डॉक्टर, इंजिनीयर होण्यापेक्षा भाषा अभ्यासात कारकीर्द करण्याचा सल्ला देणाऱ्या डॉ. मंजूषा पंढरीनाथ कुलकर्णींचे आई-वडील थोरच म्हणावे. तेही संस्कृत भाषेत... संस्कृत म्हणजे कठीण असा सर्वसाधारण समज. शालेय अभ्यासात केवळ गुणांसाठी ज्या विषयाचा अनेकजण विचार करतात, त्या संस्कृत भाषेत चांगली कारकीर्द घडविता येते, हे मंजूषा यांच्या साहित्य अकादमी पुरस्काराने सिद्ध केले. डॉ. प्रकाश आमटे यांच्यावरील ‘प्रकाशवाटा’ पुस्तकाचा संस्कृतमध्ये ‘प्रकाशमार्गाः’ असा अनुवाद मंजूषा यांनी केला आणि त्यावर साहित्य अकादमी पुरस्काराने मोहर उमटवली. मराठी साहित्याच्या संस्कृतमधील अनुवादाला पहिल्यांदाच हा सन्मान मिळाला आहे.
मंजूषा मूळच्या मराठवाड्याच्या. त्यांचे वडील ‘एमएसईबी’मध्ये नोकरीला होते. तेही संस्कृतप्रेमी. आईचाही संस्कृतचा चांगला अभ्यास होता. अनेक सुभाषिते आई त्यांना ऐकवायची, अर्थ सांगायची. दत्तात्रय कुलकर्णी हे मंजूषा यांचे पणजोबा नामवंत लेखक होते. त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या अनेक रचना मराठीत आणल्या होत्या. मंजूषा यांना त्यांच्या आई-वडिलांनी संस्कृतमध्ये पीएच.डी. करण्यास प्रोत्साहन दिले. त्या काळात महाविद्यालयात मंजूषा यांना संस्कृत शिकवायला कोणी नव्हते. आईने काही काळ शिकवले. नंतर त्यांनी पुण्यात स. प. महाविद्यालयात संस्कृत विषयाचा अभ्यास सुरू केला. १९९७मध्ये त्यांना कला शाखेची पदवी मिळाली. तेव्हा एकाच वेळी पुणे (बीए) आणि टिळक महाराष्ट्र (संस्कृत) विद्यापिठातून त्या सर्वप्रथम आल्या आणि दोन पदव्या मिळवल्या. संस्कृतभारती संस्थेतून त्यांनी संस्कृत बोलण्याचा वर्ग केला. बी.एड. आणि एम.एड. केले. नंतर ‘सेट’ शिक्षणशास्त्रात आणि ‘नेट’ संस्कृतमध्ये उत्तीर्ण झाल्या.
शालेय जीवनापासून मंजूषा काहीतरी लिहायच्या. तेव्हा त्यात सुव्यवस्थितपणा नव्हता. त्यांनी अनेक निबंध, वक्तृत्व स्पर्धांमधून पुरस्कार मिळवले होते. ‘विवाह संस्कार’ हे त्यांचे पहिले पुस्तक. लग्नाच्या वेळी उच्चारले जाणारे अनेक मंत्र समजावून सांगण्यासाठी हे पुस्तक त्यांनी लिहिले. उखाणे हा मराठीतील लेखनप्रकार त्यांनी संस्कृतात आणला.अनुवाद, काव्य, ललित, वैचारिक, चरित्र असे अनेक प्रकारचे लेखन, शिवाय निवेदिका, सूत्रसंचालिका, एकपात्री प्रयोगही त्यांनी केले आहेत. संस्कृतमध्ये त्या व्याख्यानेही देतात. कमी कालावधीत सर्वाधिक मराठी काव्यरचना करण्याचा विक्रम मंजूषा यांनी नोंदविला आहे. शासनाच्या सेवेत प्राध्यापक म्हणून काम करताना शासनाची सरळ सेवेची जाहिरात त्यांनी पाहिली आणि परीक्षा दिली. तेव्हा ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या परीक्षेत त्या प्रथम आल्या. त्यानंतर भाषा संचालनालयाच्या पूर्णवेळ संचालकही झाल्या. नोकरी सांभाळून लेखनयज्ञ त्या करीत असतात.
केवळ संस्कृत आणि मराठी नाही, तर हिंदीमध्येही लिखाण करतात. हिंदीवरही मंजूषा यांचे प्रभुत्व आहे. त्यांची २५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत, तर २३ अजून प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. सध्या त्या ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ हिंदीत लिहीत आहेत. संस्कृत ही प्राचीन अभिजात, परिपूर्ण भाषा आहे. प्राचीन साहित्य, शास्त्र आणि विज्ञानाचा वारसा सांगणारी आहे. ही जगातील प्रवाही, तर्कशुद्ध, योग्य उच्चार, आशयघन अशी संपन्न भाषा आहे. ती सोपी आहे, फक्त आपल्याकडे शिकवण्याची पद्धत चुकीची आहे. शिक्षक नसताना मी संस्कृत शिकले, त्यामुळेच ही भाषा सोपी असल्याचेही सिद्ध होते, असेही डॉ. मंजूषा कुलकर्णी नमूद करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.