सांगीतिक ‘प्रसाद’

न व्या पिढीच्या गायकीमधील एक मर्मज्ञ कलाकार म्हणून प्रसाद खापर्डे यांची ओळख तयार झाली आहे.
Jaywant Chavan writes about artist blessing Music
Jaywant Chavan writes about artist blessing Music sakal
Updated on

न व्या पिढीच्या गायकीमधील एक मर्मज्ञ कलाकार म्हणून प्रसाद खापर्डे यांची ओळख तयार झाली आहे. शास्त्रीय संगीताचे क्षेत्र हे अक्षरशः जीव ओतून काम करण्याचे क्षेत्र आहे, याची जाणीव असलेला आणि त्यासाठी भरपूर मेहेनत घेण्याची तयारी असलेल्या प्रसादच्या वाटचालीविषयी त्यामुळेच रसिकांना उत्कंठा आहे.

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या नावाचा पुरस्कार लाभल्याने ती आणखी वाढली असणार यात शंका नाही. ‘दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रा’चा पुरस्कार खापर्डे यांना जाहीर झाला आहे.

किशोरी आमोणकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे ज्येष्ठ शिष्य डॉ. अरुण द्रविड यांनी तो पुरस्कृत केला आहे. यापूर्वी विदुषी अनुराधा कुबेर, मंजूषा पाटील, पंडित जयतीर्थ मेवुंडी अशा अनेक नामवंतांना हा सन्मान मिळाला आहे.

प्रसाद खापर्डे यांचा जन्म १९७३ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील. त्यांना घरातूनच संगीताचा वारसा लाभला होता. त्यांचे आजोबा गायक होते. शिवाय आई-वडीलही संगीतरसिक होते. प्रसाद यांचा गायनातील रस पाहून त्यांना सर्वांनी प्रोत्साहन दिले.

लहानपणापासूनच प्रसाद यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा ध्यास घेतला. त्यासाठी अपार मेहनत, कठोर परिश्रम घेतले. संगीत अभ्यास सुरू केला. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम केला होता.

त्यानंतर १६व्या वर्षी पुढील संगीत शिक्षणासाठी ते गावाबाहेर पडले. ग्वाल्हेर घराण्याच्या भालेराव गुरुजी, पंडित डी. व्ही. पणके, विदुषी सुमनताई चौधरी यांच्याकडे त्यांनी गायनाचे धडे गिरविले. नंतर ते कोलकात्याच्या संगीत संशोधन अकादमीत दाखल झाले. तिथे त्यांनी पद्मविभूषण सहस्वान घराण्याची गायकी आत्मसात केली.

त्याचबरोबर विविध घराण्यांच्या शैलीचा अभ्यासही त्यांनी केला. त्यानुसार प्रसाद यांच्या गायकीत आता अनेक घराण्यांच्या गायकीचा रसानुभव घेता येतो. त्यांच्या मधुर, मंजूळ आवाजाने रसिकांवर मोहिनी घातली आहे. ‘सध्याच्या पिढीचे गायन हे फार वेगवान झाले आहे; परंतु अशा पद्धतीने शास्त्रीय संगीत आत्मसात करता येत नाही.

संगीत सर्व जगभरचे एकच असले, तरी शास्त्रीय गायनासाठी प्रदीर्घ रियाज, चिंतन, सखोल अभ्यासाची गरज असते. त्यातूनच संगीत बहरत जाते. उत्तरोत्तर त्याची प्रगल्भता वाढत जाते. अशा संगीताभ्यासासाठी संयम पाळावा लागतो. शिवाय सतत शिकत राहण्याची तयारी असावी लागते’,असे खापर्डे नमूद करतात. जगभरात संगीत सर्वश्रेष्ठ आहे. प्रसाद यांनीही अनेक प्रयोग केले आहेत. शिवाय त्यांनी तुर्की, पोलंडमधील संगीताचे फ्यूजनही केले आहे.

अमरावती विद्यापीठातून त्यांनी १९९७ मध्ये संगीतात पदव्युत्तर पदवी संपादन केली. गोवा कला अकादमीमध्येही ते कार्यरत होते.''थांग’ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी गायन केले आहे. सवाई गंधर्व महोत्सव, श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलन अशा देश-परदेशांतील अनेक कार्यक्रमांत त्यांनी आपली कला सादर केली आहे.

त्याला रसिकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सध्या संगीत जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून व्हिडीओच्या माध्यमातून रसिकांसमोर येते आणि त्यांच्या कलेचा रसिकांना आस्वाद घेता येतो.

मात्र, कलाकारांची जडणघडण, त्यांनी घेतलेले कष्ट, रियाज आणि संगीतविषयक विचार हे रसिकांपर्यंत फारसे पोहोचत नाहीत. त्यामुळेच ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ‘संगीत आयुष्यभर शिकण्याची कला आहे. त्यामुळे चांगली साधना करणारे विद्यार्थीच राहतात’, या प्रसाद यांच्या उद्गारात कलेकडे पाहण्याची त्यांची प्रगल्भ दृष्टीच दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.