वितळणाऱ्या हिमनद्या

अजस्त्र, संथ गतीने पुढे सरकणारे बर्फाचे ढीग म्हणजे ग्लेशियर्स, किंवा हिमानद्या. पर्वतरांगा, ध्रुवप्रदेश आणि ठराविक उंचीवर हे गोठलेले जलाशय आढळतात.
Weather
Weathersakal
Updated on

अजस्त्र, संथ गतीने पुढे सरकणारे बर्फाचे ढीग म्हणजे ग्लेशियर्स, किंवा हिमनद्या. पर्वतरांगा, ध्रुवप्रदेश आणि ठराविक उंचीवर हे गोठलेले जलाशय आढळतात. जगातील अनेक नद्यांच्या या बर्फमय उगमस्थानाला ‘क्रायोस्फियर’ म्हणजे हिमआच्छादित प्रदेश म्हणतात. जिथे हिमवृष्टी मुबलक असते, पण बर्फ वितळण्याचा वेग मात्र त्यापेक्षा कमी असतो, अशा ठिकाणी गोड्या पाण्याचा बर्फरूपी साठा तयार होतो.

हिमनद्या जलचक्राचा एक महत्त्वपूर्ण घटक आहेत. उन्हाळ्यात त्या वितळू लागल्या की नद्या, पाणथळ जागा आणि भूजल स्रोतांतून गोड्या पाण्याचे वितरण सुरू होते. क्रायोस्फियर हे हिंदुकुश हिमालय क्षेत्रात पाण्याचे महत्त्वाचे स्रोत आहे. पाकिस्तान, भारत, तिबेट, नेपाळ, भुतान आणि बांग्लादेश स्थित सुमारे २ अब्ज लोकं यावर अवलंबून आहेत. हिमालय आणि अँडीज पर्वतरांगेच्या हिमनद्यामुळे मोठ्या प्रमाणात जलविद्युत निर्मिती होते.

हिमनद्यांचे अस्तित्व हे पर्जन्य, तापमान आणि पृष्ठभागावरील पाणीप्रवाह यांच्यातील गुंतागुंतीचे संबंध दर्शविते. आज जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्याच्या वितळण्याच्या वेगात अभूतपूर्व वाढ झाली आहे. याचा परिणाम जगभरातील हिमनद्यांवर दिसतो. सोळाव्या शतकात पृथ्वीच्या काही भागावर स्थानिक लघु हिमयुग होते. त्याकाळात आणि आज या कालावधीत हिमालयातील हिमानद्याचे क्षेत्र ४० टक्क्यांनी घटले आहे. परिणामी हिमानद्यांचा पाणीसाठा आणि आकारमान बदलते.

गोमुख हे गंगोत्री हिमनदीचे तोंड. उष्णतेमुळे हे झपाट्याने ओसरत असल्याचे दिसून येते. २००५मध्ये वर्षाला सुमारे नऊ मीटर ओसरत असलेले गोमुख २०१६ मध्ये वर्षाला २५ मीटर मागे जात होते. कोलंबिया आणि अलास्कातील काही हिमनद्या २०० मीटरहून जास्त ओसरल्या आहेत. एकीकडे हिमानद्या वितळण्याचे प्रमाण वाढले आहे, तर दुसरीकडे हिमवृष्टी घटत चालली आहे.

वितळणाऱ्या बर्फामुळे नद्यांमध्ये अधिक पाणी उपलब्ध होते; पण हिमवृष्टी कमी झाल्यामुळे दीर्घकालीन पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वाढते. वितळण्याचा वेग वाढला की पुराचा धोका वाढतो. पुढे नदीत धरण असेल तर हा प्रवाह अधिक धोकादायक ठरतो. तीस्ता नदीच्या खोऱ्यात ३१३ हिमनद्या आहेत.

२०२३ मध्ये ‘ग्लेशियल लेक आउटबर्स्ट’ घटना घडली. म्हणजे नदीच्या वरच्या भागावरच्या हिमनद्या झपाट्याने वितळत असतानाच अतिवृष्टी झाली. या पुराचा जोर इतका होता की, चुंगथांगचे तीस्ता स्टेज III जलविद्युत प्रकल्पाचे ६० मीटर उंच काँक्रिट धरण फोडून पॉवर हाऊस पाण्यात बुडाले. यात ४२ लोक मरण पावले आणि यंत्रणा वाहून गेली.

हिमनद्या वितळल्या की झाकलेला दगड किंवा माती उघडी पडते. बर्फाच्या तुलनेत हे गडद असते. या गडद पृष्ठभागावरून परावर्तित होणारा सूर्यप्रकाश बर्फाच्या तुलनेत कमी असतो, त्यामुळे परिसरातील जमिनीचे तापमान वाढते आणि बर्फ वितळण्याचे प्रमाणही वाढते. हिमनद्यांत आणि त्यांनी झाकलेल्या मातीत हरितगृह वायूंचा साठा असतो.

हिमनदी वितळली की हे वायू वातावरणात उत्सर्जित होतात. रशियाखंडातील सायबेरियाचा सुमारे ६५ टक्के भूभाग बर्फाच्छादित आहे. इतल्या पर्माफ्रॉस्टच्या वितळण्यामुळे प्रचंड प्रमाणात मिथेन उत्सर्जित होत आहे. हा अतिधोक्याचा ‘मिथेन टाइमबॉम्ब’ असल्याचे हवामानशास्त्रज्ञ सांगत आहेत.

वितळणाऱ्या हिमनद्यांमुळे समुद्रपातळीत वाढ होत आहे. यामुळे अनेक मोठ्या शहरांचा काही भाग पाण्याखाली जाण्याचा धोका असल्याची भीती शास्त्रज्ञ व्यक्त करतात. समुद्र पातळी काही फुटाने जरी वाढली तरी कोकण किनारपट्टीवर मोठा परिणाम होईल.

जमिन पाण्याखाली जाऊन शेतीचे क्षेत्र कमी होणे, वादळी लाटा आणि चक्रीवादळांमुळे मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानी हे तर होईलच आणि अर्थव्यवस्थेवरही मोठे आघात होतील, अशी भीती आहे. भूजल आणि नद्यांमध्ये खाऱ्या पाण्याचा शिरकाव झाला तर पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर परिणाम होईल.

आज जरी स्पष्ट दिसत नसले तरी हिमनद्यांमधील बदलांचे पडसाद निसर्गात आणि मानवी जीवनावर उमटणार हे निश्चित.   हिमनद्या काही निर्जंतुक पडीक जमिनी नाहीत. या नैसर्गिक परिसंस्थेचे सजीवसृष्टीत आणि मानवी अर्थकार्यात मोठे योगदान आहे. त्यांचे संवर्धन करणे हे आपल्या दृष्टीने अनिवार्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.