर्दापूरकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.