हौस ऑफ बांबू : लंपनच्या गोष्टी...!

नअस्कार! वनवास, शारदा संगीत, पंखा आणि झुंबर हे चारही कथासंग्रह तुम्ही वाचले नसतील, तर तुम्ही अजून काहीच वाचलेलं नाही. प्रकाश नारायण संत यांनी लिहिलेल्या या लंपनच्या गोष्टी.
Hous of Bamboo
Hous of Bamboosakal
Updated on

नअस्कार! वनवास, शारदा संगीत, पंखा आणि झुंबर हे चारही कथासंग्रह तुम्ही वाचले नसतील, तर तुम्ही अजून काहीच वाचलेलं नाही. प्रकाश नारायण संत यांनी लिहिलेल्या या लंपनच्या गोष्टी. खरं तर यात गोष्टीवेल्हाळपणा आहे, पण गोष्ट अशी नाहीच. तरीही तुम्ही त्या एकदा हातात घेतल्या की वाचून सोडणार. नाही म्हणायचं कामच नाही. मी तर मॅडसारख्या एकोणीस हजार वेळा या गोष्टी वाचल्या आहेत. कारण लंपनला मी लहानपणापासून ओळखते.

नवतरुण मंडळींना लंपन कदाचित नसेल माहीत. पुस्तकं वाचण्याचं काही कामच नाही, मग कसा माहीत होणार लंपन? पण तरीही काही हरकत नाही. त्यांच्यासाठी ओटीटी मंचावर ‘लंपन’ ही आठ भागांची मालिका प्रदर्शित झाली आहे. काही मुलांना सतराचा पाढा एकवेळ येईल, पण पुस्तक वाचायला सांगितलं तर चारशे पंचावन्न जांभयाच येतात. त्यांनी नीटच बघून टाकावी ही मालिका.

प्रकाश नारायण संत यांचा लंपन हा मानसपुत्र. दहा-बारा वर्षांचा असेल. आईवडलांचं घर सोडून तो आज्जी-आजोबांकडं राहायला-शिकायला आला आहे. बेळगावकडला रम्य परिसर. गुंडीमठ रोडवरचं त्याचं घर. संशोधक आजोबा, काठी घेऊन मागं धावणारी त्याची प्रेमळ आज्जी. काण्या डोळ्याचा नोकर बाबुराव. नवी शाळा, आणि शाळेतले सवंगडी. त्यातच असलेली ती परकरी पोर-सुमी. लंपनची मैतरिण.

हे सगळं भावविश्वच इतकं गोड आहे की वाचता वाचता मोठ्ठी माणसं, आतल्याआत आपलं हरवून गेलेलं निरागसपण मॅडसारखं चाचपडून पाहू लागतात. प्रकाश नारायण संत स्वत: बेळगावचे होते. विख्यात कवयित्री इंदिराबाई संत आणि साहित्यिक ना. मा. संत यांचे ते चिरंजीव. १९६४ मध्ये ‘सत्यकथे’त पहिल्यांदा ‘वनवास’ ही लंपनकथा प्रसिद्ध झाली. नंतर तीसेक वर्ष संतांनी काही लिहिलंच नाही. भूरचनाशास्त्रात त्यांनी डॉक्टरेट पूर्ण करुन कराडला प्राध्यापकी सुरु केली, ती करतच राहिले. नव्वदीच्या दशकात पुन्हा लंपन भेटायला आला!

‘मोठा काळ काही लिहिलं नाही, याचं वाईट वाटण्यापेक्षा वाईट काहीतरी लिहून प्रसिद्ध केलं नाही, याचा खरंच आनंद वाटतो. आणि पुन्हा तो हरवलेला धागा मिळाला, म्हणजे एक प्रकारचा पुनर्जन्मच झाल्यासारखा वाटतो. जोवर लंप्याच्या आयुष्यातील इतरांना आनंद देणारं काही सांगता येण्यासारखं आहे, तोपर्यंत लिहीत राहीन...’’ असं संत म्हणाले होते. पण २००३ मध्ये त्यांचं पुण्यात आकस्मिक निधन झालं...

संतांचा लंपन मराठी अक्षरवाङमयात आपलं इवलंसं भावविश्व घट्टपणे धरुन आहे. उत्तम साहित्य जसं अ-क्षर मानलं जातं, तसंच ‘लंपन’ मालिकेचा समावेशही अ-क्षरचित्रांमध्ये करायला हवा. खरं तर या नाजूक कथावस्तुची वाट लावणं अवघड नव्हतं. पण दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीनं ती ज्या नजाकतीनं पेश केली आहे, त्याला तोड नाही. लंपनच्या भावविश्वाला कुठंही गालबोट लागलेलं नाही.

त्याबद्दल निपुणचं आणि श्रीरंग गोडबोले, ऋषिकेश देशपांडे, अमित पटवर्धन या निर्मात्यांचं अभिनंदन करायलाच हवं. लंपनची मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या मिहीर गोडबोलेनं कमालच केली आहे. पोस्टरवर त्याची छबी बघून ‘अरे बापरे, ‘तारे जमींपर’चा दर्शील सफारी पुन्हा आला की काय,’ असं वाटलं होतं. पण ते नाव सोडून सोडा! मिहिरबेट्यानं लंपन नीटच केलाय.

डावा पाय उजव्या पायामागे, आणि दोन्ही हात डोक्याच्या वरुन मुडपून मागल्या बाजूला, हे लंपनचं लकबदार उभारणं, सारखं डोळ्यासमोर येणार. त्याची अखंड बडबड कानात गुंजत राहणार. मला तर मॅडसारखं त्याची मैतरिण सुमीच असल्यासारखं त्रेचाळीस हजारवेळा तरी वाटलं असणार. अगदी नीटच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.