काही वर्षांपूर्वीच त्यांनी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांचे पुत्र नेविल टाटा यांच्याशी विवाह केला
जेव्हा तुमचे आडनाव एखाद्या प्रसिद्ध घराण्याशी जोडलेले असते, तेव्हा साहजिकच लोकांच्या अपेक्षा उंचावलेल्या असतात. त्यातच ते आडनाव किर्लोस्कर, टाटा अशा मोठ्या उद्योगघराण्यांशी संबंधित असेल, तर मग अपेक्षांचे ओझेही वाटू शकते.
अशाच वेळी तुमची कसोटी असते. क्षमता, कर्तृत्व, कौशल्य, बुद्धिमत्ता अशा साऱ्यांची जणू परीक्षाच घेतली जाते. या परीक्षेत जो उच्च श्रेणीत उत्तीर्ण होतो, त्याला नेतृत्वाची सुवर्णसंधी मिळते. मानसी किर्लोस्कर-टाटा यांच्या बाबतीत नेमके असेच घडले आहे.
टोयोटा किर्लोस्कर मोटार (टीकेएम) आणि टोयोटा किर्लोस्कर ऑटो पार्टस (टीकेएपी) या नामांकीत कंपन्यांच्या उपाध्यक्षपदी त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ उद्योगमहर्षी (कै.) शंतनूराव किर्लोस्कर यांची पणती आणि ज्येष्ठ उद्योगपती विक्रम व गीतांजली किर्लोस्कर यांची एकुलती कन्या असलेल्या मानसी यांनी नवनवीन शिकण्याची कास धरून मारलेली भरारी निश्चितच कौतुकास्पद आहे.
त्यांचे पणजोबा (कै.) शंतनूराव नेहमी म्हणत असत, ‘तुम्ही तुमचं शिकणं कधीच थांबवू शकत नाही.’ त्यामुळे आपल्या जीवनाचे सुरवातीपासूनचे हेच ध्येयवाक्य होते, असे मानसी सांगतात. किर्लोस्करांसारख्या नामांकीत घराण्यात त्यांना उद्योजकीय बाळकडू मिळाले, पुढे टाटांसारख्या उच्च उद्योजकीय परांपरा जपणाऱ्या घराण्याशी त्यांचे नातेसंबंध निर्माण झाले आहेत.
सोन्याचा चमचा घेऊन जन्मणाऱ्यांना फारसा संघर्ष करावा लागत नाही, असे सर्वसाधारणपणे बोलले जाते. पण मानसी यांच्या बाबतीत ही गोष्ट खरी ठरत नाही. टप्प्याटप्प्याने काम करत, कौशल्य सिद्ध करत त्यांना यशाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या.
भारतीय वाहन उद्योगाविषयीची त्यांची जाण आणि ग्राहककेंद्री सर्वसमावेशक विचार करण्याची क्षमता वादातीत असून, याचीच दखल घेत टोयोटा किर्लोस्कर मोटारचे व्यवस्थापकीय संचालक मासाकाझु योशिमुरा यांनी या तरुण उद्योजिकेवर विश्वास टाकत मोठी जबाबदारी सोपविली आहे. मराठी उद्योगजगतासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब म्हणावी लागेल.
काही वर्षांपूर्वीच त्यांनी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांचे पुत्र नेविल टाटा यांच्याशी विवाह केला. दोन मोठ्या उद्योगघराण्यांशी नाते जोडणाऱ्या मानसी यांना आता वाहन उद्योगातील आपल्या कंपनीला नव्या उंचीवर पोचविण्याचे आणि त्याच बरोबरीने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे.
अर्थात त्यांच्यातील जिद्द, कर्तृत्व आणि सतत नवनवे शिकण्याचे बाळकडू यशोशिखरावर नेईल, असा विश्वास वाटतो. २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्राने त्यांची ‘यंग बिझनेस लीडर’ म्हणून केलेली निवड विशेष दखल घेण्यासारखी आहे. प्रामुख्याने बंगळरूमध्ये लहानाची मोठी झालेल्या मानसी या निव्वळ एक तरूण आणि यशस्वी उद्योजिका नाहीत;
तर त्या अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेल्या सर्जनशील कलाकार पण आहेत. त्यांनी अमेरिकेतील ऱ्होड आयलंड स्कूल ऑफ डिझाईनमधून शिक्षण पूर्ण केले आहे. आपल्या जीवनातील सर्वांत चांगला काळ या कॉलेजमधील होता, असे त्या सांगतात.
एक उत्तम चित्रकार म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख लहानपणीच मिळविलेली आहे. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांचे पहिले कला प्रदर्शन भरले होते. व्यवसायाव्यतिरिक्त त्या ‘केअरिंग वुईथ कलर्स’ ही व्हिज्युअल आर्टच्या माध्यमातून शिक्षण देणारी सामाजिक संस्थाही चालवतात. किर्लोस्कर-टाटा घराण्यातील ही तरुण, सर्जनशील उद्योजिका ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा...’ असे म्हणत दमदार पावले टाकत आहे, हे निश्चित!
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.