‘आर-पार’चा लढा की जुनाच पाढा?

Naxalite attack
Naxalite attack
Updated on

सुरक्षा दलाचे दोन हजार जवान विरुद्ध दीड-दोनशे नक्षलवादी या संघर्षात आपले जवान सहज जिंकतील, असा आत्मविश्वास असताना बस्तरच्या जंगलात आक्रीत घडले. नक्षलवाद्यांनी जोरदार हल्ला चढवत आपले अस्तित्व संपलेले नाही, असा इशारा सुरक्षा यंत्रणेला दिला. मोदी यांच्या कार्यकाळात नक्षलवाद निव्वळ कमीच झाला नाही तर तो संपला, या दाव्यालाही या हल्ल्याने टाचणी लावली आहे. बस्तरच्या जंगलात नक्षलवाद्यांचे शिबिर लागले असल्याची ‘गुप्त’ माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवळपास दोन हजार जवानांनी पाच ठिकाणांवरून शोधमोहीम सुरू केली असताना त्यातील एक पथक सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेजवळच्या जंगलात नक्षल्यांनी लावलेल्या सापळ्यात अलगद अडकले. या पथकातील २३ जणांची जहाल नक्षलवाद्यांनी अक्षरशः चाळण केली. हा हल्ला एवढा सुनियोजित होता की, जंगलात मोक्याच्या जागांवर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला तेव्हा नजीकच्या गावातील घरांमध्ये लपण्यासाठी गेलेल्या जवानांचेही प्राण वाचू शकले नाहीत. याचे कारण या गावातील घरे रिकामी करून नक्षलवादी तेथेही दबा धरून बसले होते. त्यामुळे पोलिसांना नक्षल्यांचे शिबिर सुरू असल्याची मिळालेली माहिती खरेच ‘गुप्त'' होती की नक्षल्यांनी जाणीवपूर्वक पेरली होती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नक्षल्यांच्या हालचालीबाबत सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळणे, मग यंत्रणेने मोहीम हाती घेणे आणि सुरक्षा दलाचे जवान अलगद नक्षल्यांच्या सापळ्यात अडकणे, ही आजवरच्या सर्वच मोठ्या हल्ल्यांची ‘टेम्प्लेट’ याही हल्ल्यात दिसून येते. मात्र, असे वारंवार का होते, हा खरा चिंतेचा विषय आहे. संख्याबळ आणि शस्त्रांच्या बाबतीत तुलनेने कमी असलेले नक्षली सुरक्षा दलांवर नेहमीच भारी पडतात. याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या सावधानतेत ते कधीही शिथिलता येऊ देत नाहीत. याउलट मोठा फौजफाटा आणि तथाकथित ‘इंटेलिजन्स इनपुट’ यावर अवलंबून असलेले आपले जवान पुरेशी सावधता बाळगत नाहीत.  या वेळी नेमका हाच फरक नक्षलवाद्यांना त्यांची ताकद दाखविण्याची संधी उपलब्ध करून देत असतो. सुरक्षा दलांच्या संयुक्त मोहिमेत कोणत्याही प्रकारचे ‘इन्टेलिजन्स वा ऑपरेशनल फेल्युअर’ नाही, असे ‘सीआरपीएफ’चे प्रमुख कुलदीप सिंग यांनी म्हटले आहे. तरीही एवढ्या मोठ्या संख्येने जवान मारले जात असतील तर मग ही मोहीम जवानांनी योग्य पद्धतीने राबवली नाही, असा त्याचा सरळ अर्थ निघतो. या ‘चकमकीत'' ३० नक्षलवादी ठार झाल्याचाही दावा सुरक्षा दलांकडून करण्यात येत आहे. परंतु, एक महिला नक्षलवादी वगळता एकाचाची मृतदेह यंत्रणेच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे हा दावा कितपत मान्य करावा, हाही सवाल आहेच.
 नक्षल्यांच्या गोरील्ला आर्मीचा प्रमुख असलेल्या हिडमा आणि त्याच्या साथीदारांच्या उपस्थितीत दीड-दोनशे नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली. यात दोन हजार जवान सहभागी होते. हिडमा याने आतापर्यंत पोलिसांवर अनेक हल्ले घडवून आणले असून त्याच्यावर ४५ लाखांचे बक्षीसही आहे. त्याला संपवले तर या भागातील नक्षल चळवळीला तो मोठा धक्का ठरेल, असे मानून शोधमोहीम हाती घेतली होती. परंतु, हिडमाने डाव उलटवला. या हल्ल्यानंतर सैन्यदलाच्या मदतीने ही विषवल्ली कायमची संपवा, असा सूर लावण्यात येत आहे. ही भावना समजण्यासारखी असली तरी लष्करी कारवाई हाती घेऊन नक्षल्यांचा खात्मा करणे सोपे नाही. नक्षल्यांचा प्रभाव असलेल्या भागात अशा कारवाईत निरपराध आदिवासी मारले जाण्याची शक्यता आहे.  हा धोका पत्करण्याची राज्यकर्त्यांची तयारी आहे काय, यावर पुढील लढाईचे भवितव्य अवलंबून आहे.. हे सारे ध्यानात घेऊन सरकारने ‘आर-पार’ची लढाई सुरू केली तरच काही वेगळे होत आहे, असे म्हणावे लागेल. अन्यथा पुन्हा पहिले पाढे पंचावन्न....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.