ढिंग टांग ब्रिटिश नंदी:महाशक्तीकडे मागण्या...! (एक गोपनीय चिठ्ठीव्यवहार)

प्रिय मित्र नानासाहेब फडणवीस यांस, हल्ली वेषांतराची इतकी सवय झाली आहे की ही चिठ्ठी लिहितानादेखील मी वेष बदलून बसलो आहे. तुम्ही सुचवल्याप्रमाणे नीती आयोगाच्या बैठकीत मी उपस्थित राहिलो, आणि जोरदार भाषण केले.
ढिंग टांग ब्रिटिश नंदी:महाशक्तीकडे मागण्या...! (एक गोपनीय चिठ्ठीव्यवहार)
ढिंग टांग ब्रिटिश नंदी:महाशक्तीकडे मागण्या...! (एक गोपनीय चिठ्ठीव्यवहार)sakal
Updated on

प्रिय मित्र नानासाहेब फडणवीस यांस, हल्ली वेषांतराची इतकी सवय झाली आहे की ही चिठ्ठी लिहितानादेखील मी वेष बदलून बसलो आहे. तुम्ही सुचवल्याप्रमाणे नीती आयोगाच्या बैठकीत मी उपस्थित राहिलो, आणि जोरदार भाषण केले. माझे भाषण सगळेच अतिशय तन्मयतेने ऐकत होते. जणू काही मी माझ्या ‘मन की बात’ सांगत होतो. महाशक्तीची परमिशन मिळाली असती तर माझे भाषण रेडिओवरुन महाराष्ट्रात प्रसारित केले असते. ते जरा चुकलेच!

नीती आयोगाच्या बैठकीला अनेक सीएम आलेले होते. आधी सगळे आंध्रप्रदेशच्या चंद्राबाबूंच्याभोवती गोळा झाले होते. ‘आता माझ्या काहीच मागण्या नाहीत’ असे ते समाधानाने सगळ्यांना सांगत होते. त्यांची आणि माझी दाढी जवळपास ‘सेम टु सेम’ आहे. ते त्या दाढीतच माझ्याकडे बघून हसले, आणि अंगठा दाखवू लागले. मी दोन बोटे दाखवली, आणि त्यांची जिरवली! मग सगळ्यांनी मला एकदम सलाम केला. कारण मी आत शिरताच खुद्द महाशक्तीने आवो, आवो, बेसो’ असे म्हटले. त्यांनी माझे स्वागत करताच अर्थमंत्री निर्मलाताईंनी माझ्याकडे किंचित हसून बघितले, आणि ‘बजेट समजतं ना?’ असे हळू आवाजात विचारले. मी ‘हो’ म्हणालो. त्यांच्याकडे बघितले की मला का कुणास ठाऊक आमच्या शाळेतल्या गणिताच्या बाईंचीच आठवण येऊन अस्वस्थ व्हायला होते.

‘‘तुमचे बांदऱ्याचे जुने साहेब होते, त्यांना बजेट अजिबात समजत नव्हतं!’’

निर्मलाताईं म्हणाल्या, ‘‘घरात बसून कसं समजणार बजेट? आमचं गतिमान सरकार आहे!’’ मी बाणेदारपणाने उत्तर दिले. (त्यामुळे) माझ्या भाषणाच्या वेळी माइक एकदाही बंद झाला नाही. उलट शेजारी बसलेल्या ममतादिदींनीच दोन वेळा माझा माइक बंद करण्याचा प्रयत्न केला. शेवटी वैतागून उठून निघून गेल्या. मी जवळपास वीसेक मिनिटे अखंड बोललो. काय बोललो तेच आता आठवत नाही.

मुंबई आणि महाराष्ट्रातल्या मोठ्या प्रकल्पांसाठी केंद्राने भरीव मदत देत राहावे, असे काहीतरी बोललो. (तुम्ही लिहून दिलेला मागण्यांचा कागद हरवला की दादासाहेबांकडेच राहिला, काही आठवत नाही!) त्या सगळ्या मागण्यांवर निर्मलाताईंनी ‘ओक्के, चालेल’ एवढेच उत्तर दिले. २०२७ पर्यंत आपला देश तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. आणि २०४७ सालापर्यंत तर जगात भारी होणार आहे. तसे महाशक्तीचे प्लानिंगच आहे. आपल्या महाराष्ट्राचा त्यात वाटा हवा असेल तर केंद्राने ‘महाराष्ट्र माझा लाडका’ ही स्वतंत्र योजनाच राबवायला हवी. (तसे मी महाशक्तीला सांगून आलो आहे.) असो.

बाकी भेटीअंती बोलूच. कळावे. आपला एकनिष्ठ. कर्मवीर भाईसाहेब (मु. पो. ठाणे.)

प्रिय भाईसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. नीती आयोगाच्या बैठकीचा वृत्तांत समजला. थँक्यू! महाशक्ती तुमच्या मागे उभी असली तरी ती तितकीशी माझ्या मागे नाही. तुम्ही मागण्या केल्या तर महाशक्ती ऐकते, मी केल्या तर दुर्लक्ष करते, असा अनुभव येऊ लागला आहे. मी ही वस्तुस्थिती माननीय दादासाहेबांच्या कानी घातली, तेव्हा खचलेल्या आवाजात ते म्हणाले की, ‘‘तुम्हीच असं बोलायला लागलात तर आम्ही कुणाकडे बघावं?’’ नीती आयोगाच्या बैठकीत कोणी काय मागण्या केल्या याला काहीही महत्त्व नसते. कोण किती वेळ बोलले, किंवा बोलू देण्यात आले, यालाच असते. (ममतादीदींना हे चांगले ठाऊक आहे!) त्यामुळे निर्धास्त राहावे.

कळावे. आपला. नानासाहेब फ.

ता. क. : सध्या ‘मीच माझा लाडका’ या योजनेवर माझे काम चालू आहे. त्याला महाशक्तीचे पाठबळ मिळेल का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()