मन मंदिरा...: आई, बाबा सोडून नाही ना जाणार?

लहान मुलं मोठी होत असताना वेगवेगळ्या भावना अनुभवत असतात. साधारणपणे ह्या भावना समान असतात फक्त त्यांच्या तीव्रतेमध्ये मुलाप्रमाणे फरक असतो
मन मंदिरा...: आई, बाबा सोडून नाही ना जाणार?
मन मंदिरा...: आई, बाबा सोडून नाही ना जाणार?sakal News
Updated on

लहान मुलं मोठी होत असताना वेगवेगळ्या भावना अनुभवत असतात. साधारणपणे ह्या भावना समान असतात फक्त त्यांच्या तीव्रतेमध्ये मुलाप्रमाणे फरक असतो. जेंव्हा मुलांचा (तान्ह्या बाळांचा) विकास होत असतो तेव्हा सर्वप्रथम त्यांना आई, बाबा किंवा आसपासच्या काळजी घेणाऱ्या व्यक्ती तसंच घरातलं वातावरण ह्यांची सवय होते. जेव्हा आई किंवा काळजी घेणारी व्यक्ती आसपास नसते, तेव्हा ती बावचळतात; तसंच त्यांना असुरक्षित वाटू लागतं, रडतात. तसंच अनोळखी ठिकाणी तसेच गर्दीच्या ठिकाणी आसपास ओळखीची व्यक्ती नसेल तरीही मुलांना असुरक्षित वाटू शकतं. ही गोष्ट नॉर्मल आहे. परंतु थोडं मोठं झाल्यावर, शाळेत किंवा प्रायमरी स्कूलमधे जायच्या वयातसुद्धा प्रचंड आकांडतांडव, रडणं वगैरे गोष्टी सुरूच असतील तर ती सेपरेशन anxiety disorder असू शकते.

त्याची मुलांमधे सर्वसाधारण पुढील लक्षणं दिसतात :

१. पालक तात्पुरते दूर झाले, तरी अतिशय अस्वस्थता निर्माण होणे. रडून गोंधळ घालणे. २. वेडीवाकडी स्वप्नं पडणं, विशेषत: आई बाबा आपल्याला एकटं टाकून गेले आहेत अशी स्वप्न पडणं ३. पालक सोडून जातील, ह्या भीतीनं शाळेत जाणं टाळणं ४. आई किंवा बाबा सोडून काही काळासाठीसुद्धा एकटं झोपायला तयार नसणे. ५. सारखं आजारी पडणं ६. आई वडील सोडून जातील अशी सारखी भीती तसंच त्यांना काही तरी होईल, असं वाटत रहाणं. ७. सारखं आई बाबांना चिकटून रहाणं ८. लहान सहान गोष्टींसाठी आकांडतांडव, हट्ट करणं.

थोड्या मोठ्या मुलांमधे देखील पुढील लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करू नये कारण ती separation anxiety शी संबंधित असू शकतात. १. वयाला न शोभणारा हट्टीपणा २. शारीरिक त्रास होतो उदा. पोट, डोकं दुखतं अशा सारख्या तक्रारी करणं. ३. समवयीन मुलामुलींपासून, मित्रमैत्रिणींपासून, नातेवाईकांपासून दूर रहाणं ४. आठवडेच्या आठवडे शाळेत न जाणं ५. कुठल्यातरी भीतीच्या किंवा दडपणाखाली रहाणं ६. घरापासून दूर रहाण्याची भीती वाटणं.

सर्वसाधारण कारणे : १. आई वडिलांपैकी कोणाला जर अस्वस्थतेचा आजार असेल तर मुलांमध्ये अशा प्रकारची समस्या असू शकते. २. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, पाळीव प्राण्याचा मृत्यू ह्यामुळे थोड्या मोठ्या मुलांमध्ये ही disorder येऊ शकते. ३. शाळा बदल, हॉस्पिटल मध्ये राहावं लागणं अशा पद्धतीच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे समस्या उद्भवू शकते. ४. पालकांचे विकोपाला गेलेले वाद आणि भांडणं ५. पालकांचं over protective असणं हेही कारण ठरू शकतं.

उपचार : मुलांबरोबरच पालकांचं समुपदेशन आवश्यक ठरतं. औषधोपचार व थेरपीही महत्त्वाची. शाळा व्यवस्थापनाचं सहकार्य महत्त्वाचं. उपचारात प्ले थेरपी आणि स्कूल बेस्ड समुपदेशनही उपयोगी ठरतं.

पालकांसाठी महत्त्वाचे कानमंत्र : १. या समस्येविषयी शास्त्रीय माहिती करून घ्यावी २. थोड्या थोड्या अवधीसाठी एकटं राहण्याची सवय मुलांना लावावी.लहान बाळांना खूप भूक वा तहान लागली की चिंता जाणवते. त्यांच्या बाबतीत फिडींग झाल्यावर थोडा वेळ एकटं ठेवण्याचा अवधी असावा. ३. दूर जाताना मुलांना गुड बाय, कीस करणं, लगेच परत येते अशी वाक्य म्हणणं अशा गोष्टींची सवय करावी. ४. थोड्या मोठया मुलांबरोबर प्रेमानं संवाद साधावा. त्यांच्या भावना समजून घ्याव्यात. म्हणजेच अतिशय शांत रहावं. स्वत: अजिबात घाबरून जाऊ नये. ६. जी मुलं ह्या समस्येमुळे शाळेत जात नाहीत, अशांना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावं. मुलांना सामाजिक उपक्रमांत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावं आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं.

शाळांसाठी सूचना : ज्या मुलांना अशी समस्या आहे अशांसाठी वेगळी योजना बनवावी. उदा. १. त्यांना सुरवातीला उशिरा येण्याची सवलत देणे (सवय होईपर्यंत). २. सुरवातीला थोडा वेळ शाळेत येणे (सवय होईपर्यंत). ३. मुलांना सुरक्षित वाटेल अशा वर्गात किंवा जागेत काही काळ बसण्यास परवानगी. ४. अशा मुलांना सुरवातीला घरी संपर्क करण्याची परवानगी देणे ५. शिक्षक आणि शाळेच्या समुपदेशकाने त्यांच्या संपर्कात रहाणे व त्यांचा आत्मविश्वास वाढेल असा प्रयत्न करणे. ६. मुलांना प्रोत्साहनपर शाबासकी देणे. हे सगळं करायचं आहे ते मुल धीट होईल, शाळेच्या वातावरणाशी समरस होईल व त्याचा पालकांपासून दूर, शाळेच्या वेळेत एकटं रहाण्याविषयीचा विश्वास वाढेल ह्यासाठी.

वेगळे होण्याच्या भीतीवर वर मात करण्यासाठी थोडक्यात पुढील गोष्टी घडायला हव्यात -

आई बाबा नसतानाही मुलांना घरी सुरक्षित वाटायला हवं. आई बाबांबरोबरच त्यांचा इतर परिचित व्यक्तींवर विश्वास बसायला हवा आणि मुख्य म्हणजे आई- बाबा काही काळासाठी दूर गेले तरी काही अवधीनंतर ते निश्चित भेटणार आहेत हा विश्वास त्यांच्यात रुजायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.