एखादी घटना खूप काही सांगून जाते. एका ऑफ तासाला शिक्षक पटांगणावर झाडाखाली मुलांना घेऊन बसले होते.
एखादी घटना खूप काही सांगून जाते. एका ऑफ तासाला शिक्षक पटांगणावर झाडाखाली मुलांना घेऊन बसले होते. वर्ग होता सातवीचा. एक एक मुलगा मुलांच्या पुढे उभा राहून वर्तमानपत्र वाचत होता. काही ऐकत होती.
तर काही एकमेकांशी आपापसात बोलणे, एकमेकाला खडे मारणे, मागे ओढणे, गुदगुल्या करणे, तर काही शुन्यात पाहात होते. मी तेथून जात असताना एक विद्यार्थिनी बातमी वाचत होती, ‘इयत्ता तिसरीच्या वर्गातील एक मुलगी सायकलवरून तोल जाऊन पडली. तिच्या घशात सायकच्या हॅन्डलचा नट घुसून मृत्यू झाला’ मी थांबलो.
मुलांकडे गेलो. बातमी पुन्हा वाचायला सांगितली. सर्वांनी ऐकली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. सर्वजण गांभीर्याने पाहू लागले. पुन्हा चर्चा सुरू झाली ती बातमीच्या अनुषंगाने. मी पुन्हा ती बातमी वाचायला सांगितली. त्यानंतर मुलांना विचारलं
१) ती मुलगी तिसरीच्या वर्गातील म्हणजे किती वयाची असेल?
२) तिचा तोल कशामुळे गेला असेल?
३) तिला सायकल येत असेल का नसेल? मुले तर्क करायला लागली. बोलायला लागली. सर्व अंदाज बरोबर वाटत होते. मग एका मुलीला सायकल आणायला सांगितली. त्यांना विचारलं, ‘कुठले उपकरण इजा करून गेले असेल?’
दोन-तीन मुली लगेच उठल्या सायकलजवळ येऊन दाखवू लागल्या.वेगवेगळे अंदाज येऊ लागले. शेवटी एक मुलगी पुढे आली म्हणाली, ‘सर मी सुद्धा अशीच एक दिवस पडले होते. त्यावेळी मला या ठिकाणचा नट घशाला लागला होता. मी हळू होते म्हणून मला जादा लागलं नाही. सर्वानुमते कशामुळे इजा झाली त्याचा अंदाज लावण्यात आला. अनुभव सांगितलेल्या मुलीला मोठी जखम कशामुळे झाली नसावी ? त्याचाही अंदाज आला.
मुले उत्साहाने सहभागी झाली. न बोलणारी पण पुढे आली. आता रांगा राहिल्या नाही. मोठं वर्तुळ झालं. मग विचारलं, ‘आणखी कोणकोणत्या सायकलच्या बाबी धोकादायक ठरू शकतात? चेनकव्हर नसणे, ब्रेक कार्यरत नसणे, मडगार्ड नसणे, टायर ट्यूब व्यवस्थित नसणे, तेलपाणी नसणे, पॅडलला रबरी कांड्या नसणे, नटबोल्ट तपासणी न करणे. त्यावेळी एका विद्यार्थिनीने सांगितले,माझी ओढणी चेनमध्ये गुंतून मी पडले होते व माझा हात मोडला होता.
एका मुलाने सांगितले, पॅडला रबरी कांड्या नसल्याने माझ्या पायाला मोठी जखम झाली होती. अशा अनुभवांची माहिती विद्यार्थी सांगायला लागले. अगदी कधीही न बोलणारे सुद्धा. तेवढ्यात त्याच वर्गातील दोन मुली आल्या. एकीच्या डोक्याला जखम झाली होती, त्यावर पट्टी होती, नाकाला, गालाला, हाताला खरचटले होते.
त्यावेळी एकीने सांगितले, ‘सर, ही सायकलवरून पडली. पुन्हा मुले अंदाज करू लागली. काय झाले असावे? एकाने सांगितले, ‘कधीकधी दुस-याच्या चुकीनेही होतं. कसं ते सांगितलं. त्या मुलीच्या बाबतही तेच कारण ठरलं.
बरोबर दोन मुले सायकलवर गप्पा मारत चालली होती. एकमेकांना धक्का लागल्याने पडली. ही मुलगी त्यांना जाऊन धडकली. बरोबर अंदाजवाले भलतेच खुश झाले.
एक उपाय सुचवला की सुरक्षित अंतर ठेऊन वाहन चालवणे. बरोबरीच्या मुलीने सांगितले, ‘‘ही घाबरली होती. मी तिला उठवले. बाटलीतील पाणी दिलं. शांत केलं. डॉक्टराकडे नेलं. त्यांनी मलमपट्टी केली.
हसून सांगितलं, ‘घाबरू नको.जादा जखम नाही. काळजी घेऊन प्रवास करीत जा.’ त्यांनी पैसे सुद्धा घेतले नाहीत.’’ घंटा झाली. मुले वर्गाकडे जातानाही याच विषयावर चर्चा करीत होती.
वर्गाबाहेरही अनौपचारिकरीत्या कितीतरी गोष्टी शिकवता येतात, याचा समाधानकारक प्रत्यय त्या दिवशी आला. नकळत खालील जीवनकौशल्यांशी मुलांचा परिचय झाला.
स्वजागृती, समानुभूती, समस्या निराकरण, निर्णय घेणे, प्रभावी संवाद, चांगले आंतरव्यक्ती संबंध, चिकित्सक विचारप्रक्रिया, सर्जनशील विचारप्रक्रिया, भावनांचे समायोजन, ताणतणावांचे समायोजन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.