इतिहासपुत्रा, शतायुषी हो! 

babasaheb-purandhre
babasaheb-purandhre
Updated on

लेखणी आणि वाणीतून गेली 66 वर्षे शिवचरित्राचा जयघोष करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज (25 जुलै) 99 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या निमित्ताने... 

"शिवाजी महाराज' हा सप्ताक्षरी मंत्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर जपला. या मंत्राच्या साह्याने "वन्ही तो चेतवावा । चेतविता चेततो।' या समर्थ वचनाला साक्षी ठेवत मराठी मनाची मरगळ दूर केली. बाबासाहेबांनी इतिहासाचे वेड पेरले. त्यांच्या प्रेरणेने अनेक शिवभक्त आणि गडप्रेमी निर्माण झाले. ऐतिहासिक वस्तू, वास्तू आणि कागदपत्रे यांच्याकडे इतिहासाचे साक्षीदार म्हणून पाहण्याची दृष्टी शिवशाहिरांनी दिली. अनेक अभ्यासक आणि संशोधकांना त्यातून प्रेरणा मिळाली. हुंदडणारी उत्साही तरुण मुले गडकोटांच्या भेटीला जाऊ लागली. बाबासाहेबांकडून तो तेजस्वी इतिहास समजावून घेऊ लागली. शिवचरित्राच्या अभ्यासाचे, संशोधनाचे, श्रवणाचे, दर्शनाचे, अध्यापनाचे एक नवे पर्व सुरू झाले. सनावळी आणि दप्तरांमधला इतिहास शिवशाहिरांनी ललितरम्य पद्धतीने अनेक पिढ्यांना ऐकवला. वाणी नव्हे खधार। की विजेचा लोळ चर्रर्र। करी शिवसृष्टीचा उच्चार। जणू घन गडगडती।। अशी बाबासाहेबांची तेजस्वी वाणी आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच बाबासाहेबांच्या भक्तीचा विषय होते. सहाव्या वर्षांपासून वडिलांबरोबर त्यांनी किल्ले, वाडे, महाल, मंदिरे पाहण्यास प्रारंभ केला. इतिहासाचे साक्षीदार शोधण्यासाठी कधी सायकलवरून, कधी पायी, कधी रेल्वेने, कधी जलमार्गाने, कधी विमानाने, मिळेल त्या वाहनाने लक्षावधी मैलांचा प्रवास केला. रात्ररात्र दप्तरे चाळून शिवचरित्राची सामग्री मिळवली. शिवचरित्र लिहून तयार झाले; ते प्रकाशित करण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा पैसे जमवायला बाबासाहेबांनी मुंबईच्या भाजीबाजारात कोथिंबीरही विकली. या शिवगाथेची वाचकांनी अक्षरशः पारायणे केली. या शिवचरित्राचे कौतुक करताना आचार्य अत्रेंनी "मराठा'तल्या अग्रलेखात लिहिले "... हे शिवचरित्र गद्य आहे की, काव्य आहे, इतिहास आहे की नाट्य आहे, याचा शब्दागणिक भ्रम पडतो. हे अमर शिवचरित्र कालिदासाच्या कल्पनेने आणि भवभूतीच्या भावनेने लिहिणारा एक महाकवी, हे अमर शिवनाट्य शेक्‍सपीअरच्या ज्वलंत भावनेने लिहिणारा महान नाटककार या महाराष्ट्रात जन्माला यावा हे केवढे मोठे भाग्य ! ' 

इतिहासाचे रोमांचकारी दर्शन 
बाबासाहेबांचे शिवचरित्रावर पहिले जाहीर व्याख्यान 25 डिसेंबर 1954 रोजी नागपूर येथे झाले. तेव्हापासून "शिवचरित्रकथन' हा त्यांचा ध्यास नि श्वास बनला. गेली 66 वर्षे अव्याहतपणे बाबासाहेब व्याख्यानातून शिवचरित्र सांगत आहेत. भारतभर आणि देशाच्या सीमा ओलांडून बाबासाहेबांची परदेशातही शेकडो व्याख्याने झाली. अमेरिकेत एकेका दिवशी त्यांची पाच व्याख्याने झाली. आज वयाची 98 वर्षे पार केलेली, तरी बाबासाहेबांची शिवशाहिरी त्याच जोमात सुरू आहे. सर्व नाट्यविषयक संकल्पनांना ओलांडून जाणारे आणि संपूर्ण शिवचरित्र नाट्यरूपाने मांडणारे "जाणता राजा' हे बाबासाहेबांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले महानाट्य गेली पस्तीस वर्षे जगात गाजत आहे. या अपूर्व प्रयोगाने इतिहासाचे रोमांचकारी दर्शन घडविण्याबरोबरच नवा इतिहास निर्माण केला आहे. 

व्यासंग हीच त्यांची विश्रांती. वेळेबाबत ते तत्पर. अकारण कोणीही वेळ वाया घालवू नये यासाठी "कामे पडली अनंत। वेळ मात्र मर्यादित। म्हणोनि व्यर्थ गप्पांत। कालक्षेप न की जे।।' असा सुविचार त्यांनी घरात लावला आहे. हा इतिहासपुत्र कमालीचा हळवा आहे. पीडितांना पाहून कळवळणाऱ्या शिवशाहिरांची कळवळ मुकी नसते. तिला मदतीचे हात असतात. शिकण्याची अनिवार ओढ असलेली नानाविध जातिधर्माची मुले पुरंदरे वाड्यात राहून शिकली. समाजाला ते सतत देत राहिले. 


बाबासाहेबांचा गौरव करताना प्रा. शिवाजीराव भोसले म्हणाले होते, "बाबासाहेब ही व्यक्ती आहे की संस्था आहे हेच उमगत नाही. व्यक्ती म्हणावं तर तिचं कार्य महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. संस्था म्हणावं तर तिच्या कोठेही शाखा नाहीत. एका खांबावरती उभी असलेली ही वर्तमानकालीन द्वारका आहे. शाबास, शाहिरा शाबास! इतिहासानंसुद्धा तुला मुजरा करावा इतका मोठा माणूस तू ! या सत्त्वहीन, तत्त्वहीन जगात शिवचरित्राचा जागर करीत राहा. तुझ्या जागरणाला महाराष्ट्रातील सारी दैवतं जातीनं हजर राहतील आणि तुझ्या शिवकथेत न्हालेला हा महाराष्ट्र तेजस्वी इतिहासाची पुनरावृत्ती घडवील आणि खंडतुल्य अशा या प्रजासत्ताकास आनंदभुवनाचे ऐश्वर्य प्रदान करील. हे घडावं यासाठी हे इतिहासपुरुषा, शतायुषी हो!'... हे शब्द खरे ठरण्याच्या क्षणाची महाराष्ट्र वाट आतुरतेने वाट पाहतो आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()