‘नाम’मुद्रा : प्रदूषण रोखणारा शेतकऱ्यांचा ‘मित्र’

पर्यावरणाबाबत तो संवेदनशील आहे. प्रदूषणाच्या समस्येचा विचार केला तर त्यातून शेतकऱ्यांना काही फायदा होईल, असा उपाय शोधला पाहिजे, यादृष्टीने त्याने काही प्रयत्न सुरू केले.
‘नाम’मुद्रा : प्रदूषण रोखणारा शेतकऱ्यांचा ‘मित्र’
Updated on

आता थंडीचा महिना सुरू झाला, म्हणजे प्रदूषणाची पातळी वाढण्याचा काळ. देशात नव्हे; तर जगभरात राजधानी दिल्लीचे प्रदूषण सर्वाधिक असल्याचे अनेक अभ्यासकांनी म्हटले आहे. दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी शेतात कचरा जाळत असल्यामुळे शहराचा श्वास कोंडतो. गेल्या अनेक वर्षांतला हा चर्चेचा विषय या काळात महत्त्वाचा ठरतो; पण त्यावर काही उपाय सापडत नाहीत. शेतकऱ्यांवर बंधने घालण्यासारखे काही उपाय झाले; मात्र त्यातून फार काही यश आले नाही. दिल्लीतल्या या प्रदूषणामुळे विद्युत मोहन आणि त्याची आजी वारंवार आजारी पडत असत. विद्युत दिल्लीत वाढलेला, शिकलेला. या जीवघेण्या प्रदूषणाची चर्चा तो ऐकून होता; पण त्यावर ठोस उपाय काही होत नाहीत, हेही त्याने पाहिले होते. म्हणूनच विद्युतने यावर काम करण्याचा संकल्प केला. विद्युत हा ३० वर्षांचा युवक अभियंता.

पर्यावरणाबाबत तो संवेदनशील आहे. प्रदूषणाच्या समस्येचा विचार केला तर त्यातून शेतकऱ्यांना काही फायदा होईल, असा उपाय शोधला पाहिजे, यादृष्टीने त्याने काही प्रयत्न सुरू केले. त्यावर त्याने २०१८ मध्ये काम सुरू केले आणि एका यंत्राचा शोध लावला. हे छोटेखानी यंत्र कुठेही नेता येऊ शकते आणि तिथेच शेतातल्या कचऱ्यावर प्रक्रिया करता येऊ शकते. शेतात राहिलेला काडी कचरा, नारळाच्या सुकलेल्या वाट्या आदी प्रकारचा कचरा या यंत्रात टाकला की त्यातून शेतीच्या वापरासाठी इंधन खत किंवा उपयुक्त रसायने तयार होतात.

याचा वापर पुन्हा शेतीसाठी केला जाऊ शकतो किंवा ते बाजारात विकताही येऊ शकते. जेणेकरून शेतकऱ्याला त्यातून काही पैसाही मिळू शकतो. या यांत्रिक प्रक्रियेत ९८ टक्के कार्बन उत्सर्जन कमी होऊ शकते. हे यंत्र थेट शेतात नेऊन ट्रॅक्टरला जोडता येते, त्यामुळे कचरा वाहतुकीचा खर्चही वाचतो. विद्युत मोहनने ‘टकाचार’ नावाची संस्था स्थापन केली. त्याद्वारे त्याने उत्तराखंडमध्ये या यंत्राचा पायलट प्रकल्प राबवला. त्यानंतर अनेक ठिकाणी या यंत्राची चाचणी केली. आतापर्यंत काही हजार शेतकऱ्यांशी ‘टकाचार’ने संपर्क साधून हजारो टन कचऱ्यावर प्रक्रिया करून दाखविली आहे. या यंत्राचे महत्त्व आणि प्रदूषणाचे परिणाम यांची माहिती त्याने शेतकऱ्यांना दिली आहे. शेती कचरा जाळण्याऐवजी ही प्रक्रिया वापरली तर अधिक उत्पन्न मिळू शकते हेही विद्युत नमूद करतो.

विद्युतच्या या प्रकल्पाला गेल्या वर्षी ‘अर्थशाॅट एन्व्हायर्न्मेंटल प्राईज’ने गौरविण्यात आले. प्रिन्स विल्यम्स यांनी या पुरस्काराची सुरुवात केली. ग्लोबल वॉर्मिंगपासून पृथ्वीचे रक्षण करण्याचे काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. विद्युत मोहनच्या या यंत्राची निवड जगभरातील ७५० प्रकल्पांमधून केली गेली. २०३० पर्यंत विद्युतची ‘टकाचार’ संस्था ३० लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून चार अब्ज डॉलरचे उत्पन्न त्यांना मिळवून देऊ शकते. पर्यावरण रक्षणासाठी सर्वांची साथ मिळाली पाहिजे. यासाठी तो सध्या सुरू असलेल्या ग्लासगो हवामान परिषदेतही सहभागी झाला होता. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी त्याची चर्चा झाली. जगभरात शेतीमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची किंमत सुमारे १२ लाख डाॅलर आहे. हा कचरा जाळून होणाऱ्या प्रदूषणामुळे दरवर्षी सुमारे ७० लाख लोकांचा बळी जातो. कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा भारताचा संकल्प आहे. तो तडीस नेण्यासाठी विद्युतसारख्या तरुणांचा हा मोलाचा हातभार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.