महाराष्ट्राचा बिहार होत आहे काय?

कायद्याच्या अंमलबजावणीकडे लक्ष द्यायला हवे. पूर्वी परप्रांतीयांना मारहाण होते म्हणून कामगार आपापल्या राज्यात निघून गेले होते. आता राज्याची बदनामी वेगवेगळ्या अपमानास्पद कारणांमुळे होते आहे.
political crisis maharashtra becoming bihar
political crisis maharashtra becoming biharSakal
Updated on

कायद्याच्या अंमलबजावणीकडे लक्ष द्यायला हवे. पूर्वी परप्रांतीयांना मारहाण होते म्हणून कामगार आपापल्या राज्यात निघून गेले होते. आता राज्याची बदनामी वेगवेगळ्या अपमानास्पद कारणांमुळे होते आहे. आपापसांतील मतभेदांमुळे काळिमा फासणाऱ्या गोळीबाराच्या घटना घडल्या. त्यामागची कारणे प्रचंड गुंतागुंतीची आहेत; पण महाराष्ट्रात यंत्रणेचा धाक असा उरलेला नाही,हे समोर आले.

महाराष्ट्र हे अत्यंत प्रगत राज्य आहे. येथील दरमाणशी उत्पन्न देशात सर्वाधिक आहे. ऐहिकच नव्हे तर सामाजिक, वैचारिक प्रगतीत महाराष्ट्र हा अन्य राज्यांसाठी मापदंड आहे. पण गेल्या काही दिवसांतील घटना काय सांगताहेत?

अमेरिकेच्या ‘गनसंस्कृती’प्रमाणे आपल्याकडे बंदुकी चालताहेत. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने थेट पोलिस ठाण्यातच बंदूक चालवली. संख्याबळ हवे असते म्हणून गुंडपुंडांना उमेदवारी द्यावी लागते, ही अगतिकता आता जनतेच्या अंगवळणी पडली आहे. पण गोळीबाराची चित्रफित व्हायरल झाल्यावरही संबंधिताला पक्षातून काढून टाकले जात नाही, हा काय प्रकार आहे?

भाजपसारखा महत्त्वाचा पक्ष या कारवाईसाठी दोषसिद्धीची प्रतीक्षा करतोय का? या प्रकरणाच्या धक्क्यात जनमानस असताना आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. सर्वपक्षीय नेत्यांसमवेत फोटो काढून ते मिरवणाऱ्या मॉरीसभाई नावाच्या राजकारणात स्थिरावू पाहाणाऱ्या गुंडाने शिवसेनेच्या एका नगरसेवकाबरोबर आधी ‘फेसबुक लाईव्ह’ केले आणि मग त्यांची हत्या केली आणि मग गोळ्या झाडून आत्महत्याही केली.

बरोबर एक वर्षापूर्वी त्याच दिवशी या मॉरीसभाईला बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत टाकले गेले होते. रक्ताच्या थारोळयाची दृश्ये अनेकजण बघू शकत नाहीत; पण महाराष्ट्रात अशा बुझदिलांचे जणू लोकशिक्षण होतेय! राजकारणाशी संबंधित सर्वांनी ती संयुक्त जबाबदारी घेतली आहे असे वाटू लागले आहे!

घोसाळकरांच्या पत्नीचे रुदन सुन्न करणारे होते. नव्यानेच पोलिस महासंचालकपदाची सूत्रे हाती घेतलेल्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला पोलिस दलावरचा विश्वास कमी झाल्याची खंत व्यक्त केली खरी;पण लक्षात कोण घेतेय? अन् तसा धाक कुठे उरलाय? लगेच दुसऱ्या दिवशी पुण्यातही गोळीबाराची घटना घडली.

भाजपच्या आमदाराने गोळी चालवून कायदा हातात घेतलाच; पण काही दिवसांपूर्वी याच सत्ताधीश भाजपचा नगरसेवक गोळीबाराचा बळीही ठरला. सत्तेच्या प्रांगणात ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’चे प्रयोग सुरू आहेत. गॅंग प्रत्येक राजकीय पक्षाला गरजेची वाटू लागली काय, असे वाटू लागले आहे.

मुंबईतील पैसा लक्षात घेता येथे राजकारणात टोळ्यांनी आपली मंडळी पेरली. जागेचे व्यवहार, धार्मिक उत्सव या सगळ्यांत गुंडांचा वावर खूप वाढला. जिंकणे हा निकष ठेवून गुंडांना सरसकट आमदारकीची तिकिटे दिली जाऊ लागली.

खून राजकीय वर्तुळापुरते मर्यादित आहेत म्हणून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आलेली नाही, असा सोयीचा अर्थ लावत बोलायचे असेल तर ती नेत्यांनी स्वत:चीच घातलेली समजूत नसून स्वत:चा घात करणे आहे. महाराष्ट्राला याची खंत आहे. दोन माजी मुख्यमंत्री परस्परांना मानसिक रुग्ण ठरवताहेत, हे या राज्याचे दुर्दैव आहे.

येथील विचारवर्तुळही एका आवर्तात अडकले आहे. देशाने निवडून दिलेल्या नेत्याविषयी निरर्गल टीका करणे राजकीय विरोधकांची अपरिहार्यता असते, असे एकवेळ म्हणता येईल; पण पत्रकार, विचारवंत म्हणविणाऱ्यांनी त्या पद्धतीने लिहावे, बोलावे हे चांगले नाही.

पण त्यांच्या विरोधासाठी सत्ताधाऱ्यांनी रस्त्यावर येणे, गोंधळ घालणे, मोटारीवर हल्ला करणे हेही निषेधार्हच म्हटले पाहिजे. जनतेला या गोष्टींशी देणेघेणे नाही हे सांगत दिल्लीनेच आशांचे कान टोचले, हे बरे झाले.

समाज शांत रहावा, प्रगतीची कास धरणारा , भिन्न मताचा आदर करणारा असावा असे समूहमनाला वाटते. आपापल्या पक्षांना पुढे नेण्यासाठी धडपडणाऱ्या नेत्यांना हे कळतेय की नाही? धर्म, जातींवरुन विभाजनाचे प्रयत्न होताहेत, हे दुर्दैवी आहे.

आता तरी कायद्याच्या अंमलबजावणीकडे लक्ष द्यायला हवे. पूर्वी परप्रांतीयांना मारहाण होते म्हणून कामगार आपापल्या राज्यात निघून गेले होते. आता महाराष्ट्राची बदनामी वेगवेगळ्या अपमानास्पद कारणांमुळे होते आहे.

आपापसातील मतभेदांमुळे दोन काळिमा फासणाऱ्या गोळीबाराच्या घटना घडल्या. त्यामागची कारणे प्रचंड गुंतागुंतीची आहेत; पण महाराष्ट्रात यंत्रणेचा धाक असा उरलेला नाही हे समोर आले. असले प्रसंग सरकारची पत खाली आणत असतात.

रिव्हॉल्वर, बंदुकी, देशी कट्टे यांची मोजदाद करुन ती कुणाला खरोखरच गरजेची आहेत का, ते पाहायला हवे. चांगल्याच चेहऱ्यांना उमेदवारी देऊ, असे कुणीच नेता म्हणणारच नाही का? महाराष्ट्राने असे काय केलेय की नशिबी असे नेते, असे आमदार यावेत? पक्षापक्षातील युद्ध किंवा शीतयुध्दाचा भाग न बनता अधिकाऱ्यांनीही महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करणे गरजेचे झाले आहे. अधिकाऱ्यांचे पगार नेते देत नाहीत तर करदाते देतात, हे लक्षात घेतले तर बरे.

काय चालले आहे?

सत्ताधारी आमदार मजेत का होईना पण शाळेतल्या मुलांना ‘‘तुमच्या आई-वडिलांना मला मत द्यायला सांगा, नाहीतर जेवणार नाही, अशी त्यांना धमकी द्या’’ असे सांगताहेत. काय चाललेय हे? वागण्याचे तंत्र नाही, बोलण्याचे भान नाही. एकूण सगळेच वास्तव थिजवणारे आहे. महाराष्ट्रातील सर्व पक्षांत अशा नेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. सत्ता नाही आली तरी चालेल; पण संस्कृती ढासळायला नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.