गावमातीच्या स्पंदनांचा गौरव..

गावमातीच्या स्पंदनांचा गौरव..
Updated on

"ग्रामीण' अशा बिरुदाखाली लिहिल्या जाणाऱ्या कवितेचे आता विस्तारीकरण झाले आहे. ही कविता भूतकाळ रमणीय अशी राहिलेली नाही. या कवितेचे पाय मातीचे व मातीवरच असले तरी शेतीचेही एक रुदन आहे आणि खेड्यांचीही एक खंत आहे. श्रीकांत देशमुख यांची कविता नेमकं ते दुःख पकडते. "बोलावें ते आम्ही' या त्यांच्या कवितासंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. हा कवितासंग्रह म्हणूनच व्यथालय झालेल्या गावमातीचा संवेदनशील आवाज दृढ करू पाहतो. हा कवी मूळचा बुलडाण्यातील राहेरी बुद्रुकचा. सध्या नांदेडमध्ये कार्यरत. 

देशमुखांची कविता खूप खोल अर्थानं त्यांची आत्मकथा वा कार्यकथाही म्हणता येईल. सनदी अधिकारीपद निभावताना त्यांनी शेतीचा लळा सोडलेला नाही. किंवा गांवाचा टिळा पुसट होऊ दिला नाही. बळिवंताचा एक अनिवार्य भाग बनलेला हा कवी शेतीमातीशी जुळून असणाऱ्या कष्टकरी सर्वहारा विश्वाची स्पंदने फारच बारकाईने ऐकताना आढळतो. कास्तकाराचा मृत्यू, तहान, दुष्काळ, महादू दादू, उजळ माथ्यानं भूमिपुत्र अथवा रानडुकरांचे कळप, उंदीर, पांढरी माती अशा पुष्कळ कवितांमधून शेतीमातीचे हाल आणि गाववस्तीचे अनुभवविश्व देशमुखांच्या कवितांमधून उजागर झालेले बघायला मिळते. 

समृद्ध परंपरा लाभलेल्या गावांचे वर्तमान मात्र धड राहिलेले नाही आणि जगाचा पोशिंदा असलेल्यालाच कुणी वाली राहिलेला नाही, हे नीट समजून घेणाऱ्या देशमुखांच्या कवितेचा पोत मूळात विचारकाव्याचा. त्यांची ही कविता स्वाभाविकच मोठ्या संचितावर उभी आहे. तुकोबांचा जीवनमार्ग, वारकरी संस्कृतीचा ठेवा, परिवर्तनशील चळवळींचे सार आणि शरद जोशीप्रणित शेतकरी लढ्यांची पार्श्वभूमी हे असे बहुपदरी संचितही या कवितेच्या पदरात पडलेले आहे. या शिवाय, खुद्द कवीची अभिव्यक्त उर्जा या काव्यसर्जनाच्या मुळाशी आहे. आज शेतीचा नक्षा दुखरा बनला आहे आणि गांवमाणसं एका खिन्न बिंदूजवळ उभी आहेत! यातनांना घर उरले नाही आणि नानाविध अरिष्टांमुळे भाकरीला भरवसा उरलेला नाही. अशा स्थितीत देशमुखांचा हा सन्मान ग्रामसंस्कृतीमध्ये घडणाऱ्या सर्जनशीलतेला प्राप्त झालेला दिलासा म्हणता येईल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()