कोविडला आळा घालण्यासाठी कुठले उपाय परिणामकारक ठरताहेत, कुठले नाही हे सतत पाहात राहून त्याप्रमाणे धोरणात बदल करण्यात शहाणपणा आहे. ठाणबंदीसारख्या सरसकट उपायांच्या मर्यादा संशोधनांतून स्पष्ट झाल्या आहेत.
पुस्तकी ज्ञान आणि वास्तव यात नेहमीच फरक असतो. असं असणं नैसर्गिक आहे आणि अपरिहार्यही. कारण वास्तव गुंतागुंतीचं असतं. एवढी गुंतागुंत पुस्तकात मावत नाही. त्यामुळे पुस्तकातली तत्त्वं सोपी करून सांगितलेली असतात. ती चुकीची नसतात. पण सोपं करण्याच्या नादात वास्तवाशी फार मोठी फारकत झाली तर ते ज्ञान निरुपयोगी होऊ लागतं. कोविडच्या साथीचे चढउतार आज पुन्हा एकदा ही पुस्तकी ज्ञानाची मर्यादा स्पष्ट करत आहेत. हा रोग विषाणूजन्य आहे. हा विषाणू हवेतून आणि स्पर्शातून पसरतो. त्यामुळे एकमेकांपासून अंतर ठेवा, गर्दी टाळा, शक्यतो घराबाहेर पडू नका, मास्कचा वापर करा, याने रोग पसरायचा थांबेल. हे झालं नाही तर सक्तीनं लॉकडाउन करावं लागेल. लोक सक्तीने घरी बसवले तर रोगाचा प्रसार रोखता येईल. ही सोपी आणि पुस्तकी तत्त्वं आहेत. गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये जेव्हा जागतिक संकटाची एकदम जाणीव झाली, तेव्हा जगभर हीच तत्त्वे सांगितली गेली. आता आपल्याकडे जवळजवळ वर्षभराचा अनुभव आहे आणि आकडेवारीही. त्यावरून आपण तपासून पाहू शकतो, की या तत्त्वानी कुठे कसं आणि किती काम केलं ते.
पहिल्या लाटेत कडक लॉकडाउन पाळून या विषाणूला जवळजवळ हद्दपार करण्यात जगातल्या फक्त वीस -बावीस देशांना यश आल्यासारखं वाटलं. त्यापैकी बहुतेक देशांमधे लवकरच दुसरी लाट आली, जी पहिल्यापेक्षा बरीच मोठी होती. न्यूझीलंडसारख्या अपवादात्मक देशालाच विषाणू हद्दपार करणं जमलं. इतर अनेक देशांमध्ये लॉकडाउनच्या काळात रोगप्रसाराचा वेग कमी झालेला दिसला नाही आणि लॉकडाउन उठवल्यानंतर तो वाढलेलाही दिसला नाही. जगात अनेकवेळा अनेक कारणांनी लोकांनी नियम मोडून गर्दी केली, रस्यावर येऊन दंगली आणि निदर्शने केली, या काळात कसलं अंतर आणि कसला मास्क? भारतात तर असे अनेक प्रसंग आले. त्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बिहारची निवडणूक झाली.
दिवाळी आली आणि बाजार गजबजले, नवीन वर्षाच्या स्वागताला काहींनी संयम पाळला, बऱ्याच जणांनी नाही. मग दिल्ली, पंजाब, हरियाना सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु झालं, ते अजून संपलेलं नाही. यातही खूप गर्दी, खूप मोठ्या सभा, मोठ्या संख्येनी लोकांनी फार काळ निकट सहवासात राहणं, मास्क वगैरेचं नावालाच कुठे कुठे अस्तित्व. असे सगळे प्रकार झाले. या सगळ्या घटनांनंतर स्थानिकरीत्या तरी साथीचा प्रादुर्भाव वाढलेला दिसायला पाहिजे. पण डेटा नीट पहिला तर असं चित्र दिसत नाही. जेव्हा जेव्हा लोकांनी काळजीची पथ्ये धाब्यावर बसवून गर्दी केली त्या त्या वेळी रोगप्रसार वाढला, असं कुठलीच आकडेवारी सांगत नाही. याउलट सप्टेंबर मध्यानंतर संपूर्ण देशातून साथीचा जोर कमी होऊ लागला, तो लोक खूप शहाण्यासारखे वागल्यामुळे कमी झाला, असंही म्हणता येत नाही.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
‘लॉक’मुळे ‘डाउन’ नाही
भारतात मार्च २०२०पासून दररोज किती नवे बाधित सापडले, त्याचा आलेख पाहा. या आलेखाचा स्थानिक चढाव (slope) त्या त्या वेळचा संसर्गाचा वेग दर्शवतो. लॉकडाउननंतर चढाव कमी झाला किंवा लॉकडाउन उठवल्यानंतर वाढला असं काही दिसत नाही. लॉकडाउनमुळे विषाणूच्या प्रसाराला आळा घातला जातो आणि गर्दी केल्यामुळे प्रसार वाढतो या पुस्तकी पांडित्यात आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीमधे खूप तफावत आहे असं दिसतं. स्थानिक पातळीवर साथीचे जे अनेक चढउतार दिसले त्याची सगळी कारणं खरं तर आपल्याला समजलेली नाहीत. रोगाच्या प्रसारावर परिणाम करणारे अनेक घटक असतात. ते सगळे आपल्याला समजले आहेत, असं म्हणता येत नाही. काही अंदाजे सांगता येतात पण बारकावे अज्ञात आहेत. जे माहीत आहेत त्यापैकीही आपलं ज्याच्यावर नियंत्रण असू शकेल असे फारच थोडे आहेत. ज्यावर आपलं थोडं तरी नियंत्रण असू शकतं अशा घटकांना अधिक महत्त्व द्यावं हे धोरण योग्यच आहे. आपल्या परीनी काळजी घ्या हा सल्ला पूर्णपणे बरोबर आहे. पण त्याच्यामुळेच सगळं काही होतं, अशी समजूत करून देणं ही लोकांची दिशाभूल आहे. ज्या ज्या वेळी विषाणूचा प्रसार वाढला त्या त्या वेळी लोक बेशिस्त वागल्यामुळेच तो वाढला, व्यवस्थापन नीट न केल्यामुळेच वाढला, अशा आरोपांना काही आधार नाही.
देशाच्या पातळीवर कुठल्याही साथीच्या रोगाचा आलेख जशा आकारात दिसणं अपेक्षित आहे तशाच आकारात तो दिसला आहे. त्यात आपल्या ‘व्यवस्थापना’मुळे फार मोठा फरक पडत असल्याचे पुरावे नाहीत. हे निराशाजनक किंवा दैववादी चित्र नाही. उलट वास्तववादी आणि शहाणपणाचं आहे. कुठले उपाय परिणामकारक ठरताहेत कुठले नाही हे सतत पहात राहून त्याप्रमाणे धोरणात बदल करण्यात शहाणपणा आहे. विषाणूला पसरण्यापासून रोखण्यात आपल्या प्रयत्नांनी फार फरक पडला असं दिसत नाही. आज अनेक तज्ञ हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मान्य करताहेत. पण त्याचबरोबर अनेक आघाड्यांवर देदिप्यमान यशही मिळालं आहे. एकीकडे उच्चांकी वेगाने लस निर्माण करण्यात संशोधकांना यश आलं आहे. त्याचं वितरण अजूनही आव्हानात्मक आहे. दुसरीकडे लस येण्याच्या कितीतरी आधीपासून संसर्ग झालेल्यांमधला मृत्युदर कमी करण्यात चांगलं यश मिळालं आहे, सगळ्या जगातही आणि भारतातही. मृत्युदर कमी होण्याचीही अनेक कारणं आहेत. त्यांचा नीट अभ्यास केला तर ती कारणं समजतील आणि मृत्युदर आणखीही कमी करता येईल. तसं झालं तर विषाणूची संपूर्ण हकालपट्टी झाली नाही तरी जवळपास इतर सर्दी खोकल्यासारखंच याही रोगाचं स्वरूप होऊन भीतीचं कारण नाहीसं होईल.
युद्धामधल्या नेतृत्वाचा प्रधान गुण असा असावा लागतो, की कुठल्या आघाडीवर यश मिळेल कुठल्या नाही, याचा सतत अंदाज आणि आढावा घेत राहून त्याप्रमाणे धोरणात बदल करत राहणे. ज्या आघाडीवर यश मिळेल असं दिसत नसेल तिथून हवं तर धोरणात्मक माघार घेऊन दुसऱ्या आघाडीवर खोलवर मुसंडी मारता आली तर विजय निश्चित. आणि असा विजय नक्कीच मिळवता येणार आहे. त्यासाठी किती बाधित झाले, याच्या आकड्यांनी घाबरून जाऊन लॉकडाउनच्या धमक्या देत राहण्यापेक्षा रुग्णांना आधार पुरवणे अधिक लवचिक आणि सक्षम कसा ठेवता येईल, लसीचं वितरण अधिक सक्षम कसं करता येईल, जास्तीत जास्त लोकांना गंभीर लक्षणं आणि मृत्यूपासून कसं वाचवता येईल आणि लोकांच्या मनातली भीती जाऊन सर्व सामाजिक जीवन पूर्ववत कसं करता येईल यावर भर द्यायला हवा. यासाठी आपल्याला आज न समजलेले साथीच्या प्रक्रियेमधले बारकावे समजण्यासाठी पूर्वग्रह बाजूला ठेऊन केलेलं सखोल संशोधन आवश्यक आहे. या विवेचनाचा अर्थ असा नाही, की लोकांनी आता कसेही वागले तरी चालेल. मास्क आवश्यक आहेच. मात्र वैज्ञानिकांना आणि आरोग्यव्यवस्थांना सोप्या पण काम न करणाऱ्या पुस्तकी मंत्रांमधून बाहेर पडून वास्तवाला सामोरं जावं लागेल. तरच अनावश्यक भयगंड बाजूला सारून समाज निर्भयपणे परिस्थितीवर मात करू शकेल.
( लेखक शास्त्रज्ञ आहेत.)
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.