‘मासिक पाळी’ या विषयावर स्त्रियांमध्येच नव्हे तर पुरुषांमध्येही जाणीवजागृतीची गरज आहे. त्याच भूमिकेतून काही तरुणांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अस्वस्थकारक वास्तव समोर आले. त्यानिमित्ताने एका गंभीर प्रश्नाचा वेध.
- मंगेश कदम
मा सिक पाळीबद्दल चारचौघांत महिलेने-मुलीने बोलणे म्हणजे महापाप इतका अ-छापील नियम समाजात रूढ असताना एखाद्या पुरुषाने त्याबद्दल बोलणे हे फारच धक्कदायक वाटेल. समाजात आजही मासिक पाळीसंदर्भात गैरसमज-अंधश्रद्धा आहेत.
अलीकडचीच एक घटना. ती आठवली तरी काळजात चर्र होते. बहिणीला आलेल्या मासिक पाळीबद्दल गैरसमज होऊन भावाने बहिणीचा जीव घेतला. अज्ञान हे माणसाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते, हे यातून दिसते.
या गंभीर प्रश्नावर सर्वांगीण विचार व्हायला हवा. वस्तीपातळीवर महिलांसोबत ‘मासिक पाळी’ विषयावर संवाद साधणे तसे कौशल्याचे काम. तशा संवादानंतर एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे मुलींना आपल्या शरीराबद्दल पूर्ण माहिती नसते.
महिलांची स्वतःच्या शरीराबाद्दलची गत अशी असेल तर पुरुषांची मासिक पाळीबद्दलची समजस्थिती किती बिकट असेल, याचा विचार न केलेलाच बरा. असे समाजवास्तव असल्याने पुरुषांसोबत म्हणजेच वस्तीमधील तरुण व वयात येणाऱ्या मुलांसोबत ‘मासिक पाळी’संदर्भात संवाद साधायचा आणि नक्की या मुलांच्या डोक्यात काय चालू आहे, हे शोधायचे ठरवले.
पुण्यात तसा संवाद साधण्यास सुरुवात केली. चर्चेसाठी खूप औपचारिक वातावरण जर तयार केले तर तरुण चर्चेला थांबतही नाहीत. अनुभव सांगणे दुरापास्तच. म्हणून जितके शक्य तितके अनौपचारिक वातावरण तयार करून त्यांच्याशी बोलायला प्रारंभ केला.
मासिक पाळी म्हणजे काय, यावर स्थानिक वस्तीमधील तरुणांनी बाहेरील पुरुषासोबत बोलणे अवघड. या विषयावर बोलायचे म्हणजे. “ओ सर, दुसऱ्या विषयावर बोलूयात की’’ येथून सुरवात होते. जे तरुण शाळा आणि महाविद्यालयात शिकत आहेत त्यांनादेखील मासिक पाळी का येते, याची शास्त्रीय माहिती नाही. ‘‘बायकांच्या पोटात काय तरी प्रत्येक महिन्याला होत असतं, आणि त्यामुळं त्यातून घाण रक्त पोटातून बाहेर येतं.’’ अशा अनेक भ्रामक कल्पना तरुणांकडून पुढे येत होत्या.
तरुणांना मासिक पाळीसंदर्भात माहिती मिळण्याचे स्रोत काय आहेत, हे शोधण्याची उत्सुकता होती. तुम्हाला शाळेत अथवा महाविद्यालयात मासिक पाळी आरोग्याबद्दल माहिती देत असतील ना? तरुणांकडून आलेले उत्तर जरा बुचकळ्यात टाकणारे होते. ‘‘शाळेत अथवा महाविद्यालयात वैयक्तिक आरोग्यासंबंधी माहिती दिली.
परंतु त्यामध्ये हा विषय नव्हता. मुलींचे माहिती देण्याचे सत्र वेगळे असल्याने त्यांना कदाचित माहिती देण्यात आली असेल. परंतु आम्हाला नाही.’’ असे मत बहुतेक तरुणांनी व्यक्त केले. जर तरुणांना त्यांच्या शैक्षणिक संस्थेत ही माहिती देण्यात येत नसेल, तर त्यांच्यात मासिक पाळी आणि आरोग्य यासंबंधी जागृती येणार कशी?
आणि मग जर मूळ स्रोताकडून माहिती देणे नाकारले जात असेल, तर मग मुले त्यांच्या शालेय जीवनापासून त्यांच्या पातळीवर माहिती मिळविण्याचे स्रोत शोधण्यास सुरुवात करतात. ते अचूक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून माहिती देणारे नसल्याने जास्त गैरसमजुती मुलांच्या मनात तयार होत जातात आणि पुढे जाऊन अशास्त्रीय दृष्टिकोन बनण्यास सुरवात होते. मग त्याद्वारा हिंसात्मक कृत्यांचा जन्म होतो.
मासिक पाळीच्या वयासंदर्भात सुद्धा वस्तीमधील युवक जागृत होते, असेही निदर्शनास आले नाही. मुलींना पाळी वयाच्या अठराव्या वर्षी येते, असे बहुतेक युवकांचे मत होते. ‘‘पाळीतून येणारे रक्त हे दुषित असते. आणि त्यामुळे खूप आजार पसरू शकतात.
पोटामध्ये ते महिनाभर जमा होते आणि मग महिन्याच्या शेवटी ते बाहेर येते. ते बाहेर आलेले चांगले असते. त्यामुळे शरीरातील रक्त शुद्ध होते...’’ अशा कित्येक भ्रामक विचारांमध्ये हे युवक आहेत. घरामध्ये कधीही या विषयावर बोलले गेले नसल्याचे युवकांनी सांगितले. त्यामुळे घरामध्ये आईची किंवा बहिणीची होणारी चिडचिड समजू शकली नाही.
असेसुद्धा चर्चेदरम्यान तरुण बोलले. घरातूनच समजा आई- वडिलांपासून पौगंडावस्थेत येत असताना या गोष्टी मुला-मुलींना सांगणे, चर्चा करणे आवश्यक जरी असले तरी वस्तीपातळीवर जगण्या-मरण्याच्या प्रश्नात आई वडील इतके अडकलेले असतात,
की दुपारी खायला मिळाले असेल तर संध्याकाळी मिळेल की नाही याची भ्रांत असते. त्यामुळे वैयक्तिक आरोग्य आणि मासिक पाळी यासंदर्भात आई-वडिलांनी जागृती करणे हे जरी महत्त्वाचे असले तरी यावर त्यांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती प्रभाव पाडत असते.
संस्था खंडीभर, तरी अंधश्रद्धा कायम
योग्य ठिकाणांहून माहिती न मिळाल्याने भलत्याच मार्गाने ती मिळवली जाते. जी या युवकांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी घातक ठरू शकते. अश्लील साहित्य, ऐकीव माहिती, हे त्यामधील प्रमुख माहितीस्त्रोत. बऱ्याच वेळा तरुणांना त्यांच्या प्रेयसीकडून काही प्रमाणात माहिती समजते, असेही या चर्चेत लक्षात आले.
परंतु प्रेयसीकडून समजलेली माहिती कितपत अचूक आहे, याबद्दल शंकाच आहे. याचे कारण अद्यापही शहरी वस्त्यांमध्ये मासिक पाळीसंदर्भात अंधश्रद्धा आहे. त्यासंदर्भातील कर्मकांड पाळले जाते. महिलांचे आरोग्य, मासिक पाळी विषयावर काम करणाऱ्या खंडीभर संस्था सध्या समाजात कार्यरत आहेत.
पुण्यातील काही वस्त्यांमध्ये तर ‘एनजीओं’ची बुजबुज झाली आहे. काम करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जर संस्था कार्यरत आहेत, किंवा शासकीय कार्यक्रम राबविले जात आहेत, तरी अद्यापही यासंबंधी अंधश्रद्धा आणि गैरसमज का टिकून आहेत?
अचूक आणि शास्त्रीय दृष्टिकोन शासकीय कार्यक्रमांनी आणि एनजीओंनी का विकसित केला नाही? पुरुषांचा याच्याशी काही संबंध नाही, अशी धारणा मनात मुरली आहे की काय?
काही शिक्षित पुरुषांशी चर्चेला सुरुवात केली असता, ‘‘हा विषय आमचा नसून महिलांचा आहे. आमच्याशी बोलून काय फायदा? तुम्ही महिलांना याची व्यवस्थित माहिती सांगा.’’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सहज येतात.
मासिक पाळी येण्यापूर्वी फिलोपाईन ट्यूबमधून येणारे स्त्रीबीज जन्मासाठी पोषक असते. गर्भाशय बाळाच्या पोषणासाठी रक्ताचा स्तर आतमध्ये तयार करते. म्हणजेच जन्माच्या आधीपासून पाहिलं पोषण तेच करते.
आपल्या जन्माच्या आधी आपल्या आईच्या शरीरात याच प्रकारची प्रक्रिया पार पडली आहे. त्यातूनच तमाम पुरुषवर्गाचा जन्म झाला आहे, एवढे जरी प्रत्येक पुरुषाने समजावून घेतले तरी या विषयाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलू शकतो. हे काम करण्याची तीव्र गरज आहे.
(लेखक सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.