रंगी रंगला...कालिदास !

आषाढस्य प्रथम दिवसे...हटकून आठवण येते ती कालिदासाची. सौंदर्याचा उपासक असलेल्या कालिदासाला रंगांची विलक्षण ओढ होती.
रंगी रंगला...कालिदास !
रंगी रंगला...कालिदास !sakal
Updated on

आषाढस्य प्रथम दिवसे...हटकून आठवण येते ती कालिदासाची. सौंदर्याचा उपासक असलेल्या कालिदासाला रंगांची विलक्षण ओढ होती. त्याच्या या दृष्टीचा प्रत्यय त्याने केलेल्या वर्णनात जाणवल्याशिवाय राहात नाही. त्याच्या साहित्यातील ‘रंगोत्सवा’चा हा मर्मग्राही आस्वाद.

डॉ. पंकज भांबूरकर

निसर्गातील रंगांच्या विविध छटा कलादृष्टीने हेरून, त्यांच्यातील भावसौंदर्याची वाचकांना प्रचिती देणाऱ्या चित्रकलामर्मज्ञ कालिदासाला तेजाचे आकर्षण होते. त्याच्या काव्य-नाटकातील सर्गवार उल्लेखांवरून ते दिसून येते. निसर्गातील सर्व प्रकारच्या प्रकाशाची त्याच्या मनावर विलक्षण मोहिनी आहे. स्वाभाविकच ज्यांच्यापासून मानवाला तेजाची प्राप्ती होते, त्या सूर्य, चंद्र, नक्षत्रादी आकाशस्थ तेजोगोल यांचा उल्लेख त्याने पुनरुक्तीचा दोष पत्करूनही केला आहे. जिथे जिथे तेज किंवा प्रकाश तिथे तिथे कालिदासाची चित्तवृत्ती गुंतली आहे. या आकर्षणामधूनच त्याच्या प्रकाशविषयक उपमा जन्मल्या आहेत. दृश्यकलेत प्रकाशाला अनन्यसाधारण महत्त्व असते. प्रकाशामुळेच चराचर सृष्टीतील वस्तूंचे आकार व रंग गोचर होतात. बालकवींसारख्या आधुनिक रोमँटिक कवीच्या ठाई निरनिराळ्या रंगांची व रंगांमधील सूक्ष्म छटांची जशी अनिवार आसक्ती स्पष्टपणे दिसते, तशीच कालिदासाच्याही ठिकाणी दिसून येते.

इंग्रजीतील स्पेन्सर व किट्स हे कवी दृश्यामधील रंगांच्या गहिऱ्या छटा हेरून काढून त्यांचे तितकेच गहिरे वर्णन करण्यात चतुर आहेत. रोमँटिक कवींच्या ठिकाणी ती आसक्ती थोड्याफार प्रमाणात दिसून येते. ज्यांच्या साहित्यात ती अतिरेकाला गेलेली असते, अशांना इंग्रजीत ‘कलरमाइंडेड क्रोमेस्थेटिकल’ म्हणतात. अशा लोकांना संगीतातील सूर ऐकताच काहीतरी रंगांचा भास होतो. सामान्य लोकांच्या दृष्टीने हे चमत्कारिक, असंभाव्य आहे; परंतु ज्यांची मने कमालीची संवेदनशील असतात, अशा कवींच्या बाबतीत हे शक्य आहे.

संगीत आणि चित्रकला

संगीत आणि चित्रकला या दोन्ही कलांच्या कक्षा जिथं एकमेकांना स्पर्श करतात त्या ‘दृकसंगीत’ संकल्पनेला जन्म देणारा ‘सायनेस्थेशिया’ हा प्रकार कदाचित कालिदासालाही प्रेरक ठरला असावा! व्हॅन गॉग, कँडिनस्की, मोंद्रियानयासारख्या चित्रकारांना, स्क्रीयाबीन, मेसियन, लिगेती यासारख्या रचनाकारांना, बॉदलेअर, नबोकाव या कादंबरीकारांना जसा तो प्रेरणास्त्रोत ठरला, तसाच कालिदासालाही ठरला असावा. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात बाळसं धरलेली ही मानसशास्त्राधिष्ठित संकल्पना असली तरी ज्या सर्जकांना संगीत आणि चित्रकला या दोन्ही कलेत गती आहे, त्यांना नवनिर्मितीसाठी ऊर्जास्त्रोत पुरवते. कालिदासाचे चित्रकलेचे ज्ञान व संगीताविषयी त्याने काव्य- नाटकात केलेल्या उल्लेखांशी ही संकल्पना साधर्म्य राखते. बाणभट्ट, स्पेन्सर, बालकवी यांच्याप्रमाणेच कालिदासाच्या ठिकाणीही रोमँटिक कवीला साजून दिसेल अशी रंगांची अनिवार आसक्ती दिसून येते. त्याच्या काव्य नाटकात कथानक रंगवीत असताना किंवा स्वतंत्रपणेही निसर्गाची जी चित्रदर्शी वर्णने आहेत, त्यात त्याने रंगांची अनिवार आसक्ती पूर्ण करून घेतली आहे.

यक्ष मेघाला प्रवासादरम्यान लागणारे विविध पर्वत, नद्या इत्यादींची माहिती देताना विंध्य पर्वताच्या पायथ्याशी खडकाळ प्रांतातून वाहणाऱ्या नर्मदेचं चित्रदर्शी वर्णन मेघदूतात आहे. नर्मदा वर्णनाच्या ह्या श्लोकापूर्वी आम्रकूट पर्वताचं वर्णन करणाऱ्या श्लोकातही विशिष्ट रंगांकडे निर्देश आहे. दोन्ही स्थळांचं कालिदासाचं विहंगावलोकन एखाद्या चित्रकाराच्या तोलामोलाचे आहे. कालिदासाचे व्हिज्युअलायझेशन महत्त्वाचे. खडकाळ भागातून वाहणारी नर्मदा जवळून पाहणे वेगळे. हेच दृश्य आकाशातून खाली दृष्टिक्षेप टाकत पाहतांना आपल्या दृष्टिपथात ते सबंध दृश्य एखाद्या चित्रपटासारखे दिसते. अशा स्थितीत पर्वताचा विस्तृत भाग कवीला जणू हत्तीचे काळे शरीर वाटले आणि प्रवाह पुष्कळ ठिकाणी फाटल्यामुळे अस्ताव्यस्त वाहणारी शुभ्र फेसाळ नर्मदा हत्तीच्या शरीरावर पांढऱ्या रंगाने चित्रकारी (वेलबुट्टी) काढावी, अशी वाटली.

पिकलेल्या आम्रफळांमुळे ज्याच्या सर्व बाजू झाकून गेल्या आहेत, अशा आम्रकूट पर्वतशिखरावर आरुढ झाल्यामुळेच पर्वताला पृथ्वीच्या स्तनाचं सादृश्य प्राप्त झालं, असं वर्णन आहे. एकीकडे काळा-पांढरा तर दुसरीकडे पिवळा-काळा असा रंगसंकेत दिसतो. रघुवंशात, पुष्पक-विमानातून दिसलेल्या प्रयागाजवळील गंगा-यमुना संगमाचे वर्णन रघुकाराने पुढीलप्रमाणे केले आहे. गंगेच्या शुभ्र प्रवाहात यमुनेचे कृष्णवर्ण उदक मिळाल्यामुळे तो कृष्णसर्पाने वेष्टीत अशा शंकराच्या शुभ्र तनुसारखा दिसत होता. मालविकाग्निमित्रात, चित्रकलाचार्यांनी काढलेल्या ज्या समूहचित्राचं अवलोकन राणी धारिणी करीत आहे, त्यातील रंग ताजे, ओले असल्याचं कालिदास विषेशत्वे नमूद करतो. याचा अर्थ असाही होऊ शकेल, की चित्र पूर्ण होते न होते तोच त्याच्या दर्शनाची अभिलाषा बाळगत लगबगीने चित्रशाळेत पोहोचणारी धारणी रसिका होती, चित्रकलेविषयी आस्था राखणारी होती..! किंवा कदाचित चित्रकलाचार्यांनीही आपल्या अपेक्षेप्रमाणे चित्र पूर्ण झाले आहे ना? असा राणीचा अभिप्राय घेण्यासाठीही तिला पाचारण केले असावे..जेणेकरून चित्रातील रंग ओले असताना त्यात काही बदल अपेक्षित असतील तर चित्रकारास ताबडतोब करता यावेत. रंग वाळले की त्यात बदल करणे कदाचित दुरापस्त होत असावे! चित्रातील रंग ओले असतानाच राजाही ते चित्र बघतो, त्यामुळे चित्रातील मानवाकृतींच्या शरीरकांतीचा तजेलदारपणा जास्त उठावदार दिसत असावा. असे अनेक अर्थ या ओल्या रंगांचा उल्लेख केल्यामुळे होऊ शकतात. कुमारसंभवातही, चित्रातील रंग भरण्याचे महत्त्व त्याने अधोरेखित केलं आहे.

‘‘रेखाटलेले चित्र जसे कुंचल्याने रंग भरताना उमलत जावे तसे पार्वतीचे अंग प्रत्यंग विकसित होत होते.’’ कागदावर रेखाटलेले विविध आकार रंगलेपनानंतर हळूहळू त्रिमित रूपात कसे बदलत जातात, ही रूपांतरणाची प्रक्रिया कालिदासाने जवळून पाहिली असावी किंवा अनुभवलीही असावी. म्हणूनच सूर्यकिरणांनी कमलपुष्प विकसित व्हावे अशी उपमा देण्याअगोदर त्याने "उन्मीलितं तुलीकयेव.. " म्हणत चित्राची उपमा प्रथम देणे पसंत केले. केवळ रेखांकन म्हणजे संपूर्ण चित्र नव्हे, तर त्यात रंग भरल्यानंतरच ते ‘चित्र’ या संज्ञेस पात्र ठरते, असे त्याला सुचवायचे असावे.

भावविभोर अवस्था

अभिज्ञानशाकुंतल नाटकातही, दुष्यंत राजाने शकुंतलेचे काढलेले स्मरणचित्र अपूर्ण असल्याचा उल्लेख असून त्याची पार्श्वभूमी अद्यपि रंगवायची राहून गेल्याचे दुष्यंत विदूषकास सांगतो. दुष्यंताचा अश्रूबिंदू ओघळून चित्रातील शकुंतलेच्या गालावर पडल्यामुळे तिच्या गालावरील रंग वर आल्याचाही उल्लेख आहे. चित्रात रंगलेपन करताना दुष्यंताची भावविभोर अवस्थाच या वर्णनातून स्पष्ट होते. चित्रकलेत छायाप्रकाशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सूर्यप्रकाशामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक रंगांच्या छटा गोचर होतात. प्रभातकालीन, मध्यान्हीचा व सूर्यास्ताच्या वेळचा प्रकाश हे सर्व प्रकाश असले तरी त्यांच्या छटा निराळ्या आहेत. त्याचप्रमाणे एका शुभ्र वर्णातही कितीतरी सूक्ष्म छटा असतात. सामान्य डोळ्यांना या छटा दिसत नसल्या तरी कवीला व चित्रकाराला त्या अचूक दिसतात. कालिदासाला तर परमेश्वराने दुहेरी आहेर बहाल केला होता. त्याने अनेक ठिकाणी शुभ्र वर्णाचा उल्लेख केला आहे. इतके सांगून त्याचे कधीच समाधान झालेले दिसत नाही, कारण चित्रकाराची सौंदर्यदृष्टी प्राप्त झालेला हा प्रतिभाशाली महाकवी आहे. शुभ्रतेचे वर्णन करण्याचा जिथे जिथे प्रसंग आला तिथे तिथे निसर्गातील विशिष्ट पदार्थांशी त्याची सांगड घालून त्याने एकाच शुभ्र वर्णातील छटा उत्कृष्टपणे प्रकट केल्या आहेत.

श्वेत रंग कालिदासाला अत्यंत प्रिय होता. त्याच्या साहित्यात विविध रंगांच्या उल्लेखात सर्वाधिक श्वेत रंगाशी संबंधित आहेत. इतरही रंगांच्या सूक्ष्मतम छटा त्याने विविध प्रसंगांच्या चित्रदर्शी वर्णनात दाखविल्या आहेत. महाकवीचा रंगांचा, त्यातून व्यक्त होणाऱ्या विविध भावभावनांचा, त्यांच्या प्रतीकात्मक अर्थाचा, दोनहून अधिक रंगांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या वेगळ्याच रंगछटांचा, विविध रंगांच्या तीव्रतेचा, त्यांच्या उजळ,मध्यम व गडद छटांचा, त्यांच्या पोताचाही अभ्यास एखाद्या चित्रकाराच्या तोलामोलाचा आहे. त्याच्या साहित्यकृतीतील रंगांची किमया एकमेवाद्वितीय आहे.

(लेखक चित्रकार आहेत.)

रंगांचं अंतरंग

कालिदासाला रंगांचं अंतरंग चांगलं उमजलं होतं. रंगांचा एकजिनसीपणा आणि त्यांच्या विविध छटा, एकीकडे विशिष्ट रंगातून अभिव्यक्त होणारा क्रोध आणि दुसरीकडे दुसऱ्याच रंगातून जाणवणारी मृदुता, कधी आक्रस्ताळेपणा तर कधी सावध स्तब्धता, कधी अगदी उतावीळ तर कधी घनगंभीरता, कधी नुसता विदुषीथाट तर कधी वैराग्य तटस्थता. रंगांचा हा मायावी खेळ, रंगांची ही अनंत रूपे जशी प्रकाशातून स्त्रवतात तशीच ती कालिदासाच्या साहित्यातही जन्म घेतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.