निर्णयाला बळ देणारी ‘विचारचित्रे’

एखाद्या परिस्थितीला अथवा घटनेला दिला जाणारा प्रतिसाद हे जणू आपल्या मनात, विचारांमध्ये कोरलेले चित्रच होऊन बसलेले असते. त्यालाच ‘मेंटल मॉडेल्स’ म्हणजेच मन:प्रारूपे अथवा किंवा ‘विचारचित्रे’ म्हटले जाते.
निर्णयाला बळ देणारी ‘विचारचित्रे’
निर्णयाला बळ देणारी ‘विचारचित्रे’sakal
Updated on

डॉ. योगेश कुलकर्णी

एखाद्या परिस्थितीला अथवा घटनेला दिला जाणारा प्रतिसाद हे जणू आपल्या मनात, विचारांमध्ये कोरलेले चित्रच होऊन बसलेले असते. त्यालाच ‘मेंटल मॉडेल्स’ म्हणजेच मन:प्रारूपे अथवा किंवा ‘विचारचित्रे’ म्हटले जाते. मानवी मेंदू सुरूवातीपासून विचार करण्याची ऊर्जा वाचवण्यासाठी विचारचित्रे वापरून, अगदी सहज निर्णय घेऊन टाकतो. अशाच काही ‘विचारचित्रां’चे विश्लेषण.

आ पण मानव स्वत:ला एक तर्कशुद्ध विचार करणारा, वस्तुनिष्ठ पुरावे अभ्यासून व साधक-बाधक विचार करून निर्णय घेणारा प्राणी समजतो; पण आपल्याला माहिती आहे, की असे सगळ्यांचेच आणि सर्व वेळेस होत नाही. बऱ्याचदा भावनेच्या भरात, आडमार्गाने, सोपे वाटतील असे, सवयीचे आणि आपल्या नकळत पूर्वग्रहदूषित निर्णय आपण घेत असतो. एखाद्या परिस्थितीला अथवा घटनेला दिला जाणारा प्रतिसाद हे जणू आपल्या मनात, विचारांमध्ये कोरलेले चित्रच होऊन बसलेले असते. प्रदीर्घ अनुभवामुळे आणि प्रतिसादांच्या वारंवारतेमुळे तसे होते. त्यालाच ‘मेंटल मॉडेल्स’ म्हणतात. म्हणजेज मन:प्रारूपे अथवा सोप्या भाषेत ‘विचारचित्रे’. मानवी मेंदू कोठल्याही प्रतिसादासाठी प्रत्येक वेळेस अगदी सुरवातीपासून विचार करायला लागल्यास खूप ऊर्जा खर्च होईल. म्हणून ती वाचवण्यासाठी तो ‘विचारचित्रे’ वापरून, सहज निर्णय घेऊन टाकतो. हे घडते आहे याची सजगता आपल्याला आली आणि त्यात गरजेनुसार बदल करण्याचा साक्षीभाव आला, तर निर्णय अजून बरोबर येऊ शकतात. केवळ स्वत: वापरत असलेली विचारचित्रे न बघता, विविध प्रकारची व विविध विषयांतून आलेली अनेक विचारचित्रे आपल्याला माहिती असली, तर निर्णयप्रक्रिया अजूनच समृद्ध होईल, नाही का? काही महत्त्वाची आणि सर्वसामान्य आयुष्यात वापरता येणारी विचारचित्रे पुढे बघू.

नकाशा-प्रदेश-फारकत

इंग्रजीमध्ये यास ‘मॅप इज नॉट द टेरिटोरी’ म्हणतात. म्हणजेच ‘नकाशा हा काही प्रदेश नव्हे’ हे ‘विचारचित्र’. नकाशा हा एखाद्या प्रदेशाचे-भूभागाचे फक्त एक प्रातिनिधिक चित्र-प्रारूप असते. उदाहरणार्थ, पुण्याचा नकाशा. तो भौगोलिक नकाशा असेल, तर त्यात पुण्यातील डोंगर, नद्या, तळी इत्यादी दाखवलेले असते; तसेच तो वाहतुकीचा नकाशा असेल तर त्यात रस्ते, मेट्रो मार्ग, लोहमार्ग इत्यादी दाखविलेले असते. मात्र, कोठल्याही नकाशात जमिनीवरील सत्य तंतोतंत उतरणार नाही. तो जुना असू शकतो किंवा चुकीचाही. प्रत्यक्ष तेथे गेल्याशिवाय पूर्ण सत्यता पाहता येत नाही. म्हणजेच नकाशा बघताना चुकीला मुभा ठेवावी लागते. इतर उदाहरणे म्हणजे शेअर बाजाराचा निर्देशांक हा अर्थव्यवस्थेची ढोबळ कल्पना देऊ शकतो; पण तो देशाच्या आर्थिक परिस्थितीचे पूर्ण सत्य स्वरूप नाही. जाहिरातीमध्ये दिसणारे गृहप्रकल्पाचे चित्र-विवरण आणि जमिनीवरील परिस्थिती यात फरक असू शकतो. समाजमाध्यमांवर दिसणारे एखाद्याचे प्रोफाइल बनावट असू शकते. मथितार्थ हाच की, आपल्यासमोर जे दिसते आहे त्यात सत्यतेचा अंश किती असेल याचा नीट विचार करूनच पुढचे पाऊल उचलावे.

अधिकार कक्षा

‘सर्कल ऑफ कॉम्पिटन्स’ या मेंटल मॉडेलला आपण ‘कौशल्यक्षेत्र’ अथवा ‘अधिकारकक्षा’ म्हणू शकतो. त्यानुसार निर्णय घेताना समोरील परिस्थिती आपल्या कौशल्याच्या, अधिकाराच्या अथवा आकलनाच्या कक्षेत आहे का ते तपासून पाहावे आणि असेल तरच निर्णय घ्यावेत. उदाहरणार्थ, आपण वैद्यकीय शिक्षण घेतले नसेल, तर उगाचच गुगल पाहून किंवा मनाला येईल ते स्वयमोपचार करू नयेत. याचा अर्थ हा नाही, की आपले अधिकारक्षेत्र सीमित ठेवावे. अधिक अभ्यास करून अधिकारकक्षा नक्कीच रुंदावता येतील, विविध विषयांत मुशाफिरी नक्कीच करता येईल; पण ते अधिकारकक्षेत येईपर्यंत महत्त्वाचे निर्णय घेणे टाळावे. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

मूलतत्त्व विचार

‘फर्स्ट प्रिन्सिपल थिंकिंग’ या मेंटल मॉडेलला आपण ‘प्रथमपासून-मूलभूत विचार’ अथवा ‘मूलतत्त्व विचार’ म्हणू शकतो. समस्येच्या मुळापर्यंत-त्रिकालाबाधित सत्यापर्यंत जाऊन मग परत मागे समस्येपर्यंत उकल करीत जाणे हा मार्ग आहे. यामुळे विचारांतील रूपके किंवा गृहीतके गळून पडतात. उगाच भारंभार वस्तू विकत घेण्यापेक्षा, त्या कशासाठी घेतो आहे ते पाहणे, ती वस्तू आपली कोठली गरज पूर्ण करीत आहे ते पाहणे, असे मागे जाऊन, परत उलटे येताना प्रत्येक पायरीवर विविध पर्याय सापडू शकतात आणि मग निर्णय चांगला घेता येतो. यासाठी प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांचे उदाहरण देता येईल. त्यांना इलेक्ट्रिक कार बनवताना त्यातील बॅटरीची किंमत कशी कमी करता येईल हे बघायचे होते. विविध उत्पादकांशी संपर्क साधून स्वस्त बॅटरी निवडणे, हा सरधोपट मार्ग होता; पण त्यांनी ‘मूलतत्त्व विचार’ तत्त्व वापरून सखोल जायचे ठरवले. बॅटरी बनवायला काय लागते, त्या मालाच्या किंमतींची बेरीज काय इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले. त्यांनी बॅटरीच्या कार्याचे भौतिकशास्त्र व रसायनशास्त्रापर्यंत खोल जाऊन विश्लेषण केले, तेव्हा त्यांना बॅटरीची खरी किंमत काढता आली आणि दहा-वीस टक्क्यांची बचत होऊ शकते हे समजले. वैयक्तिक आयुष्यातही या तत्त्वाचा चांगला वापर होऊ शकतो.

विपरीत दृष्टी

इंग्रजीमध्ये यास ‘इन्व्हर्जन’ म्हणतात. त्यास आपण ‘उलट विचार’ अथवा ‘विपरीत दृष्टी’ म्हणू शकतो. यात परिस्थितीकडे अथवा घटनेकडे सरळ ना बघता विरुद्ध दृष्टीने पहिले जाते. यश कसे मिळेल यापेक्षा अपयश कसे येणार नाही हे पहिले जाते. हे सुरक्षितपणाकडे झुकलेले वाटत असले, तरी अतीव नुकसान कमी कारणाचा अथवा टाळण्याचा हा विचार आहे. उदाहरणार्थ, करिअर ठरवताना मला याच क्षेत्रांमध्ये आणि कंपनीमध्ये नोकरी मिळावी, हा आग्रह न ठेवता, कोणत्या क्षेत्रांमध्ये अथवा कंपन्यांमध्ये काम करायला आवडणार नाही याची यादी करावी. यातून कामासाठीच्या क्षेत्रांच्या पर्यायांची संख्या आपोआप वाढते. सहलीसाठी कोठे जायचे यावर काथ्याकूट न करता, कोठे जायचे नाही यातून सार्वमत होणे सुलभ जाते. या तत्त्वाचा अजून एक पैलू म्हणजे, अनपेक्षित झाल्यास काय करायचे याची तजवीज करून ठेवणेही आहे. मग तेव्हा नुकसान किमान कसे करता येईल याची योजना करायची. नवीन दुकान काढले; पण अपेक्षित प्रमाणात ग्राहकच आले नाहीत तर तेथे दुसरे उत्पादन विकावे, की जागा भाड्याने द्यावी असा हा विचार. थोडक्यात, ‘प्लॅन बी’ म्हणजेच ‘पर्यायी योजने’चा हाही विचार करून ठेवावा.

अशा प्रकारची अनेक ‘मेंटल मॉडेल्स’ उपलब्ध आहेत. ती जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, वित्त इत्यादी विविध विषयांतून आलेली आहेत. त्यांची माहिती घ्यावी, वापरण्याचा प्रयत्नही करावा. त्यामुळे आपल्या विचारांमध्ये येणारे साचलेपण दूर होते, त्रुटी कळतात व वेगवेगळ्या दृष्टीने विचार करण्याची आणि त्यानुसार निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.