- लता छत्रे
‘हे भिक्षूंनो स्वयंप्रकाशी व्हा, अन्य कोणा व्यक्तीला शरण जाण्याऐवजी स्वत:ला शरण जा.’ असा संदेश गौतमबुद्धांनी आपल्या शिष्यांना दिला आहे. ‘दीघनिकाय’ या पाली ग्रंथामधील ‘महापरिनिब्बानसुत्ता’मध्ये ते असे सांगतात की अन्य व्यक्तीवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे रहा, आत्मनिर्भर बना.
गौतमबुद्ध भिक्षूंना जेव्हा ‘स्वयंप्रकाशी व्हा’, असे सांगतात तेव्हा त्यांना असे अभिप्रेत आहे, की भिक्षूंनी धर्मविचार आणि विनयविचार समजून घेऊन ते आत्मसात केले पाहिजेत. धर्मविचार म्हणजे चार आर्यसत्ये आणि त्यांना अनुसरून येणारे क्षणिकता आणि अनात्मा याविषयीचे विचार;
तर विनयविचार म्हणजे भिक्षूंनी संघामधील इतर भिक्षूंशी आणि भिक्षूणींशी तसेच संघाबाहेर सामान्यजनांशी वागण्याविषयीचे नियमविचार. भिक्षूंनी विनयधर, धर्मधर आणि बहुश्रुत असणे म्हणजे भिक्षूंनी स्वयंप्रकाशी असणे होय.
कारण बुद्धांचा असा विश्वास आहे की, भिक्षू जेव्हा अशाप्रकारे स्वयंप्रकाशी होतील तेव्हाच ते धर्माविषयी विचारल्या गेलेल्या उलटसुलट प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊ शकतील. लोकांच्या मनात बुद्धविचारांविषयी शंका किंवा गोंधळ उडाला असेल तर ते दूर करून बुद्ध विचारांचे समर्थन करतील. त्यांच्याशी वाद घालण्यासाठी आलेल्या इतरपंथीय भिक्षूंशी वाद घालण्यात यशस्वी होतील.
भिक्षूंनी अशाप्रकारे स्वयंप्रकाशी होत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे, हेही गौतम बुद्धांनी सांगितले आहे. कोणी भिक्षूंना असे सांगितले की अमूक एक धर्मविचार किंवा विनयविचार भगवान बुद्धांच्या मुखातून आला आहे,
तरीही त्यांचा स्वीकार किंवा अस्वीकार करण्यापूर्वी तो विचार ‘सूत्र’ आणि ‘विनयविचारां’ना अनुसरून आहे का ते पाहावे, त्यांची तुलना करावी आणि असा अभ्यास करताना भिक्षूंच्या असे लक्षात आले की सदर विचार बुद्धांच्या मूळ विचारांशी विसंगत किंवा विरोधाभासी आहेत, तर त्यांचा स्वीकार करू नये.
एखाद्या ठिकाणी विहार करणाऱ्या भिक्षुसंघातील भिक्षूंनी स्वतः धर्मविचार सांगितला असेल, तरच त्याचा स्वीकार करावा. याशिवाय त्यांनी स्वतः सांगितले की या भिक्षुसंघातील बरेच जण बहुश्रुत, आगमतज्ज्ञ, धर्मधर, विनयधर आहेत तरच ते मान्य करावे. अध्ययन, प्रत्यक्ष अनुभव आणि बुद्धी यांच्या निकषांवर कोणताही विचारांबाबत निर्णय घ्यावा. गौतमबुद्धांनी स्वतःच्या विचारांबद्दलही हेच सांगितले आहे की, केवळ मी सांगतो म्हणून एखादा विचार स्वीकारू नका. बुद्धीच्या कसोटीवर तो पारखा.
हा संदेश आजच्या जगात आपल्यासाठीही तितकाच महत्त्वाचा. दूरचित्रवाणी, इंटरनेट, मोबाईल फोन आदी साधनांमुळे आपण सर्वजण इतके जवळ आलो आहोत की जगातील एका कोपऱ्यात घडलेल्या घटना दुसऱ्या क्षणाला आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. प्रसिद्ध उत्तरआधुनिकतावादी लिओटॉर्ड यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक क्षणाला नवीन माहिती, नवीन विचार, तंत्रज्ञान, शोध आपल्या पुढ्यात येतात.
आकर्षकपणे हे विचार आपल्यापुढे येत असतात. आपल्याला भांबावून सोडतात. वस्तुस्थिती अशी आहे की आपण हे थांबवू शकत नाही किंवा टाळू शकत नाही. कारण जर जगाबरोबर चालायचे असेल तर याला तोंड देणे अनिवार्य आहे. पण असे करीत असताना बुद्धांनी दिलेला ‘अत्तदीप भव’चा संदेश ध्यानात ठेवला पाहिजे. आपल्यापर्यंत येणारी प्रत्येक माहिती आणि विचार आपण सजगतेने स्वीकारला पाहिजे.
अनुभव आणि बुद्धी यांच्या आधारे जोखून पाहिला पाहिजे. असे केले तरच आपण आपल्या विचारांना आणि मतांना ठामपणे मांडू शकू. अन्यथा या ‘विचारांच्या बाजारा’त आपण भरकटत जाऊ आणि असे भरकटणे आपल्यासाठी आणि पर्यायाने समाजासाठी अयोग्य आहे. म्हणूनच या वैचारिक गोंधळात आपल्याला बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे स्वयंप्रकाशी होण्याची आवश्यकता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.