भाष्य : जीवसृष्टीचे आधारवड

वड-पिंपळ-उंबर आणि त्यांच्या गोतावळ्यातील धेड उंबर, नांद्रुक, पिपरी, लोत, खरवत अशा नानाविध वृक्षजातींना आशिया- आफ्रिका खंडांमध्ये सर्वत्र पवित्र मानतात, राखून ठेवतात.
Banyan Tree
Banyan TreeSakal
Updated on

वन्यजीव संरक्षण म्हणजे निव्वळ शिकार थांबवणे असे ठरवून आपण एकीकडे रानडुक्करांना शेती उध्वस्त करू देताहोत, तर दुसरीकडे पशु-पक्ष्यांना पोसणाऱ्या वड-पिंपळ-उंबरांची बेछूट तोड करताहेत. उद्याच्या वटपौर्णिमेच्या सुमुहूर्तावर हे बदलायची सुरुवात करू या.

वड-पिंपळ-उंबर आणि त्यांच्या गोतावळ्यातील धेड उंबर, नांद्रुक, पिपरी, लोत, खरवत अशा नानाविध वृक्षजातींना आशिया- आफ्रिका खंडांमध्ये सर्वत्र पवित्र मानतात, राखून ठेवतात. पंचेचाळीस वर्षांपूर्वी मी निसर्गरम्य बंदीपूर अभयारण्यातल्या वनराजीचा, वन्यपशूंचा अभ्यास सुरु केला. तिथे पोचल्या पोचल्या पाहिले तर अभयारण्याच्या सीमेलगतच्या एका मोठ्या पट्ट्यावर वनविभागाने जंगल सफाचट केले होते. परंतु तिथेही काही तुरळक झाडे शिल्लक होती. जवळून पाहिले तर सारी वटपरिवारातील वेगवेगळ्या जातींची झाडे होती. सगळी झाडे तोडायचा हुकुम होता. तरी मजुरांनी त्यांना वगळले होते. ही भोळी अंधश्रद्धा होती का?

लवकरच माझ्या लक्षात आले की नाही, यामागे या गोतावळ्यातील झाडांची खासियत काय आहे, ती जीवसृष्टीत काय विशिष्ट भूमिका बजावतात, याची जाणीव असावी. मला हत्तींचे खास आकर्षण होते. रानात वन्य हत्ती वावरायचे आणि पर्यटकांसाठी तीन हत्ति‍णी पाळल्या होत्या. त्यांच्या माहुतांपाशी जीवसृष्टीच्या आणि खास करून हत्तींविषयीच्या ज्ञानाचे अथांग भांडार होते. रात्री पाळीव हत्ति‍णींना पायात साखळी, गळ्यात घंटा बांधून रानात चरायला सोडायचे, मग पहाटे घंटांच्या आवाजाचा कानोसा घेत त्यांना परत आणायला निघायचे. मी माहूतांसोबत जायचो. माहूत हत्ति‍णींच्या मानांवर बसायचे, मी एकाच्या पाठीमागे बसायचो. जंगलात वडाच्या गणगोतातली अनेक जातींची झाडे होती.

हत्ति‍णींना त्यांची पाने-डहाळ्या खाण्याची चटक होती. वाटेत माहूत हत्ति‍णींच्या पाठीवर उभे राहून अशा फांद्या तोडायचे आणि हत्ति‍णींच्या नाश्त्यासाठी तळावर घेऊन चलायचे. मग त्यांच्या गप्पा चालायच्या. एक दिवस विषय निघाला, की हे अभयारण्य खरे तर पशुपक्ष्यांसाठी आहे. आपण वडाच्या कुटुंबातील झाडांच्या फांद्या तोडल्यामुळे त्यांना फळे कमी येतात. पण तऱ्हेतऱ्हेचे पक्षी, वटवाघळे, माकडे, खारी, शेखरू ही फळे आवडीने खातात आणि वर्षभर यातल्या कुठल्या न कुठल्या झाडांना फळे येत राहिल्याने या प्राण्यांना बारा महिने पोटभर खायला मिळते. आपण ही पाने तोडून या सगळ्यावर गदा आणतो आहोत. खरे तर अभयारण्यात असे करणे चुकीचे आहे. उघडच त्यांना त्या परिसंस्थेतल्या घडामोडींचा चांगला समज होता आणि त्यांचे हे निरीक्षण माझ्या डोक्यात बिंबले होते. काही वर्षांनंतर टर्बोर्ग या परिसरशास्त्रज्ञज्ञाने अमेझॉनच्या जंगलातल्या वटपरिवारातील वृक्षजातींचा अभ्यास करून हुबेहूब माहुतांसारखेच प्रतिपादन केले. परिसरशास्त्रात अशा नानाविध जीवजातींना आधार पुरवणाऱ्या जातींना कळीची संसाधने म्हणून गणतात. हे जीवसृष्टीचे खरेखुरे आधारवड आहेत.

वटकुटुंबातल्या वृक्षजाती अशी कळीच्या संसाधनांची भूमिका का बजावतात? एक म्हणजे त्यांच्या बिया ओल्या मातीशिवाय रुजतात, त्यांना जमिनीवरच रुजण्याची आवश्यकता नसते. म्हणून आपण दुसऱ्या झाडांवर, भिंतीच्या फटींत, इमारतीच्या छतांवर वाढलेले पिंपळ नेहमी पाहतो. त्यांचे दुसरे बलस्थान म्हणजे परागीकरणासाठी त्यांच्या नित्य सेवेला हजर असलेले बंदिवासी किडेमकोडे. त्यांची फळे हा एक फुलोरा असतो. त्यातल्या काही फुलांत रुजलेल्या बिया या बंदिशाळेतल्या किड्या-मकोड्यांचा खुराक असतो. तो खात-खात ते उरलेल्या फुलांचे परागीकरण करतात. इतर वृक्षजातींचे परागीकरण करणारे मधमाशांसारखे सेवक भर पावसाळ्यात उपलब्ध नसतात. त्यामुळे सर्वसामान्य वृक्षजाती वसंत ऋतूत फुलतात आणि त्यांच्या बिया पावसाळ्याच्या तोंडाशी रुजतात. अशी बंधने नसलेल्या वटपरिवारातील वृक्षजाती वेळोवेळी फळत राहतात, एकाच झाडाला वर्षातून अनेकदा फळे धरतात, आसपासची झाडे पण वेगवेगळ्या वेळी फळतात. पक्षी-प्राणी विष्ठेतून त्यांच्या बिया पसरवतात, त्या सुप्तावस्थेत राहतात आणि अनुकूल जागा भेटली की रुजतात. म्हणून या जाती पक्ष्यांना, पशूंना रुचकर आहार वर्षभर पुरवतात.

वड-पिंपळाला आदराचे स्थान

ह्या आकलनातून आशिया-आफ्रिका खंडांमध्ये सर्वत्र ह्या जीवसृष्टीच्या आधारवडांना मान-मान्यता दिली गेली असावी. ४५०० वर्षांपूर्वीच्या मोहेंजोदारोतल्या शिक्क्यावर पिंपळाचे चित्र सापडते. ख्रिस्ती, इस्लाम धर्मांतही वड-पिंपळाना आदराचे स्थान आहे. गौतम बुद्धाला वटवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. भगवद्गीतेत जगडंबर संसाराला पिंपळाची उपमा दिली आहे. हे जीवसृष्टीचे आधारवड भारतभर सहस्रावधी वर्षे जोपासले होते. गावो-गावी पिंपळ पारांवर अड्डे जमायचे. रस्त्याच्या दुतर्फा वडाची झाडे, रस्त्यांवर, आवारांत उंबर असायचे; आधुनिकीकरणाच्या चक्रात हे सगळे भरडले जाताहेत. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पुण्यात पौड गावापासून डेक्कन जिमखाना, तिथून फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, गणेशखिंड रस्ता, औंध रस्ता अशा ३५-४० किलोमीटर मार्गावर दुतर्फा सुमारे २०-२०मीटर अंतरावर, म्हणजे निदान ३००० वड फोफावले होते. वर्षभर दोन महिन्यांत एकदा पंधरवडाभर फळे धरायची. म्हणजे २५ टक्के झाडे केव्हाही भरपूर फळांनी लगडलेली असायची. दिवसभर तांबट, कोकीळ, पोपट, शिंगचोचे, खारी आणि रात्री भली-दांडगी फळभक्षक वटवाघुळे ती फळे फस्त करत असायचे. लहानपणी हा जैववैविध्याचा बहार मी मोठ्या खुशीत पाहिला आहे. मग आपल्या सरकारने ठरवले, की रस्ते-रेल्वे ह्या पायाभूत सुविधा देशाच्या प्रगतीसाठी अग्रक्रमाने हाती घेतल्या पाहिजेत. वड-पिंपळ तोडत शहरांच्यात रस्तारुंदी आणि शहरांबाहेर महामार्गांचा धडाका सुरु झाला. ह्यातून जीवसृष्टीबरोबर जलसंपत्तीचीही नासाडी सुरु झाली. खडीसाठी डोंगर पोखरले, वाळूसाठी नद्या, समुद्रकिनारे ओसाड केले. ह्या विकास प्रणालीतून आर्थिक, सामाजिक विषमता वाढली, समाजात वैमनस्य भडकले.

आजच्या कोरोनाग्रस्त जगात जाणवतेय, की हा ‘चिंचेच्या पानावर देउळ रचिले । आधी कळस मग पाया रे।’ असा विपरीत प्रकार झाला. १९५३-५५ सालच्या भीषण युद्धात नेस्तनाबूत झालेल्या दक्षिण कोरियाने आधी प्राथमिक-माध्यमिक शिक्षण व प्राथमिक आरोग्य या भक्कम पायाभूत सुविधा रचून मगच औद्योगिकरणाला हात घातला. त्या छोटेखानी लोकशाही देशात महाराष्ट्राइतकीच लोकसंख्या आहे, पण तिथे कोरोनात १९८० लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर महाराष्ट्रात एक लाख ११ हजार! आपली कोणतीच उत्पादने दक्षिण कोरियात पोचत नाहीत, तर त्यांच्या सॅमसुंग, ह्युंदाई, एलजी कंपन्यांच्या उत्पादनांनी आपली बाजारपेठ गजबजली आहे.

मला वाटते, की आपण झाडे तोडण्याचा सपाटा लावणाऱ्या तथाकथित पायाभूत सुविधा वाढवत राहण्याचे आवरते घेऊन वाचतील ते पैसे प्राथमिक-माध्यमिक शिक्षण व प्राथमिक आरोग्यक्षेत्रांत गुंतवणे मोठ्या शहाणपणाचे होईल. भारतात ज्यांची संख्या, उपद्रव अतोनात वाढत आहे, त्या रानडूक्करांना बिलकुल इजा करायची नाही, असे कायदे आहेत. आता जरा वेगळा विचार करू या आणि ठरवूया की यापुढे एकाही वडाला, पिंपळाला, उंबराला आणि त्यांच्या गोतावळ्यातल्या नांद्रुक, पिपरी, लोत अशा इतर जातींच्या वृक्षांना अजिबात इजा करायची नाही. त्यासाठी रस्ते रुंद्या, महामार्ग निदान सध्यापुरते थांबवयाला लागले तर खुशाल थांबवू या. चला तर, वटपौर्णिमेच्या सुमुहूर्तावर स्तवन करू या: वडाच्या मुळाशी ब्रह्मा, मध्यभागी जनार्दन, माथ्यावरि वसे शंकर, जपू त्याला निरंतर !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.