‘नाम’मुद्रा : रायटर आणि फायटर भाई

दक्षिण गोव्यातील माजोर्डा गावात दामोदर मावजो यांचा जन्म झाला. मराठी आणि पोर्तुगीज भाषेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.
Damodar Mavajo
Damodar MavajoSakal
Updated on

ज्येष्ठ कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्काराची अभिमानास्पद बातमी मिळाली आणि त्याच वेळी टीव्हीवर नागालॅंडमध्ये जवानांच्या गोळीबारात १४ निष्पाप मृत्युमुखी पडल्याची बातमी त्यांनी पाहिली आणि ते विषण्ण झाले. गोयंकारांच्या भाईंना पुरस्काराचा तेव्हा फारसा आनंद झाला नाही. देशाच्या एका भागात काही निरपराध चुकून मारले जातात, ही घटना त्यांना खोलवर जखम करते. समाजाशी एकरूप झालेला साहित्यिक, असे मावजोंचे वर्णन करता येईल. रवींद्र केळेकरांनंतर कोकणीला भाईंच्या निमित्ताने दुसरे ज्ञानपीठ मिळाले आहे. कोकणी भाषाच नाही, अशी भूमिका तत्कालीन काळात घेतली गेली होती. अशा प्रकारचा अज्ञातवास काही काळ कोकणीने अनुभवला होता. या काळोखी वातावरणातून बाहेर पडून अल्पावधीत कोकणी भाषेने अशी उत्तुंग झेप घेतली आहे.

दक्षिण गोव्यातील माजोर्डा गावात दामोदर मावजो यांचा जन्म झाला. मराठी आणि पोर्तुगीज भाषेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. नंतर माध्यमिक शिक्षण इंग्रजीतून झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईत आले. माटुंग्याच्या पोदार महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली. लहानपणापासूनच त्यांना लेखनाची आवड होती. सुरुवातीला साने गुरुजी, नंतर मामा वरेरकर असे ते वाचत असत. तेव्हाच त्यांचे लिखाण सुरू झाले होते. काही लघुकथा त्यांनी लिहिल्या. महाविद्यालयीन काळात एकांकिका, नाटकांमध्ये काम करीत होते. गोव्यातून पहिल्यांदाच ते बाहेर पडले होते. त्यामुळे बहुभाषिक समाज कसा असतो तो त्यांना मुंबईत अनुभवास आला. विविध भाषा, समाज त्यांनी मुंबईतील चार वर्षांत पाहिले. तेव्हा ते अचंबित झाले होते. मराठी नीट येत नाही, याचे मराठी ग्रांथिक आहे, असे त्यांचे मित्र म्हणत असत. मावजो यांना तेव्हा कळत गेले की साहित्याची भाषा वेगळी असते. नंतर मात्र त्यांनी कोकणीमध्येच लिहायला सुरुवात केली. हळूहळू वाचन वाढत गेले. इंग्रजीचे वाचन सुरू होते; पण योग्य वाचनाकडे वळायला काही काळ जावा लागला. गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांची ‘वन हंड्रेड ईयर्स ऑफ सॉलिट्यूड’ ही भाईंची आवडती कादंबरी. शिक्षण पूर्ण करून ते पुन्हा गोव्यात, आपल्या गावात परतले. लहानपणीच वडील गेले होते. त्यामुळे कुटुंबाचे किराणा दुकान होते, तेच ते चालवू लागले. यानिमित्ताने गावातल्या अनेक लोकांशी त्यांचा संपर्क यायचा. गोव्यातल्या ख्रिस्ती समाजाचे अनेक पदर त्यांना जवळून पाहता आले. त्यातूनच त्यांचे लिखाण फुलत गेले. अनेक पात्रे त्यांना सापडत गेली.

१९७१ मध्ये त्यांचा पहिला ‘गांथन’ हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्याला कोकणी भाषा मंडळाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर ‘जागरणा’, ‘रूमडफूल’, ‘तिष्टावणी’ असे काही कथासंग्रह त्यांनी लिहिले. नंतर ते कांदबरी लेखनाकडेही वळले. ‘सूड’ ही त्यांची पहिली कादंबरी. ‘कार्मेलिन’ या कादंबरीचा १९८३ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मान झाला. आखाती देशात गेलेल्या गोव्यातील महिलांचा शारीरिक आणि लैंगिक छळ कसा केला जातो, हे भाईंनी त्यात मांडले होते. ही कादंबरी १४ भाषांमध्ये भाषांतरित झाली. तिने नवे उच्चांक गाठले. इंडियन नॉवेल्स कलेक्टिव्हमध्ये कोकणीतील ‘कार्मेलिन’ ही कादंबरी आहे. भाई केवळ लेखनात राहिले नाहीत. कोकणी राजभाषा, घटक राज्याचा लढा, त्याची पहिली जनमत चाचणी या सर्व आंदोलनांत ते सक्रिय होते. साहित्यिक रवींद्र केळेकर यांनी त्यांना ‘रायटर आणि फायटर भाई’ असे म्हटले होते. समता, न्यायाची त्यांनी कायम पाठराखण केली. धमक्या, भीतीपोटी ते कधी मागे हटले नाहीत. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर त्यांनी लेखकांच्या भाषण स्वातंत्र्यावर ठाम भूमिका घेऊन साहित्य अकादमीला पत्रही पाठवले होते. ७७ व्या वर्षीही ते चौफेर वाचन करतात. साहित्यातले नवे ट्रेंड, पद्धती त्यांना खुणावतात आणि त्यांचे लेखनप्रयोग तेवढ्याच उतसाहाने आजही सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.