पर्यावरण पूरकतेचा ‘श्रीगणेशा’

parag thakur
parag thakur
Updated on

रांगडा, कणखर; काळ्या नि ओबडधोबड मातीचा... असा हा महाराष्ट्र. याने डोईला मंदिल बांधलाय खंडोबाचा आणि हातात गुलाल घेतलाय श्रीगणरायाचा. सुगीच्या दिवसांनंतर येणाऱ्या जत्रा-यात्रांमध्ये हा प्रांत रंगून जातो. इथल्या लोकसंस्कृतीची बीजे समाजजीवन समृद्ध करून जातात. सार्वजनिक गणेशोत्सव हेही त्यातील एक विलोभनीय दालन. त्याला सव्वाशे वर्षांची समृद्ध परंपरा आहे. पारंपरिकतेबरोबर आधुनिकतेची सुद्धा कास धरणारा हा उत्सव. पुण्यात या सार्वजनिक उत्सवाला सुरवात झाली आणि पाहतापाहता तो राज्यात सगळीकडे पोहोचला. काळाच्या ओघात नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी करावयाच्या बदलांनाही या शहरातून गती मिळावी अशी अपेक्षा आहे. सुदैवाने तसे ते सुरूही झाले आहेत. पर्यावरणपुरक उत्सवाचे पुणे, कोल्हापूरसह काही ठिकाणी सुरू झालेले प्रयत्न आणि प्रयोग हेही महाराष्ट्रभर पसरतील आणि रुजतील, याची खात्री वाटते.

पूर्वी पुनवडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याचे आता ‘पुणे महानगरात’ रूपांतर झालंय. सुखावह जगण्यासाठी या शहराला नुकतीच प्रथम पसंती मिळाली. समृद्धीपाठोपाठ येणाऱ्या प्रश्‍नांनीदेखील महाकाय रूप धारण केले आहे. ‘पर्यावरण रक्षण’ हा परवलीचा शब्द झाला आहे. पूर्वी पुण्यामध्ये काही हजार गणपती घरोघरी बसायचे. त्याची संख्या आता काही लाखांमध्ये आहे. सार्वजनिक गणपती मंडळांची नोंदलेली संख्या साडेचार हजारांवर आहे. या सर्व मूर्ती विसर्जन करायच्या तर नदी दुथडी भरून वाहणारी हवी. मुळा-मुठेचे पात्र आता ओढ्यात रूपांतरित झालेय. यामध्ये एवढ्या मूर्ती विसर्जन होणार म्हणजे नदी आणखी दूषित होणार. मूर्तींचे विविध रासायनिक रंग, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे प्रमाण. मग यावर सुरू झाली समाजजागृती. ‘नदीत मूर्ती विसर्जित करू नका,’ असे फलक घेऊन काही मंडळी पूर्वी उभी राहायची. पुणेकरांनी हा बदल झटकन आपलासा केला. गतवर्षी सुमारे तीन लाख मूर्तींचे विसर्जन हौदात केले आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस नदीत पूर्णतः विरघळू शकत नाही, त्यातून प्रदूषण होते. ‘शाडूच्या छोट्या मूर्ती बसवा’ या आवाहनालाही पुण्यातील गणेशभक्तांनी मोठा प्रतिसाद दिला. आणि घरोघरी शाडूच्या मूर्ती बसविणाऱ्याची संख्या वाढू लागली.

श्री गणरायाच्या सजावटीसाठी प्लॅस्टिक थर्माकोल, प्लॅस्टर ऑफ पॅरिस याचा वापर प्रचंड होत होता. या सर्वांचे विघटन कसे होणार, असा यक्षप्रश्‍न निर्माण होत होता. आता थर्माकोल सजावटीमधून जवळपास हद्दपार झाला आहे.आता त्याची जागा हॅंडमेड पेपर, हार्डबोर्ड, कार्डबोर्ड यांनी घेतली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर कमी होताना जाणवतोय. दरवर्षी साधारणतः २५०-३०० मंडळांना भेट देण्याचा योग येतो. प्लॅस्टिक आणि फोमचा वापर कमी होताना दिसतोय. देखाव्यांमध्ये विद्युतरोषणाईचे प्रमाण कमी झाले आहे. सजीव देखावे, वैज्ञानिक देखावे, पर्यावरणपूरक देखाव्यांची संख्या वाढते आहे. स्थानिक कलाकारांना त्यामुळे उत्तेजन मिळते.विविध विषयांची हाताळणी होताना दिसते आहे. पूर्वीच्या ‘मेळ्यांची’ जागा आता सजीव देखाव्यांनी घेतलेली आहे. मंडपासाठी रस्त्यांवर खड्डे घेऊ नये अशी स्थानिक प्रशासनाची अपेक्षा असते.काही मंडळांनी यासाठी वेगळ्या खड्डेविरहित तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या गुलालामध्ये प्रचंड घट झाली असून, गुलालविरहित मिरवणूक ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली आहे. काही मंडळांमध्ये गुलालाचा वापर होतो, पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. स्पीकर्स आणि डीजेचा आवाज अनेकांच्या हृदयांत धडधड निर्माण करणारा ठरतो. यांवर मात्र आपल्या सर्वांना अधिक काम करण्याची आवश्‍यकता आहे. या उत्सवामध्ये दोन वर्ग ठसठशीतपणे नजरेस येतात. एक उत्सवांत सहभागीहोणारे आणि दुसरे टीका करणारे. या दोन्ही बाजूंनी अतिरेक टाळून या जगद्विख्यात उत्सवाला अधिक पवित्रता कशी आणता येईल, याचा साकल्याने विचार करायला हवा. या उत्सवांत वाढणारा मद्याचा वापर हा समाजाच्या चिंतेचा विषय आहे. त्यासाठी तरुणांची मानसिकता बदलायला हवी. उत्सवामध्ये हिडीसपणा अपेक्षित नाही. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची पवित्रता या गणेशोत्सवाला यावी, असा प्रयत्न तुम्हा-आम्हाला करावा लागेल. म्हणजे समाज अशा उत्सवापासून फार दूर राहू शकणार नाही.
या उत्सवाला पर्यावरणपूरक रूप देतानाच उत्सवाविषयी ज्यांची मनेच कलुषित आहेत, ते ‘प्रदूषण’ही मला जास्त चिंतेचे वाटतं. त्यांच्या मनाची मशागत करून त्यांना उत्सवात सहभागी करून घेणं गरजेचं आहे. गणपती ही ज्ञान आणि विज्ञानाची देवता असल्याने कार्यकर्त्यांनी हे सर्व बदल सहजतेने आपलेसे केले आहेत. त्यांची सकारात्मकता कौतुक करण्याजोगी आहे. शेवटी गणरायाच्या चरणी प्रार्थना एवढीच करावी, की ‘रोजचे जगणे हाच उत्सव व्हावा’.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.