एकाच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे महाराष्ट्रात होते. दोन्ही पक्षांच्या रणनीती काय असतील, याचा अंदाज त्यांच्या दौऱ्यांवरून येऊ शकतो.
महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या तारखांची केवळ घोषणा तेवढी बाकी आहे! निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी कार्यकर्ते सज्ज होताहेत अन् नेत्यांचे महाराष्ट्रातले प्रवास वाढताहेत. एकाच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे महाराष्ट्रात होते. मोदींनी निवडला होता विदर्भ - मुंबईचा परिसर, तर राहुल गांधींनी पश्चिम महाराष्ट्र. दोघांनीही लोकसभा निवडणुकीतील त्यांची भूमिका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनिमित्ताने पुन्हा एकदा मांडली.
दोघांचाही उद्देश एक त्यांच्या त्यांच्या मतदारांपर्यंत पोहोचणे! खरे तर हरियाना आणि जम्मू-काश्मीरच्या निकालांमध्ये आपली सरशी होईल आणि देशातले वातावरण भाजपला नाकारणारे असल्याने ते काँग्रेसला स्वीकारणारे असल्याची खात्री या पक्षाचे नेते व्यक्त करीत आहेत. निकालांबाबत त्यांना भलताच विश्वास आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या हातून गेल्या तर देशाचा राजकीय स्वर काँग्रेस आहे हे पुन्हा एकदा समोर येईल, असे त्या पक्षाला वाटते.
राहुल गांधी यांनी सामाजिक सलोख्याचा ते सतत जपत असणारा मंत्र पुन्हा एकदा दृढपणे सांगण्यासाठी तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यांच्या शेजारी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आणि सध्याचे खासदार होते. या दोन्ही परस्परपूरक विचारधारांचा समन्वय साधत काँग्रेसला महाराष्ट्राच्या राजकारणावरची पकड पुन्हा एकदा प्रस्थापित करायची आहे.
१९८० पर्यंतचा महाराष्ट्रातला एकमेव महत्त्वाचा पक्ष होता कॉंग्रेस. गेल्या काही दिवसात राजकारणात सहा पक्ष आपले अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करत आहेत. परंतु या सर्वात आपण आपल्या मित्रपक्षांच्या आधाराने का होईना श्रेष्ठ आहोत, हे दाखवायची संधी विधानसभेत उपलब्ध होईल, असे काँग्रेसला वाटते.
काँग्रेसचे राज्यस्तरावरचे नेते हवेत आहेत; पण केंद्राने नेमलेले निरीक्षक आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे पदाधिकारी मात्र वस्तुस्थितीची जाणीव ठेवून पावले टाकत आहेत. पश्चिम महाराष्ट्र हा तसे म्हटले तर काँग्रेसचा एकेकाळचा गड. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतर या भागातील काही आमदार पवार यांचे नेतृत्व मानू लागले.
मात्र आज त्यांच्या गटातले नेतेही काँग्रेससमवेत महाविकास आघाडीमध्ये आहेत. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर ठेवताना काँग्रेस स्वतःची मतपेढी मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. काँग्रेसचे तरुणनेते या भागातले. कोल्हापूरचे सतेज पाटील, सांगलीचे विश्वजित कदम अशी त्यातली महत्त्वाची नावे.
सतेज पाटील परिस्थितीचा अभ्यास करतात आणि सामाजिक समीकरणे मांडण्यासाठी प्रयत्न करतात. तरुण पिढीचा प्रतिनिधी या नात्याने त्यांनी प्रदेशाध्यक्ष व्हावे, अशी इच्छा काँग्रेस श्रेष्ठींनी व्यक्त केली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीतही पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी काँग्रेसला लक्षणीय यश मिळवून दिले होते. या वेळेला ते निवडणुकीला सामोरे जाताना पकड अधिक बळकट करू बघतात.
लोकसभेसाठी पहिला उमेदवार म्हणून शाहू महाराजांची घोषणा झाली. ती कोल्हापूरशी संबंधितच होती. शरद पवारांनी येथे बेरजेचे राजकारण केले आणि त्या राजकारणाचा लाभ आता काँग्रेसलाही व्हावा, यासाठी सतेज पाटील अग्रेसर झालेले दिसतात. अल्पसंख्यांक मतेदेखील यावेळी काँग्रेसकडे कायम राहतील, लोकसभेप्रमाणे मतदार काँग्रेसला पसंती देतील, असे बोलले जाते.
त्यामुळे राहुल गांधी यांच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सलग दुसऱ्या दौऱ्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात सकारात्मक रीतीने केली जाते आहे. राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपासून दलितांच्या घरी जायचे तेथे भोजन करायचे असा एक मार्ग स्वीकारलेला आहे. हा ‘प्रोटोटाइप’ झाल्याची चर्चा होणे स्वाभाविक आहे. काँग्रेस नेते मात्र या नेपथ्य आणि वातावरणनिर्मितीवर बरेच खुश असतात.
बेरजेचे राजकारण
पंतप्रधान नरेंद्र मोदी आदिवासी समाजाच्या मतांची बेगमी करण्यासाठी यवतमाळ वाशिम परिसरात गेले होते. तेथे त्यांनी बेरजेचे राजकारण करायचा नवा प्रयत्न केला. चुकीच्या मंडळींना संधी दिल्याने लोकसभेत यश मिळाले नाही, असा शिंदे गटाचा दावा आहे. या परिस्थितीत तेथील मते परत यावीत हे मोदींचे प्रयत्न होते. विदर्भातील आदिवासी समाजाला साद घालून ते लगेच मुंबईकडे आले.
मुंबईतल्या कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेत असलेल्या मेट्रो वाहिनीचे त्यांनी उद्घाटन केले आणि नेहमीप्रमाणे उद्घाटनाच्या निमित्ताने मेट्रोतून प्रवास केला. जसे राहुल गांधी यांच्या ‘दलित घरातील भेटीं’चा मतदारांना चांगलाच परिचय झाला आहे, तसाच नरेंद्र मोदी यांच्या मेट्रो प्रवासाचाही.
मुद्दा असा आहे की या दोन वेगवेगळ्या विचारधारांना विधानसभेतही तशाच स्वरूपात मतदार स्वीकारणार आहेत का? पर्यावरणाच्या नावाने मेट्रोची कामे अकारण थांबवली गेली, असा आरोप भाजपचे राज्यातले नेते आणि शिवसेनेचा शिंदे गट करतो. भाजप ‘इंडिया’तील विकासाच्या आकांक्षांना पुन्हा साद घालू पाहात आहे, तर राहुल गांधी ‘भारता’तील प्रश्नांना वाचा फोडताना दिसतात.
दोन वेगवेगळ्या विचारधारांची महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लढाई आहे. अर्थात ही लढाई वरवरची वाटते आहे आणि विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या प्रकारच्या संपर्कयंत्रणांच्या आधारावर स्थानिक उमेदवार बाजी म्हणून आहेत का, हाही एक वेगळाच मुद्दा आहे. सध्या राजकारण पेटते आहे आणि या पेटलेल्या राजकारणात राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी या दोघांच्याही दौऱ्यांनी भर टाकली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.