श्रद्धांजली : ‘आनंदनगरी’चा रहिवासी...

कोलकात्यात, किंबहुना संपूर्ण बंगालात डॉमिनिक लॅपिए यांची ओळख केवळ एक प्रतिभावान लेखक अशी नाही. त्याच्यापलिकडेही खूप काही त्यांच्या नावाशी जोडलं गेलं आहे.
dominique lapierre
dominique lapierresakal
Updated on
Summary

कोलकात्यात, किंबहुना संपूर्ण बंगालात डॉमिनिक लॅपिए यांची ओळख केवळ एक प्रतिभावान लेखक अशी नाही. त्याच्यापलिकडेही खूप काही त्यांच्या नावाशी जोडलं गेलं आहे.

भारतीय जीवनाशी समरस झालेले, विशेषतः कोलकात्याशी वेगळेच नाते जोडून तिथेच रमलेल्या फ्रेंच लेखक डॉमिनिक लॅपिए यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या लेखनप्रपंच आणि समाजकार्याविषयी.

डॉमिनिक लॅपिए हे नाव परदेशी असलं तरी भारतातील अभिजनांना चांगलंच परिचित होतं. ज्या काळात भरधाव दौडणाऱ्या प्रगत पाश्चिमात्य जगाला भारतासारख्या अर्धविकसित, नुकतंच स्वातंत्र्य मिळालेल्या देशात काहीच रस नव्हता, त्या काळात डॉमिनिक लॅपिए नावाच्या कुण्या एका फ्रेंच पत्रकारानं भारतातल्या घडामोडी आणि विलक्षण गोष्टी जागतिक वाचकांसमोर आणून ठेवल्या. ज्या भारतीय लोकांचं वर्णन ज्या काळी ‘दरिद्री, अडाणी, अस्वच्छ’ या विशेषणांनी केलं जात होतं, (त्यात ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिलही आघाडीवर होते.) त्याच काळात भारतीयांमधला स्वभावगत स्नेहभाव, ध्येयनिष्ठा, निरागस भाबडेपणा आणि माणुसकी हे सारे गुण मन्सिय डॉमिनिक लॅपिए यांना मात्र अचूक दिसले. माणूस पेशानं आणि पिंडानं पत्रकार. स्वभावानं भटक्या. त्यामुळे पायाला कायमची भिंगरी लागलेली. अशाच भटकंतीत हा फ्रेंच युवक कोलकात्याला आला आणि तिथलाच झाला...

कोलकात्यात, किंबहुना संपूर्ण बंगालात डॉमिनिक लॅपिए यांची ओळख केवळ एक प्रतिभावान लेखक अशी नाही. त्याच्यापलिकडेही खूप काही त्यांच्या नावाशी जोडलं गेलं आहे. कोलकात्यात मदर तेरेसा यांच्या आश्रमात गेल्यानंतर भारावलेल्या लॅपिए यांनी आपल्याकडे असलेले ५० हजार डॉलर पटकन काढून दिले होते. वर म्हटले होते, ‘‘मदर, हा समुद्राच्या पाण्याचा थेंबही नाहीए, पण तरीही घ्या हे पैसे!’’ मान हलवत मदर तेरेसा म्हणाल्या होत्या, ‘‘माझ्या मुला, थेंबाथेंबानंच समुद्र तयार होतो...!’’ ही आठवण लॅपिए यांनीच लिहिली आहे. पुढे त्यांनी ‘सिटी ऑफ जॉय फौंडेशन’ ही संस्था सुरू करून अनाथ, अपंग, निर्वासित मुलांसाठी प्रचंड मोठं कार्य उभं केलं. आजही ही संस्था त्यांच्याच पाठबळावर कार्यरत आहे.

‘सिटी ऑफ जॉय’ हे एक स्वतंत्र प्रकरणच आहे. लॅपिए यांची ही गाजलेली कादंबरी. हल्लीच्या काळी ज्याला ‘बेस्टसेलर’ म्हणतात तशी. ‘सिटी ऑफ जॉय’ ही कादंबरी वाचली नाही, असा एकही भद्रजन निदान कोलकात्यात तरी सापडणार नाही. या कादंबरीची अनेक भाषांमध्ये भाषांतरं झाली आहेत. अगदी मराठीतही! कोलकाता शहर आणि शेजारचे हावडा यांच्या मधोमध असलेल्या पीलखाना झोपडपट्टी परिसराबद्दल लॅपिए यांना खूप आस्था होती. गरीब, श्रमिकांची ही वस्ती. लॅपिए यांचं कामाधामानिमित्त तिथं नेहमी जाणंयेणं असे. ही संपूर्ण वस्तीच ‘आनंद नगर’ बनून त्यांच्या कादंबरीच्या पानात आली. पुढे १९८६च्या सुमारास ख्यातनाम चित्रकर्ते रोलँड जोफी यांनी या कादंबरीवर आधारित नितांतसुंदर चित्रपट पूर्ण केला. कोवाल्स्की नावाचा एक पोलिश धर्मोपदेशक, हसरी पाल नावाचा एक हातरिक्षा ओढून पोट भरणारा रिक्षावाला (ओम पुरीनं ही अप्रतिम भूमिका केली होती.) आणि मॅक्स लोएब नावाचा एक आदर्शवादी डॉक्टर या तिघांची ही कहाणी खरे तर कोलकात्याच्या नागरी जीवनाचीच गाथा आहे.

लॅपिए यांनी सहाएक पुस्तकं लिहिली, त्यातली बरीचशी त्यांनी आपला मित्र, सहकारी लॅरी कॉलिन्स यांच्या साथीने लिहिली. दोघेही भटके. लष्करी नोकरीची पार्श्चभूमी असलेले. लॅपिए फ्रेंच लष्करात होते, तर कॉलिन्सनं अमेरिकी लष्करी खाक्या अनुभवलेला होता. शरीर टणक झालेलं आणि डोळ्यात मोठमोठाली स्वप्न, अशी ही जोडगोळी पुढे भारतीय साहित्य क्षेत्रातलं एक अद्वैत बनून गेलं. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अखेरच्या वर्षावर आधारित ‘फ्रीडम एट मिडनाइट’ हे या लेखकद्वयीचे प्रचंड गाजलेले पुस्तक. किंबहुना, हे पुस्तकच या दोघांची एक ओळख ठरलं. वास्तव घटनांवर काल्पनिक मुलामा देत त्यांनी १९४७ आणि १९४८ या दोन वर्षांतलं स्वातंत्र्यनाट्याचं कथानक वाचकांसमोर ठेवलं. अर्थात या कादंबरीवर टीकाही भरपूर आणि खरपूस झाली. भलतासलता मिर्चीमसाला लावून इतिहास सांगण्याचा त्यांचा ‘आधुनिक’ आविर्भाव अनेक सुबुद्ध वाचकांना आवडला नव्हता.

परंतु, सामान्यत: कादंबरीचं स्वागत भरघोस झालं, हा भाग अलाहिदा. व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या आगमनापासून महात्मा गांधी यांच्या हत्त्येपर्यंतचा कालखंड त्यांनी या कादंबरीत प्रभावीपणे उभा केला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडावर या दोघांनी लिहिलेली ‘इज पॅरिस बर्निंग?’ ही अशीच ‘वास्तव कादंबरी’ होती. २००५ मध्ये लॅरी कॉलिन्स निवर्तल्यानंतर हे अद्वैत संपलं. पुढे लॅपिएदेखील थकत गेले. अर्थात शेवटपर्यंत ‘सिटी ऑफ जॉय फौंडेशन’चे काम ते करत राहिले. देशोदेशी फिरून दिलेली व्याख्याने, मुलाखती, लेख, साहित्यकृतींचे मानधन इत्यादी सर्व मिळकत ते समाजसेवेलाच देत असत. त्यांचं एक आवडतं वाक्य त्यांच्याच संस्थेचं घोषवाक्य झालं आहे : ऑल दॅट इज नॉट गिव्हन... इज लॉस्ट. जे दान नाही केले, ते वाया गेले! डॉमिनिक लॅपिए यांना देण्यातला आनंद कळला होता. काही वर्षांपूर्वी त्यांना पद्मविभूषण प्रदान करून भारत सरकारनं त्यांचा यथोचित गौरव केला होता, तो केवळ त्यांच्या साहित्यसेवेबद्दल नव्हे. अभावातही ‘आनंदनगर’ शोधून तिथं मुक्काम ठोकणारा हा रहिवासी वयाच्या ९१व्या वर्षी परवा- रविवारी पुढल्या प्रवासाला निघूनदेखील गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.