नाममुद्रा : ‘खेळा’ला जिंकविणारा प्रशिक्षक

‘खेळात खोटेपणाचे ढोंग नसते. तुम्ही जिंकण्यासाठी तिथे असता. प्रतिस्पर्धी असूनही तुम्ही नियम पाळून एकमेकांशी नीट वागायचे असते. हा मूळ गाभा आहे खेळाचा.
Sanmay Paranjape
Sanmay ParanjapeSakal
Updated on

‘खेळात खोटेपणाचे ढोंग नसते. तुम्ही जिंकण्यासाठी तिथे असता. प्रतिस्पर्धी असूनही तुम्ही नियम पाळून एकमेकांशी नीट वागायचे असते. हा मूळ गाभा आहे खेळाचा. त्यामुळे कोणी कोणाला संपवत नसतो. ती निकोप स्पर्धा असते. खेळच तुम्हाला पुढे नेतो...’ प्रसिद्ध टेबल टेनिसपटू सन्मय परांजपे याचे हे विचार. लहानपणी सर्वच मुलांना क्रिकेट आवडते, तसेच सन्मयचे होते. पण तत्कालीन नियमामुळे त्याला क्रिकेटला प्रवेश मिळाला नाही, आणि तो टेबल टेनिसकडे वळला. आठव्या वर्षी महाराष्ट्राकडून खेळलेला सन्मय पुढच्याच वर्षी ‘स्टेट चॅम्पियन’ झाला. त्यानंतर जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील बाल, किशोर, कुमार, युवा आणि पुरुष गटात त्याने अनेक विजेते, उपविजेतेपदे मिळवली. ११ वेळा तो वेगवेगळ्या गटांतून स्टेट चॅम्पियन ठरला. हा विक्रम अद्याप अबाधित आहे. इतर राज्यांतूनही त्याने चमक दाखवली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक सामने गाजवले. तो जर्मनीत अनेक वर्षे खेळला. तिथे त्याला सर्व सुविधा देणाऱ्या क्लबची ऑफर होती. पण त्याला भारतात काहीतरी करण्याचे उद्दिष्ट होते. सध्या तो अनेक नव्या खेळाडूंना धडे देतोय. प्रख्यात टेबलटेनिसपटू मनिका बात्रा हिने टोकयो अलिंपिकमध्ये ज्या ‘पर्सनल कोच’ला बरोबर नेण्याचा आग्रह धरला होता, तो म्हणजे सन्मयच. त्याच्या ‘तालमी’त तयार झालेल्या किशोर व युवा खेळाडूंनीही नुकतीच धुळ्यातील राज्यपातळीवरील स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.

घरातून त्याला सामाजिक कार्याचीही प्रेरणा मिळाली. त्याने सासवडच्या आमळे गावातील अनाथाश्रमाला भेट दिली. तेव्हा त्या मुलांनाही काहीतरी शिकवावे, असे त्याच्या मनाने घेतले. या मुलांचे पालक अनिल कुडिया यांनी त्याला बळ दिले. सुरुवातीला तिथे फक्त टेबल लावले आणि खेळ दाखवला. अनेक मुलांना खेळाचे नावही माहीत नव्हते. पण हळूहळू पाहून ते शिकू लागले, काहींना गोडी लागली. मग त्यांच्यासाठी मोठ्या जागेचा शोध सुरू केला. त्या मुलांना पुण्यात आणून सन्मयने शिकवायला सुरुवात केली. जागा लहान होती, पण महत्त्वाकांक्षा मोठी होती. सुरुवातीला पाच मुले आली, नंतर ती संख्या १२ झाली. ही सर्व मुले अनाथ होती, त्यांना इतर काही छंदवर्ग नव्हते, त्यामुळे ती यात मन लावून रमलीही. ‘इंडिया खेलेगा’ नावाची प्रशिक्षण संस्था सन्मयने सुरू केली. या माध्यमातून अनेक टेबलटेनिसपटू घडवण्याचे त्याचे काम सुरू आहे.

शिवाय वंचित, अनाथ मुलांच्या प्रशिक्षणासाठी ‘क्रीडा क्रांती प्रकल्प’ सुरू केला आहे. त्यातून सध्या ही बारा मुले प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षणाबरोबरच त्यांची शाळा, खुराक, वैद्यकीय गरजाही पूर्ण केल्या जातात. आता यात ‘लोकबिरादरी’ची दोन आदिवासी मुलेही आली आहेत. शिवाय पुण्यातील काही झोपडपट्ट्यांतील मुलेही तिथे येतात. ही मुले वेगवेगळ्या वयोगटातील आहेत, त्यामुळे त्यांना केवळ खेळाचे प्रशिक्षण न देता, त्या अनुषंगाने इतर व्यायाम, सराव अशाही अनेक गोष्टी शिकवल्या जातात. यातून मुलांचे भविष्य घडावे, असा प्रयत्न आहे. ‘खेळातून सक्षमीकरण’ या संकल्पनेवर तो काम करतो आहे. कोरोनामुळे सर्वच बंद झाले. तेव्हा मुले पुन्हा आश्रमात परतली. तेव्हा ती शिकलेले सर्व विसरतील अशी भीती सन्मयला होती. पण तिथेही मुलांनी खेळाचा सराव सुरू ठेवला होता. मोठ्या मुलांनी तेव्हा प्रशिक्षकाची भूमिका बजावली. आता ही मुले केवळ खेळू शकतात, एवढेच नाही तर स्पर्धेत उतरण्याइतकी त्यांची तयारी झाली आहे, असे सन्मय सांगतो. आणखीही काही अनाथाश्रमांनी सन्मयशी संपर्क साधून त्याच्या या प्रयोगात सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. खेळाचे आपल्या जगण्यातील स्थान काय, याची नेमकी कल्पना सन्मयला आली आहे, हे केवळ त्यांच्या शब्दांमुळे नव्हे, तर त्याच्या प्रत्यक्ष कृतीतूनही चांगलेच प्रतीत होते..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.