प्रचाराचा येळकोट जाईना

एकूणच संसदीय कामकाजाच्या दर्जाविषयी काळजी वाटावी, अशी स्थिती निर्माण होत आहे.
प्रचाराचा येळकोट जाईना
प्रचाराचा येळकोट जाईनाsakal
Updated on

केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार सत्तेवर आले असले तरी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निर्माण झालेले प्रश्न, शाब्दिक चकमकी या वातावरणातून सत्ताधारी आणि विरोधक अद्यापही बाहेर आलेले नाहीत. संसदेतील दोन दिवसांच्या चर्चेतून जाणवते ते प्रचारातील भाषणे आणि संसदेतील भाषणे यांतील नष्ट होत चाललेले अंतर. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावानिमित्ताने झालेली चर्चा त्यामुळेच लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नापासून दूरच राहिली.

पहिल्यांदाच विरोधी पक्षनेता नात्याने बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधींनी आपल्याकडे झोत केंद्रित होईल, असे पाहिले. त्याबद्दल हरकत घ्यायचे कारण नाही. सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडणे हे त्यांचे कामही आहे. प्रश्न आहे तो मुद्यांचा. हिंदू म्हणवून घेण्याचा ठेका कोण्या एका व्यक्तीला, संस्था-संघटनेला नाही, असे सांगत त्यांनी देवादिकांच्या प्रतिमाही सभागृहात झळकावल्या.अर्थात हा विषय प्रतिवादासाठी मोदींच्या पथ्यावरच पडला. शेतमालाला किमान हमीभाव, अग्निवीर, पेपरफुटीच्या घटना, बेरोजगारी, महागाई अशा अनेक बाबींनाही राहुल यांनी स्पर्श केला आणि त्यांच्या आवेशपूर्ण भाषणादरम्यान पंतप्रधानांसह तीन ज्येष्ठ मंत्र्यांना खुलासे-प्रतिवाद करण्यासाठी उभे राहावे लागले.

विरोधकांमध्ये वाढलेल्या उत्साहाची खूण त्यांच्या भाषणातून मिळाली हे खरेच. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा किंवा ‘इंडिया’ आघाडीतील अन्य पक्षांच्या प्रतिनिधींची भाषणे पाहता विरोधक तयारीनिशी, सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठीच उतरलेले दिसले. त्याची छाप राज्यसभेतील कामकाजातही उमटली. तेथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी खिंड लढवली. विरोधकांच्या तुल्यबळ संख्याबळामुळे पीठासीन अधिकाऱ्यांना कामकाज चालवताना कसरती कराव्या लागत होत्या. त्यामुळे सरकारची कोंडी होत होती. राहुल गांधी यांच्या दाव्यांना गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लगोलग खुलासे करत त्यातील हवा काढण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक अकेला, सबसे भारी’ या विधानातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न विरोधकांनी त्यांच्या भाषणाच्यावेळी अखंडपणे केलेल्या घोषणाबाजीने केला. तरीही मोदी यांनी सवयीप्रमाणे काँग्रेसच्या इतिहासातील कारभारावर आणि त्यातील फटींवर बोट ठेवत देशात काँग्रेस आर्थिक अराजक माजवत आहे, प्रांतवादाच्या भिंती उभ्या करत आहे, असा घणाघात केला. काँग्रेसला परजीवी, दलितविरोधी, हिंदूविरोधी अशा शेलक्या विशेषणांचा आहेर देत त्यांना भाजपवरील आरोपांतील हवा काढून घेण्याचाच प्रयास केला.

विशेषतः राहुल गांधींचा नामोल्लेख टाळत, ‘बालकबुद्धी’ या विशेषणाने त्यांच्यावर वाग्‍बाण सोडले. थोडक्यात दोन्ही बाजूंच्या भाषणांतून सर्वसामान्यांसाठी फार काही सापडले नाही. राहुल गांधी यांनी बरेच ‘वाईड बॉल’ टाकले, हे मान्य केले तरी पंतप्रधानांनी क्रीज सोडून ते खेळण्याचा अट्टहास कशासाठी केला, हाही प्रश्नच आहे. सहकारी पक्षांच्या कुबड्यांवर काँग्रेसने शंभरी गाठल्याचे सांगत अप्रत्यक्षरीत्या ‘इंडिया’ आघाडीत बेबनाव करण्याचाही त्यांचा इरादा लक्षात आला. परंतु काँग्रेसकडे बोट दाखवत असतानाच ‘एनडीए’ आघाडीतील मित्रपक्षांच्या कुबड्यांवर भाजपच्या सरकारचे आपण नेतृत्व करत आहोत, हे ते सोयीस्कररित्या विसरले. राहुल गांधींना टीकेचे धनी करतानाच आपल्या पदाला अशोभनीय अशी वक्तव्ये करून त्यांनी पातळी सोडल्याचे जाणवले. खरे तर निवडणुका संपल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही संघर्षाची मानसिकता दूर ठेवून जनहिताला प्राधान्य द्यायचे असते.

देशासमोरील प्रश्‍नांची भलीमोठी यादी प्रचारात आणि आता सभागृहात दोन्हीही बाजूंकडून वाचण्यात आली. प्रामुख्याने महागाई, वाढती बेरोजगारी, समाजातील मनभेदाने रुंदावणारी दरी, केंद्रातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धापरीक्षांतील गोंधळ अशा अनेक प्रश्नांवर एकत्रित बसून तोडगा काढणे अपेक्षित आहे. पेपरफुटीप्रकरणी चर्चा करावी, आम्ही सहकार्याला तयार आहोत, असे सांगत विरोधकांनी मदतीचा हात पुढे केला. तथापि, सरकारने त्याकडे फार लक्ष दिल्याचे जाणवले नाही. पंतप्रधानांच्या भाषणाच्यावेळी मणिपूरमधील अशांततेकडे लक्ष द्या आणि न्याय द्या, असा घोशा विरोधकांनी लावला होता. त्यावरील सरकारचा प्रतिसाद पुरेसा स्पष्ट नव्हता. पंतप्रधानांचे भाषण सुरू असताना विरोधकांनी सातत्याने आणलेले अडथळे अशोभनीय होते. एकूणच संसदीय कामकाजाच्या दर्जाविषयी काळजी वाटावी, अशी स्थिती निर्माण होत आहे. विधिमंडळांतही हीच घसरण आहे. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली आणि निलंबन ओढवून घेतले. हे चित्र बदलायचे असेल तर नुसता उपदेश करून भागणार नाही. सर्वच ज्येष्ठ नेत्यांना आपल्या वर्तनातून आदर्श घालून द्यायला हवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com