भारताचा ‘जी-२०’ अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा परिस्थिती सुधारणारा, सुसंवाद निर्माण करणारा आणि आशादायक बनवण्यासाठी आपण एकत्र येऊ या.
भारताचा ‘जी-२०’ अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा परिस्थिती सुधारणारा, सुसंवाद निर्माण करणारा आणि आशादायक बनवण्यासाठी आपण एकत्र येऊ या. एका नव्या आदर्शाला आकार देण्यासाठी मिळून काम करू या... जी-२० अध्यक्षपद भारताकडे आले असून, त्याचा कार्यकाळ आजपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त.
जी-२० समूहाच्या या आधीच्या १७ अध्यक्ष देशांनी अतिशय लक्षणीय असे काम केले आहे. जागतिक स्थूल-आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी, आंतरराष्ट्रीय कररचनेचे सुसूत्रीकरण करण्यासाठी, देशांवर असलेले कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी त्यांनी बजावलेली कामगिरी लक्षणीय आहे. या सगळ्याचा आपल्याला लाभ होणार आहेच; त्यांच्या आधारावरच आपल्याला भविष्याची उभारणी करायची आहे. मात्र, जेव्हा भारत आज एक महत्त्वाची जबाबदारी घेत आहे, त्यावेळी मी माझ्या मनाला विचारतो- आज जी-२० जिथे आहे, त्याच्या पलीकडे जाऊ शकेल का? मानसिकतेत एक मूलभूत परिवर्तन करण्यासाठी आपण उत्प्रेरक ठरु शकू का? ते परिवर्तन म्हणजे संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा विचार करणे. मला असा विश्वास वाटतो, की आपण हे करु शकतो.
आपली मानसिकता आजूबाजूच्या परिस्थितीनुसार बनत असते. जागतिक इतिहासात मानवतेकडे दुर्लक्ष केले गेले. आपण,सर्वजण मर्यादित संसाधनांसाठी भांडले. कारण इतरांना ती न मिळू देण्यात, ती नाकारण्यावर आपले अस्तित्व अवलंबून होते. आपल्या कल्पना, आदर्श आणि ओळख- यांमधील संघर्ष आणि स्पर्धा- ही एक पद्धत बनून गेली आहे. दुर्दैवाने, आजही आपण त्याच जुन्या शून्य बेरजेच्या मानसिकतेत अडकलो आहोत. आजही अनेक देश, प्रदेश किंवा संसाधनांसाठी लढाया करतात. आपण पाहतो की, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचा वापर एखाद्या शस्त्रासारखा केला जातो. आपण हे बघतो, जेव्हा, कोट्यवधी लोकांना धोका असूनही, लसींचा साठा केला जातो.
एक पृथ्वी, एक कुटुंब...
कदाचित काही लोक असाही युक्तिवाद करतील, की संघर्ष आणि लोभ, या मानवाच्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत. पण मी याच्याशी असहमत आहे. जर मानव सुरुवातीपासून स्वार्थी प्रवृत्तीचा असेल, तर, मग ‘एकत्व’ या मूलभूत तत्त्वाचा उपदेश करणाऱ्या ज्या अनेक आध्यात्मिक परंपरांनी आपला चिरस्थायी ठसा समाजावर उमटवला आहे, त्यांचा अर्थ काय समजायचा, हे कोणी स्पष्ट करेल का? अशीच एक परंपरा, जी भारतात लोकप्रिय आहे, त्यात सर्व सजीव प्राणीमात्र आणि एवढेच नाही, तर अगदी निर्जीव गोष्टीसुद्धा पंचमहाभूतात सामावलेल्या आहेत, असा विचार मांडला आहे. - ती पंचमहाभूते म्हणजे पांच तत्त्वे आहेत- पृथ्वी, आप, तेज, वायू आणि अवकाश. या सर्व घटकांमधील सौहार्द आपल्यामध्ये आहे आणि ते आपल्या भौतिक, सामाजिक तसेच पर्यावरणीय कल्याणासाठी अत्यंत आवश्यक आहे.
भारताचे जी-२० च्या अध्यक्षपद, हीच सार्वत्रिक एकत्वाची भावना अधिक दृढ करण्यासाठी काम करेल. आणि म्हणूनच आमची अशी संकल्पना आहे - 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’. ही केवळ एक घोषणा नाही. यात, मानवी परिस्थितीत जे अलीकडे बदल झालेले आहेत,त्यांचाही विचार केला जाणार आहे. जे बदल समजून घेण्यात आपण सगळेच आजवर अपयशी ठरलो आहोत. आज आपल्याकडे, जगभरातील सर्व लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील, एवढे उत्पादन करण्यासाठी पुरेशी साधने उपलब्ध आहेत. आज, आपल्याला आपल्या अस्तित्वासाठी झगडण्याची गरज नाही- आपले युग हे, युद्धाचे युग ठरण्याची गरज नाही- किंबहुना, ते युद्धाचे युग नकोच!
आज, आपल्यासमोर जी सर्वात मोठी आव्हाने आहेत- हवामान बदल, दहशतवाद आणि महासाथ. या आव्हानांचा सामना एकमेकांशी भांडून नाही, तर एकत्रित काम करुनच करणे शक्य होणार आहे. सुदैवाने, आजचे तंत्रज्ञान आपल्या मानवतेसमोरील व्यापक समस्यांचा सामना करण्यासाठीची साधने उपलब्ध करून देत आहे. आपण ज्या विशाल आभासी जगात राहतो आहोत, त्यातून आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या सर्व व्यापकतेचेच दर्शन घडते आहे. जागतिक लोकसंख्येच्या सहाव्या भागाइतकी लोकसंख्या जिथे वसली आहे आणि भाषा, धर्म, चालीरिती आणि धारणा यामध्ये कमालीची विविधता आहे, असा भारत म्हणजे एका प्रकारे संपूर्ण जगाची एक लहानशी प्रतिकृती आहे. सामूहिक निर्णय प्रक्रियेची सर्वात प्राचीन परंपरा असलेल्या भारताचा लोकशाहीचा पाया घालण्यामध्ये महत्त्वाचे योगदान आहे. लोकशाहीची जननी म्हणून भारतामध्ये कोण्या एका व्यक्तीच्या हुकुमाने नव्हे तर लाखो लोकांच्या मुक्त आवाजाच्या मिश्रणातून निर्माण होणाऱ्या सुसंवादाच्या एका सुरामधून राष्ट्रीय सहमती निर्माण होते.
नागरिककेंद्रित लोकचळवळ
आज भारत ही जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. आमच्या नागरिक-केंद्री शासनाच्या मॉडेलमध्ये सर्वाधिक उपेक्षित लोकांची काळजी घेतली जाते, तर दुसरीकडे प्रतिभासंपन्न युवा वर्गाच्या सर्जनशील गुणवत्तेची जोपासना केली जाते. आम्ही राष्ट्रीय विकासाला शासनव्यवस्थेतील वरून खालपर्यंत असलेल्या उतरंडीमधील एक प्रक्रिया न बनवता नागरिककेंद्रित लोकचळवळ बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
आम्ही तंत्रज्ञानाचा वापर पूर्णपणे खुल्या, समावेशक आणि परस्परांमध्ये प्रक्रिया करता येण्याजोग्या डिजिटल सार्वजनिक सामग्रीची निर्मिती करण्यासाठी केला आहे. यामुळे सामाजिक सुरक्षा, आर्थिक समावेशन आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स अशा विविध क्षेत्रात क्रांतिकारक प्रगती झाली आहे. या सर्व कारणांमुळे जागतिक समस्यांच्या निराकरणासाठी भारताच्या अनुभवांमधून संभाव्य तोडगे मिळू शकतात. आमच्या जी-२० अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आम्ही भारताचे अनुभव, अध्ययन आणि मॉडेल्स सादर करणार आहोत, जी इतरांसाठी, विशेषतः विकसनशील देशांसाठी संभाव्य मार्गदर्शक फलक म्हणून उपयुक्त ठरू शकतील. आमचे जी-२०चे प्राधान्यक्रम केवळ आमच्या जी-२० भागीदारांसोबतच नव्हे तर बऱ्याचदा ज्यांचे आवाज दुर्लक्षित होतात, त्या आमच्या दक्षिणेकडील सहप्रवासी देशांसोबत सल्लामसलत करून ठरवले जातील. आमचे प्राधान्य आमच्या ‘एका कुटुंबात (वन फॅमिली)’ सुसंवाद निर्माण करून आणि आमच्या ‘एक भविष्यात (वन फ्युचर)’ मध्ये आशा निर्माण करून आपली ‘एक वसुंधरा (वन अर्थ)’उत्तम करण्याला आहे.
आपल्या पृथ्वी या ग्रहाची स्थिती सुधारण्यासाठी आम्ही निसर्गाचे विश्वस्त म्हणून जीवन जगण्याच्या भारताच्या परंपरेवर आधारित शाश्वत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणार आहोत. मानवी कुटुंबात सुसंवाद निर्माण करण्यासाठी आम्ही अन्न, खते आणि वैद्यकीय उत्पादने यांचा जागतिक पुरवठा राजकारणरहित राहील, हे सुनिश्चित करणार आहोत, जेणेकरून भू-राजकीय तणावांमुळे मानवी संकटांची निर्मिती होणार नाही. स्वतःच्या कुटुंबाप्रमाणेच,ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांना आपल्या नेहमीच प्राधान्य देण्याची आमची भूमिका असेल.
आपल्या भावी पिढ्यांमध्ये आशा निर्माण करण्यासाठी आम्ही महाविनाशकारी शस्त्रांमुळे निर्माण झालेले धोके कमी करण्याविषयी आणि जागतिक सुरक्षेत वाढ करण्याविषयी सर्वाधिक शक्तिशाली देशांदरम्यान प्रामाणिक संवाद होण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत. भारताचा जी-२० जाहीरनामा समावेशक, महत्त्वाकांक्षी, कृतिआधारित आणि निर्णायक असेल. चला आपण सर्व, भारताचा जी-२० अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा परिस्थिती सुधारणारा, सुसंवाद निर्माण करणारा आणि आशा निर्माण करणारा बनवण्यासाठी एकत्र येऊया. मानवकेंद्रित जागतिकीकरणाच्या एका नव्या आदर्शाला आकार देण्यासाठी एकत्र काम करू या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.