पवारच लक्ष्य

चर्चा किंवा युक्तिवादाचे उद्दिष्ट हे प्रगती साधणे हे असावे; दुसऱ्यावर कुरघोडी करणे हे नको.
sharad pawar
sharad pawar sakal
Updated on

जुसेफ जुबेर, लेखक, विचारवंत

महाराष्ट्रात आल्यावर शरद पवार यांच्याशिवाय भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांसमोर दुसरा विषयच नसतो, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारच्या आपल्या दौऱ्याने पुनश्च एकवार दाखवून दिले आहे! पंतप्रधानांचा हा दौरा त्यामुळेच नेमका कशासाठी होता, यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. खरे तर मोदी शिर्डीला आले होते ते साईचरणी नतमस्तक होण्यासाठी आणि तसे ते झालेही;

मात्र त्यानंतरच्या काही तासांतच शिर्डी परिसरातच झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना, त्यांनी थेट पवारांचे नाव घेणे टाळत त्यांनाच लक्ष्य केले. मग, मोदी यांच्यापेक्षा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वा देवेंद्र फडणवीस हे अधिक स्पष्टवक्ते म्हणावे लागतील! त्याचे कारण म्हणजे या दोघांनी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट पवार यांचे नाव घेत ‘पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले?’ असे रोखठोक सवाल केले होते.

मोदी यांनी त्या प्रश्नात थोडा बदल करून, ‘केंद्रात दहा वर्षें कृषिमंत्री राहिलेल्या एका नेत्याने शेतकऱ्यांसाठी काय केले?’ असा प्रश्न विचारला. आता पवार यांनी कृषिमंत्री म्हणून शेतकऱ्यांसाठी नेमके काय केले, हा विषय थोडा बाजूला ठेवून असा सवाल विचारावासा वाटतो की ‘पवारांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नसेल,’ तर मग मोदी सरकारनेच पवारांना ‘पद्मविभूषण’ हा किताब शेती आणि सहकार क्षेत्रातील कामगिरीबाबत का बहाल केला? अर्थात, या प्रश्नाचे उत्तर हे सर्वांनाच ठाऊक आहे आणि ते म्हणजे भाजप नेते आकडेवारीचा सोईस्करपणे वापर करून वकिली युक्तिवाद करतात.

संख्या एकच. पण कधी ती स्तुतीसाठी, तर कधी टीका करण्यासाठी कशी वापरता येते, याचे हे भाषण म्हणजे पुरावा आहे. खरे तर या शेतकरी मेळाव्यात केंद्र तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी काय काय करत आहे, त्याचा पाढा वाचल्यानंतर मोदी यांनी पवार हा विषय आणण्याचे कारण नव्हते.

महाराष्ट्रात गेले काही दिवस मराठा आरक्षणाचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण तसेच त्यांना मिळत असलेला अभूतपूर्व पाठिंबा यामुळे एकनाथ शिंदे यांचे तीन इंजिनांचे सरकार कमालीचे अडचणीत सापडले आहे. या पार्श्वभूमीवर मोदी त्यासंबंधात काही वक्तव्य करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, आरक्षण हा विषय इतका गुंतागुंतीचा होऊन बसला आहे की त्यासंबंधात काहीही बोलणे म्हणजे अडचणीतच सापडणे, हे मोदी यांना ठाऊक आहे. त्यामुळे त्यांनी तो विषय टाळत पवारांना लक्ष्य केले आणि बातम्यांमध्ये मथळे मिळवण्याचा सोयीस्कर मार्ग स्वीकारला.

आता पवार यांनी ‘पंतप्रधान बिनदिक्कत खोटे बोलतात!’ अशा शब्दांत मोदी यांच्या आरोपाचे तपशीलवार खंडन केले आहे. मात्र, मोदी यांच्या या सवालामुळे एक गोष्ट नक्की झाली आणि ती अर्थातच पवारांच्या पथ्यावर पडणारी आहे. अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही बलदंड नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारला साथ देण्याचा निर्णय घेऊन मंत्रिपदे स्वीकारली, तेव्हापासून शरद पवार यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. शिवाय, त्यामुळे विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीतही त्यांच्याबाबत संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकते.

मात्र, आता दस्तुरखुद्द मोदी यांनीच पवारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्यामुळे महाराष्ट्रातील लढाई भाजप थेट पवारांशीच करणार, यावर शिक्कामोर्तब झाले आणि मुख्य म्हणजे राष्ट्रीय पातळीवर पवार हे मोदीविरोधकच आहेत, ही बाब ठळकपणे अधोरेखित झाली. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीतील प्रमुख नेते किमान भाजपसाठी तरी पवारच आहेत, हेही स्पष्ट झाले. खरे तर पवारांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात, २०१५ मध्ये बोलताना मोदी यांनी पवार यांच्यावर मुक्तकंठाने स्तुतिसुमने उधळली होती आणि त्यांच्या शेती तसेच अन्य क्षेत्रांतील कामगिरीचा गौरवही केला होता.

मात्र, आता तेच मोदी ‘पवारांच्या कृषिमंत्रिपदाच्या काळात शेतकऱ्यांना वेळेवर पैसे कसे मिळत नव्हते आणि आमचे सरकार आल्यावर त्यांच्या खात्यात कसे थेट पैसे जमा होत आहेत,’ असा पाढा वाचू लागले आहेत. एकंदरित करायला गेलो काय आणि झाले काय, असाच प्रश्न मोदी आणि मुख्य म्हणजे राज्यातील भाजप नेत्यांना मोदी यांच्या या सवालामुळे पडला असणार. महाराष्ट्रात सध्या कमालीचे अस्थिरतेचे वातावरण आहे. जरांगे-पाटील यांनी परत सुरू केलेल्या उपोषणानंतर परिस्थिती कमालीची चिघळली आहे.

सर्वपक्षीय नेत्यांसाठी जाहीर केलेली गावबंदी कसोशीने अमलात आणली जात आहे. मराठा तरुण आता पेटून उठला आहे आणि काही ठिकाणी एसटी बसगाड्यांची जाळपोळही सुरू आहे. त्यामुळे यातून मार्ग कसा काढायचा, असा प्रश्न शिंदे सरकारपुढे आ वासून उभा आहे. तेव्हा मोदी यांनी आपल्या शिर्डीभेटीत त्यासंबंधात काही युक्तीच्या गोष्टी कदाचित सरकार पक्षाला सांगितल्याही असतील. मात्र, विकास प्रकल्पांच्या उद्‍घाटनानंतरच्या भाषणात त्यांनी उकरून काढलेल्या राजकीय उखाळ्या-पाखाळ्या अप्रस्तुत होत्या. त्या कदाचित सरकार आणि भाजप यांच्याच अंगलट येऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.