भाष्य : मराठी भाषेपल्याड मराठी!

आमच्या शिक्षणांत, अभ्यासक्रमांत, परीक्षांत किंवा वाचल्या-लिहिल्या नानाविध क्षेत्रांत ‘मराठी’ भाषा म्हणून, वाणी म्हणून वावरते, हे खरेच.
marathi language
marathi languagesakal
Updated on

सामान्यांच्या दैनंदिन व्यवहारात मराठीचा मनःपूत वापर केला जातो. बोलीभाषा म्हणून प्रांत, भागपरत्वे आपले म्हणून मराठीचे वैभव, सौष्ठव आहे. ते विविध माध्यमातून लिखित स्वरूपात येते आहे. त्याचे स्वागत करून दखल घेतली पाहिजे.

आमच्या शिक्षणांत, अभ्यासक्रमांत, परीक्षांत किंवा वाचल्या-लिहिल्या नानाविध क्षेत्रांत ‘मराठी’ भाषा म्हणून, वाणी म्हणून वावरते, हे खरेच. प्रगत म्हणवला जाणारा हा मराठीचा चेहरा सर्वांसमोर आहे, हे कोणीही नाकबूल करणार नाहीच.

पण, मराठी भाषेच्या पल्याड मराठी बोलणारे केवढे तरी मोठे जग मराठीत, महाराष्ट्रात, सीमावर्ती भागांमध्ये आहे आणि अशा या जगाची सोच मात्र आपण फारशी गांभीर्याने अजूनही पुरती केली असे जाणवत नाही, हाच खरा कळीचा मुद्दा आहे.

अगदी घरांतली चूल पेटावी म्हणून, संसाराचा गाडा चालावा म्हणून, रोजीरोटी मिळावी म्हणून, दैनंदिन उदरनिर्वाह व्हावा म्हणून माणसांची मोठी दुनिया आपल्यांभोवती उभीच असते. या मोठ्या दुनियेचे दळणवळण मराठी भाषेतून सत्वर चालते. त्यांच्या मराठीकडे आपले लक्ष गेले आहे काय? किंवा मराठीच्या प्रवाहांत हे मराठी बोलणारे लोक अभिजात या अशा मराठीचा भाग झाले आहेत काय?

आमच्या विद्यापीठांच्या शिक्षणातही ‘यांची मराठी’ मिसळली गेली काय? हे सगळे प्रश्न खरंतर मराठीचा गजर करताना प्रत्येक मराठी माणसाला पडायला हवेत. त्याशिवाय, मराठी सर्वांची, सर्व प्रवाशांची होईल कशी? हा खरा चिंतनाचा मुद्दा आहे.

प्रकाशात असलेल्या मराठीपुढे प्रकाशापलीकडे एक मराठी आहे. उदा. भाजीमंडईत भाज्या विकणारे मराठी स्त्री-पुरुष, ओला उबर-चारचाकी वाहनं चालवणारी मराठी मुलं, गॅरेजमधून कामं करणारी मराठी बोलणारी इथली तरुणाई, ट्रक किंवा बसेस चालवणारा मोठ्या संख्येमधला युवक एवढेच नाहीतर ऑटोरिक्षा किंवा तत्सम साधनं चालवणारी कुठून कुठून आलेली आणि शहरांचा आधार घेऊन कामधंद्यात पडलेली हजारोंच्या संख्येतली ‘मुलं’ ही शेतकऱ्यांची, भूमीहिनांची, खेड्यांच्या गांवमातीचा गंध मनःपुत जपणारी परंतु मराठी बोलणारी मुलं आहेत.

यांच्या या मराठी बोलींचा, त्यांच्या मराठी भाषेंचा ‘‘मीमी मराठी’’ असं म्हणणाऱ्या लोकांनी, प्राध्यापकांनी, शिक्षणतज्ज्ञांनी किंवा एकूणात मराठीचे शकट हाकणाऱ्यांनी अजून पुरता अभ्यास केलेला दिसत नाही. मराठी भाषेची विलक्षण समृद्धी ही बाजू अजूनही आमच्या नजरेच्या टापूत आलेलीच नाही. हे विषय म्हणूनच ऐरणीवर आले पाहिजेत. त्याशिवाय, मराठीचे पूर्णत्व सर्वथा मान्य करता यावयाचे नाही.

मराठी भाषेपल्याडची हीपण मराठी बावनकशी आहे. ही मराठी ऐश्वर्यवती आहे. शिवाय, ही मराठी जिवंत, प्रवाही आहे. ती मराठी माणसांची आहे. जी, याच माणसांनी सांभाळली आहे. समाजाने, सरकारनेही ही माणसं आणि त्यांची मराठी, यांचे रक्षण अवश्य करायला हवे. कारण, मराठीच्या जयजयकाराला या मराठी लोकांबिगर शोभा नाही; हेपण त्यातलं वास्तव आहे! या संदर्भात साहित्यात काहीशी लक्षणीय घडामोड आढळते.

उदा. नाही म्हणायला साहित्यनिर्मितीचा या संदर्भातला दाखला बराचसा समाधान देणारा आहे. मराठी त्यातली बोलीभाषा लेखनांशी जवळ करून मराठीतील कथा, कादंबऱ्या, कविता, आत्मकथा, नाटक, पथनाटक या क्षेत्रांत मराठी माणूस; तसेच त्यांची मराठी यांना साहित्यनिर्मितीत चांगला वाव दिसतो. तरी परंतु, ही बाब तशी पूर्ण समाधानांत मोडणारी नाहीच.

जसे की, सीमावर्ती अर्थात महाराष्ट्र-कर्नाटक या प्रदेशांच्या अर्थात निपाणीसारख्या बिंदूजवळ राहणारा मोठा लेखक महादेव मोरे यांनी गॅरेजवाला, ट्रक-टॅक्सी ड्रायव्हर, कामगार, भाजीवाला, मजूर, हातगाडीवाला, गरीब, बेकारी, कलंदर आणि मिळेल ते काम करत पोट भरणारा एक मोठा जनसामान्य असा जनसमुदाय त्यांच्या मराठी बोलीभाषांसह, मिश्रबोलींसह कथा-कादंबऱ्यांमधून फार ताकदीने आणि ठळकपणे साहित्यात आणला. मोरे यांचे हे भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक किंवा सामाजिक-वाङमयीन योगदान विलक्षण आहे.

मराठीच्या भाषेपल्याड असणाऱ्या जगाच्या दृष्टीने अतुलनीय आणि केवळ श्रेष्ठ अशा पातळीचेच योगदान ठरते. म्हणजेच आजच्या काळाच्या, समाजांच्या, वर्तमानाच्या, भाषांच्या, बोलींच्या पातळीवर हा मराठी भाषेचा सामाजिक आरसा म्हणूनही महादेव मोरे यांचे कर्तृत्व आणि लेखन फारच मौलिक म्हणायला हवे. भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक ही महादेव मोरेंसारखी ताकद मराठीत आता अपवादभूत अशीच!

थातूरमातूर अभ्यासक्रमांच्या पल्याड जावून हा अभ्यास खोल व्हावा. आमच्या मराठी संशोधनाचाही हे या प्रकारचे लेखनविश्व गाभास्थानी अजून आलेले नाही. एवढीतेवढी तोंडपूजा करणारी पोकळ संशोधने होतात; पण ‘अक्षर’ स्वरूपाचे यातून हाती काहीच मुळी लागत नाही. आमचे पाठ्यक्रम, अभ्यासक्रम रचणारी मंडळे, यांनी या जिवंत-श्रीमंत साहित्यसंपदेकडे आग्रहाने आणि मुळात सकारात्मक दृष्टीने वळण्याची गरज आहे.

मात्र हळूहळू बदल होत आहेत. प्रवाहांच्या भाषिक/ बोलीप्रवण साहित्याला हल्ली जागाही मिळत आहे. आशेची ही किरणं काहीसे समाधान देतात; पण इतकेच! तान्हाजी बोऱ्हाडे, आबासाहेब पाटील, विलास पाटील किंवा कालिदास शिंदे, अशोक कोळी, रमेश चिल्ले, कल्पना दुधाळ, केशव खटींग, महेश मोरे- अशी सहजच आठवणारी आजची लेखकमंडळी आपापल्या मुलखांतलीच!

पण अस्सल मराठी बोली घेऊन सांस्कृतिक, सामाजिक पातळींवर एक जी साहित्यनिर्मिती करतात; या सर्व लेखनांचा किंवा या प्रकारच्या इतर लेखनांचा मराठी भाषावैभवाच्या दृष्टीने मात्र विचार महत्त्वाचा आहे. तो सहजी सोडून देण्यासारखा नाही. मराठीचा हा मुलुख मराठी भाषावैभवाचा ठळक ऐवज आहे!

सर्वव्यापी, समृद्ध मराठी

हेही कबूल की, भाषा शिकणे-शिकवणे महत्त्वाचे आहेच. पण भाषेशी ‘खेळणेही’ त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे! ज्यांची मराठी ही अगदीच त्यांच्यासाठी अनिवार्य निकड आहे, असे केवढे मोठे मराठी माणसांचे जग आपल्या आजूबाजूला आहे. त्यांच्याकडेही भाषिक बांधिलकीने, परंतु संवेदनभाव जपत, राखत या मराठीकडे आमचे लक्ष जायला पाहिजे तसे अजून गेलेले दिसत नाही.

आजच्या मराठी साहित्यात बोलींच्या रूपात आलेली मराठी हा आमचा खजिना आहे. दागिना आहे. म्हणून तेच ते सपक रूक्ष किती वाचायचे? तेच ते सपक किती शिकवायचे? ही पण बाजू ऐरणीवर यायला पाहिजे. त्याशिवाय, सर्वव्यापी मराठी ही केवढी समृद्ध आहे, हे समजणार कसे? रेलवाई कार्टर, गँगमन, शिवारगाऱ्हानं, गांवपांढरी, झोळी, हत्ती इलो, डहाण, रिंगाण, भुईभुई ठाव दे!

यांसारखी सहज अगदी अशी पन्नास पुस्तकं सांगता येतील, ज्यांमधून मराठीची केवढी अस्सल धुमारे नवे वाचायला मिळतील. सारांश समाजांमधून, पर्यावरणांमधून, जगण्यांमधून, संस्कृतीच्या अभिसरणांमधून आणि सर्वथा सांगायचे तर जिवंत जीवसृष्टींना घेऊनच आलेली ही मराठी भाषा-बोली ही सर्वांत श्रीमंत मराठी आहे.

उदाहरणांची ही संख्या मुळात अजून खूप वाढवत नेता येणारी आहे. सारांश हा की, भाषा संशोधन, मराठी बोली संशोधन या पातळीवर हे सर्व नवे मराठी भाषा निगडित विषय आमच्या विचारांच्या मध्यवर्ती आणि अभ्यासांच्याही अग्रभागी यायला पाहिजेत, याची वाट लोक पहात आहेत. मराठी पहात आहे.

(लेखक ज्येष्ठ भाषातज्ज्ञ असून, राज्य सरकारच्या मराठी भाषा विद्यापीठ निर्मिती समितीचेही तज्ज्ञ सदस्य आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.