फुटीर प्रवृत्तींना आवरा

१९८०च्या दशकातील खलिस्तानी चळवळीचे नेते जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचा अवतार म्हणवून घेणारा हा अमृतपाल भिंद्रनवाले यांच्याच गावात होता
अमृतपाल सिंग
अमृतपाल सिंगsakal
Updated on

गेले तब्बल ३६ दिवस केवळ पंजाब पोलिसच नव्हे तर केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या हातावर तुरी देऊन मोकाट फिरणारा अमृतपाल सिंग अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. मात्र, त्यास या यंत्रणा अखेरपर्यंत अटक करू शकल्या नाहीत, तर तोच स्वत:हून पोलिसांना शरण आला आहे, असे दिसते. त्यामुळे या शरणागतीनंतर अनेक प्रश्न समोर आले आहेत. शिवाय, वयाची तिशीही न गाठलेला हा अमृतपाल पोलिसांना शरण आला तोही मोठ्या नाटयपूर्ण रीतीने.

१९८०च्या दशकातील खलिस्तानी चळवळीचे नेते जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचा अवतार म्हणवून घेणारा हा अमृतपाल भिंद्रनवाले यांच्याच गावात होता आणि तेथील गुरुद्वारात प्रवचन केल्यानंतर त्यानेच तेथील ‘ग्रंथीं’ना पोलिसांना पाचारण करण्यास सांगितले, अशी कहाणी सांगितली जात आहे. तर पंजाब पोलिस आणि केंद्रीय तपास यंत्रणा,

‘आम्ही त्यास चोहोबाजूंनी घेरल्यामुळे, त्यास शरणागतीशिवाय पर्याय उरला नव्हता!’ असे सांगत आहेत. मात्र, गेला सव्वा महिना पंजाबातच वास्तव्य करून असलेल्या अमृतपालचा ठावठिकाणा देशातील या सुरक्षा यंत्रणांना लागू शकत नव्हता, यावर विश्वास ठेवता येणे कठीण आहे. त्यामुळे अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यासाठी जातीने पावले उचलावी लागली आणि शिवाय पंजाब पोलिसांच्या दिमतीला केंद्रीय तपास यंत्रणांबरोबरच आसाम पोलिसांची मदतही द्यावी लागली, असे दिसत आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना, शहा यांनी शनिवारीच ‘अमृतपाल आता फार दिवस मोकाट फिरू शकणार नाही!’ असे उद्‍गार काढले होते. पण तो ताब्यात येण्यास सव्वा महिना का लागावा, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. त्यामुळेच या शरणागतीचे गूढ गडद झाले आहे. मात्र आता या निमित्ताने अमृतपाल सिंगचे कदापिही उदात्तीकरण होऊ नये, यासाठी जागरूक राहावे लागेल. ऐंशीच्या दशकातील परिस्थिती आणि सध्याची स्थिती यात खूप फरक असला तरी इतिहासातून बोध घेण्याची गरज कायमच असते.

केंद्र, राज्य सरकार व तपासयंत्रणा यांनी कायद्यानुसार योग्य ती कारवाई केलीच पाहिजे. पंजाबात फुटीरतेला चिथावणी मिळेल, अशा रीतीची त्याची भाषा होती. त्यास पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तचर यंत्रणेचा छुपा पाठिंबा होता, असा दावा सरकारनेच केला आहे. त्यामुळे तो आणि त्याची ‘वारिस दे पंजाब’ ही संघटना यांच्यावर सतत लक्ष ठेवावे लागेल.

अमृतपालच्या या शरणागतीमुळे १९८० या दशकातील खलिस्तानवादी चळवळ आणि भिंद्रनवाले यांच्या कटू आठवणी जाग्या होणे स्वाभाविक आहे. मात्र, त्यानंतरच्या चार दशकांत आरपार बदलून गेलेल्या समाजकारणामुळे आता खलिस्तानवादी चळवळीला फारसा प्रतिसाद नाही, हे स्पष्ट दिसत आहे. तरीही पंजाबमध्ये अशा प्रवृत्ती अधूनमधून डोके वर का काढत आहेत, याचा गांभीर्याने विचार केवळ पंजाबमधील ‘आप’च्या सरकारबरोबरच केंद्रातील भाजप सरकारलालाही करावा लागणार आहे.

खरे तर ज्या ‘वारिस दे पंजाब’ या फुटीरतावादी चळवळीचे नेतृत्व तो करत होता, ती त्याने स्थापन केलीच नव्हती. मात्र, पंजाबचे स्वास्थ्य बिघडवणाऱ्या या प्रवृत्तींशी पंजाबमध्ये गेली अनेक वर्षे सुळसुळाट झालेल्या ‘ड्रग्स’चा हात जसा असू शकतो, त्याचबरोबर दोन वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनात घुसलेल्या अपप्रवृत्तीही कारणीभूत आहेत, असे म्हणावे लागते. या शेतकरी आंदोलनातील दीप सिद्धू या तरुणाशी तेव्हा दुबईत आपला व्यवसाय करणाऱ्या अमृतपालचे निकटचे संबंध होते.

याच सिद्धूने या आंदोलनात थेट लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला आणि आंदोलनास हिंसक वळण लागले. ‘वारिस दे पंजाब’ नावाची एक संघटना या दरम्यानच सिद्धूने स्थापन केली होती. ‘वारिस दे पंजाब’चा अर्थ ‘पंजाबचे खरे वारसदार’. मात्र, पुढे सिद्धूचा अपघाती मृत्यू झाला आणि अमृतपाल भारतात परतला तोच भिंद्रनवालेच्या वेषात! तेव्हापासून या संघटनेची सूत्रे तर त्याने हाती घेतलीच; शिवाय ‘भिंद्रनवाले 2.0’ म्हणजेच भिंद्रनवालेचा नवा अवतार, अशी त्याची ओळख झाली. तेव्हापासूनच हे भिंद्रनवालेचे भूत पुन्हा पंजाबच्या डोक्यावर स्वार होण्याचा धोका निर्माण झाला होता. आता त्याच्या या शरणागतीनंतर तरी अशा प्रवृत्ती पुन्हा वाढीस लागणार नाहीत, याकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे.

अमृतपालची प्रतिमा गेल्या काही दिवसांत एक लोकप्रिय आणि धडाडीचा नेता म्हणून, विशेषत: दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर उभी राहत आहे. या पार्श्वभूमीवर या प्रवृत्तींना वेळीच आळा घातला गेला नाही तर काय होऊ शकते ते जवळपास एक तप अतिरेक्यांच्या कारवाया सहन करणाऱ्या पंजाबला चांगलेच ठाऊक आहे. त्यातच ‘वारिस दे पंजाब’ या संघटनेचा भर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंजाबच्या विकासासाठी काहीच केले गेले नाही,

या मुद्यावर आहे. त्यामुळे अमृतपाल सिंगला अटक केली एवढ्यावर समाधान मानून चालणार नाही. भिंद्रानवाले काय किंवा अमृतपाल सिंग काय, वेगवेगळ्या कारणांनी भरकटलेल्या, वैफल्यग्रस्त तरुणांना हाताशी धरत असतात. अशांना धार्मिक-भावनिक आवाहने करून आपल्या जाळ्यात ओढण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. या प्रक्रियेला ब्रेक लावणे हे प्रामुख्याने राज्य सरकारचे काम आहे आणि त्या कामासाठी केंद्राने पाठबळ पुरविणेही आवश्यक आहे.

कुठलीही पोकळी निर्माण झाली, की ती भरून काढण्यासाठी या विघातक शक्ती पुढे सरसावतात. त्यामुळेच एकीकडे फुटीरतावादी कारवायांना आळा घालतानाच पंजाबचा आर्थिक-सामाजिक विकास आणि तेथील ‘ड्रग माफियां’ना चाप लावणे, याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. अन्यथा, खलिस्तानी चळवळीच्या जखमा पुन्हा भरभरून वाहू लागतील. ते कोणाच्याच हिताचे नाही.

स्वतःच्या धारणांविषयी माथेफिरू लोक अगदी ठाम आहेत आणि शहाणीसुरती मंडळी मात्र अनेक शंकांनी ग्रासलेली आहेत, ही या जगाची शोकांतिका म्हणावी लागेल.

— बर्ट्रांड रसेल, तत्त्वज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()