बांबू कारागिरांचे हक्काचे व्यासपीठ

केवळ पगारासाठी नोकरी करणारी मंडळी आपल्या सभोवताली नेहमी पाहायला मिळतात. वरिष्ठांनी निर्धारित व नियोजित करून दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या की झाले काम... असा अनेकांचा मानस आहे.
बांबू कारागिरांचे हक्काचे व्यासपीठ
बांबू कारागिरांचे हक्काचे व्यासपीठsakal
Updated on

केवळ पगारासाठी नोकरी करणारी मंडळी आपल्या सभोवताली नेहमी पाहायला मिळतात. वरिष्ठांनी निर्धारित व नियोजित करून दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या की झाले काम... असा अनेकांचा मानस आहे. परंतु काही माणसं अशीही आहेत जी आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळून सामाजिक जबाबदारी पार पाडतात. त्यातील एक म्हणजे वनपाल (वन परिमंडळ अधिकारी) धनराज बागूल. त्यांनी महाराष्ट्र बांबू विकास मंडळामार्फत सामाईक सुविधा केंद्र सुरू करत बांबू कारागिरांच्या हाताला हमखास काम मिळवून दिले.

- योगेश सोनवणे, पिंपळगाव (वा.), जि. नाशिक

कळवण तालुका हा आदिवासीबहुल भाग. धनराज बागूल मूळचे तिऱ्हळ खुर्द (ता. कळवण, जि. नाशिक) येथील. त्याकाळी शिक्षणासाठी कुणी फारसे कष्ट घेत नसत. मुळात मार्गदर्शनाचा अभाव असायचा मात्र धनराज बागूल यांनी शिक्षणाला महत्त्व दिले. १९९९ मध्ये लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत धनराज बागूल उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी वसुंधरा ऍग्रो मध्ये लेखापाल म्हणून काम केले.

गुजरात राज्यात नॅशनल डिव्हलिंग्स इंडिया लिमिटेडमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम केले. महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या सिटी सर्व्हे परीक्षेत धनराज बागूल महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण झाले. २००० मध्ये वन विभागात धनराज बागूल वनरक्षक म्हणून भरती झाले. पाल (ता. रावेर) येथे वनरक्षक प्रशिक्षण केंद्रात एक वर्ष प्रशिक्षण विशेष प्राविण्यसह यशस्वीपणे पूर्ण केले. धनराज बागूल यांना २०१७ मध्ये वनपाल (वन परिमंडळ अधिकारी) पदावर बढती मिळाली.

२०१७ मध्ये सुविधा केंद्र सुरू

उंबरठाण परिसरातील देवगाव येथे गस्त घालत असताना धनराज बागूल यांना काही लोक बांबू संदर्भातील काम करताना दिसले. त्या लोकांशी जवळीकता साधत बागूल यांनी किती लोक, किती कुटुंब या कामावर अवलंबून आहेत याबाबत सखोल माहिती संकलित करत वरिष्ठ स्तरावरील वनाधिकारी वर्गाशी समन्वय साधत नवीन प्रोजेक्ट तयार केला. आणि तो प्रोजेक्ट महाराष्ट्र बांबू विकास समन्वयक भास्कर पवार, सहाय्यक वनसंरक्षक सुजित नेवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी संदिप जोपळे यांच्याकडे मांडून महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाकडून यासाठी निधी उपलब्ध करून घेतला.

२०१७ मध्ये उंबरठानमधील देवगाव येथे महाराष्ट्र बांबू विकास मंडळामार्फत सामाईक सुविधा केंद्र सुरू केले व बांबू कारागिरांना हाताला हमखास काम मिळून दिले. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील हा पहिलाच उपक्रम. या उपक्रमाला वनविभागाच्या मुख्य अधिकारी वर्गाने सदिच्छा भेट देत त्याचे विशेष कौतुक देखील केले. आमदार नितीन पवार यांनी देखील भेट दिली आहे.

कारागिरांना प्रशिक्षण

देवगाव येथील २० बांबू कारागिरांना चंद्रपूर येथे दोन महिन्याचे बांबू कारागिरीबाबत प्रशिक्षण घडवून आणण्यासाठी धनराज बागूल वरिष्ठांकडे पाठपुरावा करत राहिले. अन् सरतेशेवटी त्या बांबू कारागिरांना प्रशिक्षण घडवून आणले. बांबूवर काम करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य व मशिनरी मागविली व त्याद्वारे बांबूपासून शोभेच्या वस्तू तसेच नित्य वापराच्या वस्तू तयार करून मोठ्या शहरांत पाठविल्या.

तसेच पुणे येथे बांबू वस्तू प्रदर्शनास कारागीर यांना घेऊन जात सहभाग नोंदवत बागूल यांनी बांबू कारागिरांची आर्थिक प्रगती घडवून आणली. आज देवगाव (ता. सुरगाणा) येथे हा उपक्रम सुरळीत सुरू असून परिसरातील बांबू कारागीर यावर काम करून रोजगार मिळवत आहेत. तसेच देवगाव गोंदूने (ता.सुरगाणा) येथे या उपक्रमाद्वारे वनविभाग मार्फत बांबू रोप वने करून कारागिरांना बांबू उपलब्ध होणे व त्यातून रोजगार निर्मिती करत वृक्ष संवर्धनाचा संदेश बागूल यांनी दिला. वन जमिनीवर अतिक्रमण होऊ नये म्हणून त्यावर देखील त्यांनी लक्ष ठेवले आहे.

विनामूल्य आरोग्य तपासणी

२००९ मध्ये वनपााल धनराज बागूल यांनी स्वतःच्या शेतात तज्ज्ञ डॉक्टरांच्या साहाय्याने गोरगरीब लोकांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. आरोग्य तपासणीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आजही बागूल लोकसहभागातून वन्यप्राण्यांची तृष्णा भागवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.