अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लॉरिडामधील आलिशान घरावर एफ.बी.आय. या दलाने नुकताच छापा घातला. ट्रम्प यांची अध्यक्षीय कारकीर्द २० जानेवारी २०२१ रोजी संपली. त्यांनी व्हाईट हाऊसमधून जाताना बेकायदारीत्या देशाच्या सुरक्षेशी संबंधित, तसेच अन्य गोपनीय कागदपत्रे नेली. अध्यक्षीय कारकीर्द संपताना त्यांच्या कार्यालयातील सर्व कागदपत्रे राष्ट्रीय अभिलेखागार कार्यालयाकडे देण्याचा नियम आहे. अध्यक्ष आपली वैयक्तिक डायरी, नियतकालिकेच स्वतःबरोबर नेऊ शकतात. ट्रम्प हे विधिनिषेधशून्य व्यक्तिमत्त्व. अमेरिकेची राज्यघटना, राजनैतिक संकेत, सभ्यता या कशाचेच त्यांनी पालन केले नाही. नोव्हेंबर २०२० मधील निवडणुकीत त्यांचा स्पष्टपणे पराभव झालेला असताना त्यांनी निकाल मान्य करण्यास नकार दिला होता.
अध्यक्षीय निवडणुकीत जनतेची थेट उमेदवाराला मते (पॉप्युलर व्होट) व ५० राज्यांची इलेक्ट्रोरल मते असतात. ज्या राज्यात एखाद्या उमेदवाराला जास्त मते मिळतात, त्या राज्याची सर्व इलेक्ट्रोरल मते त्याच्या खात्यावर जमा होतात. ट्रम्प यांनी मतदानाच्या आधीपासूनच निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत निकाल स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले होते. सर्व राज्यांची इलेक्ट्रोरल मते ‘कॅपिटल हिल’मध्ये सहा जानेवारी रोजी मोजली जाणार होती. त्यानंतर अध्यक्षीय निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर होणार होता. ट्रम्प यांनी आपल्या जहाल अनुयायांना दंगल करून इलेक्ट्रोरल मतमोजणी उधळून लावण्यास चिथावणी दिली. या प्रकरणाची संसदीय समितीकडून चौकशी चालू आहे. या दंगलखोरांना ट्रम्प यांच्या निवडणूक निधीतून २७ लाख डॉलर देण्यात आले होते. या प्रकरणात अनेकांना शिक्षा झाल्या आहेत. ट्रम्प यांच्यावर ठपका ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे. त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीतच ट्रम्प यांच्या कंपन्यांकडून करचोरीचे प्रकरण उजेडात आले होते. हे प्रकरण न्यायालयात गेले असून, त्यांच्या काही कर्मचाऱ्यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आता गोपनीय कागदपत्रांचे प्रकरण सुरू झाले आहे.
तुरुंगवासाची तरतूद
ट्रम्प यांच्यावर हेरगिरीविषयक कायद्यानुसार कारवाई होणार आहे. अमेरिकेत पहिल्या महायुद्धाच्या वेळी हा कायदा झाला. देशाच्या सुरक्षेशी संबंधित कागदपत्रांच्या हाताळणीबाबत तो अस्तित्वात आला. ‘विकिलिक्स’चे सहसंस्थापक ज्युलियन असांज यांनी अमेरिकेचे इराक व अफगाणिस्तानमधील युद्धगुन्हे उजेडात आणल्याबद्दल त्यांच्यावर हेरगिरीसह अन्य १७ कायद्यांखाली खटला भरण्यात येणार आहे. त्याबद्दल असांजना १७५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ट्रम्प यांच्यावर हेरगिरीसह १९७८च्या ‘प्रेसिडेन्शियल रेकॉर्ड ॲक्ट’नुसार कारवाई होऊ शकते. ट्रम्प यांनी गोपनीय कागदपत्रे सोबत नेल्याप्रकरणी अमेरिकी न्यायखात्याच्या अधिकाऱ्यांनी आधीच तपास सुरू केला होता. फ्लॉरिडातील ट्रम्प यांच्या निवासस्थानी देशाच्या सुरक्षेबाबतची, तसेच अण्वस्त्रविषयक गोपनीय, अतिगोपनीय कागदपत्रे सापडली. ट्रम्प यांच्या चौकशीत देशाविरुद्ध कारस्थान हा महत्त्वाचा मुद्दा असल्याने ते गंभीर अडचणीत आले आहेत. सरकारी रेकॉर्डची हाताळणी याबद्दल २० वर्षे तुरुंगवासाची तरतूद आहे. चौकशीत अडथळा आणल्यास आणखी २ वर्षे तुरुंगवास. क्लासिफाईड, टॉप सिक्रेट, सिक्रेट अशा श्रेणीतील कागदपत्रे ट्रम्पना घरी नेण्याचा कुठलाही अधिकार नव्हता.
सर्वोच्च पातळीवरून सत्तेचा दुरुपयोग झाला असल्याने ट्रम्प यांना २०२४मधील अध्यक्षीय निवडणुकीत उभे राहता येणार नाही. डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्यो बायडेन प्रशासनाने राजकीय सूडातून असे छापे घातले आहेत, असा ट्रम्प कांगावा करीत असले तरी त्यांच्या रिपब्लिकन पक्षात त्यांच्या २०२४मधील उमेदवारीला पाठिंबा कमी झाला आहे. अण्वस्त्रविषयक गोपनीय कागदपत्रे घरी नेण्यामागे कोणता हेतू होता, याविषयी कयास चालू झाले आहेत. २०१६मधील निवडणुकीत रशियाची मदत घेतल्याची चौकशी झाली होती. या संदर्भातील म्युलर चौकशीत त्यांना क्लिनचीट मिळाली नव्हती. ट्रम्प अण्वस्त्रविषयक कागदपत्रे अमेरिकेशी वैर असलेल्या देशांना विकू शकतात, असा संशय येण्यास त्यांचे वर्तन कारणीभूत आहे. हा देशद्रोहाचा अतिशय गंभीर प्रकार ठरतो.
जर्मनीतून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या ट्रम्प यांच्या पूर्वजांचा हॉटेल, दारूचे गुत्ते, वेश्यागृहे असाच व्यवसाय होता. त्यांचे वडीलही धनाढ्य होते. रिअल इस्टेट, कॅसिनो, रिॲलिटी शो हे डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यवसाय. त्यात अनेक प्रकारच्या भानगडी. अमेरिकी राजकारणात ते उपरेच. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांना ते निवडणूक निधी देऊन आपले धंदे चालवायचे. २०१६ मध्ये रिपब्लिकन पक्षाने त्यांना उमेदवारी दिली ती त्यांच्याकडील पैशांमुळे. हिलरी क्लिंटन यांच्या विरोधात बदनामीची मोहीम चालवून व बाहेरील सत्तांची मदत घेऊन ते अध्यक्षपदी आले. त्यांच्याकडे कसलीही राजकीय विचारसरणी नाही. गोऱ्यांच्या वर्चस्ववादाचा पुरस्कार त्यांच्या कामी आला. त्यांच्या आयुष्यात सत्य, असत्य शब्दांना अर्थ नाही. मानवी सभ्यता, सहिष्णुता, विवेक, संयम या गुणांशीही त्यांची जन्मजात फारकत. अध्यक्षीय कारकिर्दीतील दोषांकात त्यांना २१५ ‘गुण'' मिळाले. रिचर्ड निक्सन ७६, रोनाल्ड रेगन २६ हे त्यांच्या रिपब्लिकन पक्षाचेच.
ट्रम्प यांची अध्यक्षीय कारकीर्द वादग्रस्त ठरली. पदाची शपथ मोडणाऱ्या अध्यक्षांना तातडीने हटविण्यासाठी घटनेत बदलाची गरज असूनही ते झाले नाही. अध्यक्षपदी निवडून येण्याआधी बायडेन यांनी अमेरिकी निवडणूक कायद्यात बदलाची आवश्यकता व्यक्त केली होती. संसदेत (कॉंग्रेस) बहुमत असूनही डेमोक्रॅटिक पक्षाने ते केले नाही. ट्रम्प यांच्यावर दोन वेळा महाभियोगाची नामुष्की आली होती. सिनेटमधील त्यांच्या पक्षाच्या बहुमतामुळे ते बचावले. अमेरिकेत अब्राहम लिंकन, जॉन एफ. केनेडीसारख्या अध्यक्षांनी खूप वरच्या पातळीचे राजकारण केले. रिचर्ड निक्सन यांना वॉटरगेट प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. निक्सन आणि ट्रम्प हे दोघेही गुन्हेगारी मानसिकतेचे. हा रोग आता अमेरिकेपुरताच नाही राहिलेला. ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्स्नारो, ब्रिटनचे बोरिस जॉन्सन, सौदी क्राऊन प्रिन्स मोहंमद बिन सलमान, पाकिस्तानचे इम्रानखान अशी बरीच मोठी यादी आहे. ‘राजकारण हे बदमाषांचे शेवटचे आश्रयस्थान'' असे म्हटले जाते. आता आणखी घसरण झाली असून तो प्रारंभीचा तर नव्हे, असे वाटू लागले आहे. याचे कारण अशा प्रवृत्तींची संख्या देशोदेशी वाढत चालली आहे. ट्रम्प यांना तुरुंगवास घडला तरी त्यापासून कोणी धडा घेताना दिसणार नाही. इतके निर्ढावलेपण आले आहे. अर्थात त्या त्या देशातील न्यायव्यवस्थाही उघडी पडली आहे.
राजकारण हे बदमाषांचे शेवटचे आश्रयस्थान'' असे म्हटले जात असे. पण आता परिस्थिती आणखी बिघडली असून तो प्रारंभीचा तर नव्हे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ट्रम्प यांना तुरुंगवास घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसे झाले तरी त्यापासून कोणी धडा घेईल, असे वाटत नाही. याचे कारण सार्वत्रिक झालेले निर्ढावलेपण.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.