येमेन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्यात प्रचंड तणाव आहे. गेल्या सात वर्षांपासून येमेनमधील हौथी बंडखोर आणि यूएई, सौदी अरेबिया यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे.
येमेनमधील अस्थिरता आणि सत्ता संघर्ष यामुळे तेथील नागरिकांची होरपळ सुरू आहे. हौथी बंडखोर आणि विरोधक यांच्या सत्तास्पर्धेने तेलाचा व्यवसाय पुरता कोलमडून गेला आहे.
येमेन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्यात प्रचंड तणाव आहे. गेल्या सात वर्षांपासून येमेनमधील हौथी बंडखोर आणि यूएई, सौदी अरेबिया यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. मार्च २०१५ मध्ये येमेनची राजधानी साना येथे येमेनचे सरकार उलथवून हौथी बंडखोरांनी कब्जा मिळवला, तेव्हापासून नवीन युद्धाची सुरुवात झाली. आतापर्यंत या गृहयुद्धात आणि सौदी, यूएई येथून होणाऱ्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. अलीकडे, १७ जानेवारी रोजी हौथी बंडखोरांनी ड्रोनच्या माध्यमातून अबुधाबीवर केलेल्या हल्ल्यात दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला. संयुक्त राष्ट्रांनी येमेनमधील परिस्थिती अतिचिंताजनक असल्याचे म्हटले आहे.
येमेन हा गरीब देश आहे. हौथी बंडखोरांना इराणची मदत आणि पाठिंबा आहे. पश्चिम आशियात इराण आणि सौदी अरेबिया ही दोन महत्त्वाकांक्षी राष्ट्रे आहेत. जवळपासची लहान राष्ट्रे त्या दोघांपैकी एकाच्या बाजूने भूमिका घेत असतात. सौदी अरेबियाला अमेरिकेची मदत आहे, तर इराणवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. सीरियालाही इराणची मदत आहे. इस्त्राईलचे राष्ट्राध्यक्ष आईसेक हारझोग ३१ जानेवारी रोजी यूएईच्या दौऱ्यावर गेले असताना येमेनहून क्षेपणास्त्र डागण्यात आले. त्याचा नाश करण्यात यूएईला यश मिळाले. पहिल्यांदाच इस्त्राईलचे राष्ट्राध्यक्ष यूएईच्या भेटीस आले होते. अलीकडे यूएईने इस्त्रायलशी संबंध सुधारण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. यूएईने सप्टेंबर २०२० मध्ये इस्त्राईलसोबत राजनैतिक संबंध स्थापित केले आहेत.
इस्त्राईलच्या राष्ट्राध्यक्षांनी अबुधाबीत म्हटलं की, या भागासाठी दोन पर्याय आहेत- एक आहे शांतता, समृद्धी, सहकार याचा आणि दुसरा म्हणजे इराणचा. या भागात इराण दहशत माजवून भागात अस्थिरता निर्माण करण्यात व्यग्र आहे. जवळपास पूर्ण उत्तर येमेन हौथींच्या ताब्यात आहे. हौथी आहेत शिया मुस्लिम. सुन्नी मुस्लिमांमधल्या अतिरेकी सलाफी विचाराच्या ते विरोधी आहेत. अलीकडे मात्र हौथी बंडखोरांनी बऱ्याच सुन्नी नेत्यांना आपल्या सोबत घेतले आहे. सलाफी विचाराला विरोध करणारे हौथी पण कट्टर धर्मांध आहेत. सत्ता काबीज करताना उलथवून टाकण्यात आलेल्या हादी सरकारला सौदी आणि यूएईचा पाठिंबा आहे.
सौदी अरेबियाने येमेनच्या विरोधात उघडलेल्या आघाडीत यूएई आहे. सौदी अरेबिया आणि हौथी एकमेकांवर सतत हल्ले करत आहेत. २१ जानेवारी रोजी येमेनच्या उत्तरेच्या सादा शहराच्या तुरुंगावर सौदीने केलेल्या हल्ल्यात अंदाजे ९० लोक मारले गेले होते. यूएईने साना आणि इतर भागात २०१८ नंतर हल्ले करण्याचे थांबवले होते आणि म्हणून हौथीनेही यूएईवर हल्ले थांबवले होते. अलीकडे परिस्थिती बदलली आहे. यूएई प्रामुख्याने सुन्नी बहुसंख्य दक्षिण येमेनमध्ये लढत होता. हा परिसर १९९० पर्यंत स्वतंत्र होता. २२ मे १९९० रोजी दक्षिण आणि उत्तर येमेन एकत्र आले.
हल्ल्यामागचे राजकारण
दक्षिणेतल्या मरीब आणि शाब्वावर हौथीने गेल्या वर्षी आक्रमण केले. हा भाग तेल, नैसर्गिक वायूने समृद्ध आहे. सौदीने २५ डिसेंबर रोजी अल इस्लाहशी संबंधीत शाब्वाच्या गव्हर्नर मोहम्मद बिन ऑडिओची हकालपट्टी केली. त्याच्या जागी सौदी अरेबियाने यूएईशी चांगले संबंध असलेल्या शेख अवध मोहम्मद अल्लाहुलगी याला गव्हर्नर बनवले. ऑडिओ यांनी आधी यूएईच्या सैन्याची बल्हाफ येथील उपस्थितीबद्दल टीका केली होती, त्यामुळे त्यांना जावं लागलं. सौदी अरेबियाने नवीन गव्हर्नर नेमताना अवध यांचे यूएईसोबत चांगले संबंध असल्याचे पाहिले. नंतर यूएईने त्याच्या जायंटस् ब्रिगेडच्या काही हजार सैन्याला शाब्वा येथे पाठवले. काही दिवसांतच त्याने कब्जा केला आणि हौथींना तिथून निघून जावे लागले. यामुळे येमेननी यूएईवर हल्ले करायला सुरूवात केली. शाब्वानंतर महत्त्वाच्या मरीब प्रांतात काही ठिकाणी हौथींचा पराभव झाला. यूएईने यापुढे येमेनमध्ये हल्ले करू नयेत, यासाठी हौथीने क्षेपणास्त्राचा उपयोग करून त्यांना इशारा दिला .
२०१५ मध्ये येमेनच्या माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला सालेह यांच्या मदतीने हौथींनी हादी सरकार उलथवून टाकले. त्यानंतर हादीनी सौदी अरेबियात आश्रय घेतला आणि तिथून ते विजनवासातून सरकार चालवत. २०१७ मध्ये हौथी बंडखोरांनी सालेह यांची हत्या केली. सौदीच्या जवळ जाण्याचा सालेह प्रयत्न करत असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली होती. ३० वर्षापेक्षा अधिक काळ सालेह यांनी येमेनवर राज्य केले. २०११ मध्ये अरब राष्ट्रांत झालेल्या उठावात त्यांना सत्तेतून जावे लागले होते. हादी सौदीच्या हातातील कठपुतळी आहे, हे उघड आहे. सौदी येमेनच्या संदर्भात जे निर्णय घेते ते हादी जाहीर करतात. गृहयुद्ध सुरू होण्यापूर्वी तेलाच्या निर्यातीतून येमेनला उत्पन्न मिळत असे. २०१५ मध्ये सरकार आणि हौथी यांच्यातील युद्धामुळे तेलाचे उत्पादन बंद पडले आहे. त्यानंतर तेल उत्पादन करणाऱ्या बहुसंख्य कंपन्यांनी येमेन सोडले आणि येमेनी लोकांचे जगणे अवघड झाले. येमेन संकटातून मुक्त होणे येमेनी लोकांसाठी आणि मानवतेसाठी गरजेचे आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.