भाष्य : ‘कोविड’ आणि बिरबल

भाष्य : ‘कोविड’ आणि बिरबल
Updated on

‘कोविड’बाबतची आकडेवारी पाहिली तर मृत्युदर कमी होताना दिसतो. म्हणजे या रोगाची घातकता वाटली होती, त्याच्या एक दशांशएवढीच आज आहे. पण आकडेवारीची दुसरी बाजू म्हणजे टक्केवारी कमी असली तरी ज्यांना गंभीर लक्षणं दिसतात, अशा रुग्णांची संख्या कमी नाही. तेव्हा हे बारकावे लक्षात घेऊनच उपाय केले पाहिजेत.

बादशहाच्या पायात एकदा काटा टोचला. झालं. बादशहाने फर्मान काढलं. राज्यात सर्वत्र मऊ गालिचे अंथरा. परत कधी पायात काटा बोचता कामा नये. बिरबल म्हणाला, ‘‘जी हुजूर, उद्या सकाळपर्यंत अमलात येईल.’’  दुस-या दिवशी बादशहानं विचारलं, ‘‘सर्वत्र गालिचे पसरून झाले का?’’ बिरबलानं शांतपणे मखमली कापडात गुंडाळलेलं एक पुडकं बादशहाला सादर केलं. उघडून पाहिलं तर काय, दोन सुंदर नक्षीदार आणि आतून मखमली आवरण असलेले जोडे. 

आज इतक्‍या वर्षांनंतरही बादशहाची विचार करण्याची पद्धत बदललेली दिसत नाही. उणीव जाणवते ती बिरबलाची. ‘कोविड’चे काटे कुणाला बोचायला नको असतील तर सगळ्या जगाचे व्यवहार बंद करणं, हा बादशहाचा उपाय झाला. बिरबल काय बरं सुचवेल? जेव्हा हा विषाणू नवा होता, तेव्हा त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. जे चित्र दिसलं होतं, ते असं की हा नुसता वा-याच्या वेगाने पसरतो, एवढंच नाही, तर ज्याच्या त्याच्यावर यमाचे फास आवळत जातो. संसर्ग झालेल्यांपैकी पाच टक्के, दहा टक्के, काही ठिकाणी सतरा टक्‍क्‍यांपर्यंत माणसे मरत असल्याची आकडेवारी येत होती. हे चित्र खूपच भयप्रद होतं. तेव्हा काय करायचं, हे कुणालाच नीट कळत नव्हतं. त्यावेळेस जगात सर्वत्र जे निर्णय घेतले गेले, ते बरोबर की चूक, या प्रश्नात शिरण्यात फारसा मतलब नाही. पण आज परिस्थिती खूपच वेगळी आहे.

गेल्या काही महिन्यांचे अनुभव आणि आकडेवारीही आता आपल्या हातात आहे. आता तरी बिरबलाचा विवेक जागा व्हायला हरकत नाही. संसर्ग झालेल्यांमध्ये मृत्युदर किती आहे, याची अधिक विश्वसनीय आकडेवारी आता हातात आहे. चाचणी आणि नोंदणी झालेल्या संसर्गींमधे तो दोन टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाला आहे. पण चाचणीतून सुटलेले आणि संसर्ग झालेले बरेच अधिक आहेत. ते किती आहेत याचा अंदाज घेतला तर हा मृत्युदर अर्धा ते एक टक्‍क्‍याच्या दरम्यान येतो, असं ‘नेचर‘ मासिकात जूनमध्ये प्रकाशित झालेला एक शोधनिबंध दाखवतो. मृत्युदर दिवसेंदिवस आणखी कमीच होतो आहे. म्हणजे या रोगाची घातकता आधी वाटली होती, त्याच्या एक दशांश एवढीच आज आहे. पण आकडेवारीची दुसरी बाजूही खरीच आहे, तो म्हणजे टक्केवारी कमी असली तरी ज्यांना गंभीर लक्षणं दिसतात, अशा एकूण रुग्णांची संख्या काही कमी नाही. भारतासारख्या दाट वस्तीच्या देशात संसर्ग इतक्‍या झरझर पसरू शकतो, की एकूण संसर्ग झालेल्यांची संख्या खूप असणार आहे. त्याचा ०.१ टक्का म्हणजेसुद्धा छोटी संख्या नाही. त्यांची काळजी केलीच पाहिजे. फक्त या ०.१ टक्के लोकांना जोडे घालायला द्यायचे, की बाकीच्या ९९.९ टक्के लोकांच्या रोजगाराला गालिच्याखाली दडपून टाकायचे, हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. विषाणूची लागण होणा-यांपैकी बहुसंख्य हे बिनलक्षणी असतात, तर काहींना अगदी किरकोळ त्रासावर भागतं. पण थोड्यांची स्थिती एकदम खूपच गंभीर होते. गंभीर होण्याचा धोका असणा-यांमधे वयोवृद्ध आणि इतर काही जुनाट रोगांचा आधीच त्रास असलेले जास्ती असतात. तरुण व्यक्ती गंभीर लक्षणं दाखवतच नाही असं नाही. पण त्याचं प्रमाण खूपच कमी आहे. मग धोकागटात कोण येतं याची आपल्याला ब-यापैकी कल्पना आहे. त्यांची काळजी कशी घ्यायची, हा मुख्य मुद्दा असला पाहिजे. 

बिरबल असता तर त्यानं काय सुचवलं असतं? एक म्हणजे जिथे लागण होण्याची शक्‍यता जास्त ती म्हणजे गर्दीची शहरे आणि धोका गटातील व्यक्ती एकत्र येणं कमी कसं होईल ते पाहावं. आज विविध चांगल्या हवेची ठिकाणं, शहरापासून दूरची पर्यटनस्थळं पर्यटन बंद असल्यामुळे ओस पडली आहेत. तिथं अनेक रिसॉर्ट धंदा नसल्यामुळे तोटा सहन करताहेत. ग्राहक नसला तरी देखभालीचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचा पगार द्यावाच लागतो. नाहीतर कर्मचारी कमी करावे लागतात. दोन्ही वाईटच. मग पर्यटन बंद आहे तोवर अशा ठिकाणी धोकागटातील व्यक्तींची सुरक्षित व्यवस्था करावी. रिसॉर्टमालकांनी हे ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर केलं तरी संपूर्ण तोटा सहन करण्यापेक्षा ते परवडेल. पुन्हा पर्यटन सुरू झालं की व्यवसाय सावरणार आहेच. जे सरकार आख्ख्या जनतेवर कुलुपबंदी करू शकतं, त्या सरकारला रिसॉर्टमालकांना ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर धोकागटातील व्यक्तींची व्यवस्था करण्याची सक्ती करणं काही अवघड नाही. मोकळ्या हवेच्या आणि कमी गर्दीच्या ठिकाणी धोकागटातील व्यक्ती संसर्गापासून अधिक सुरक्षित राहू शकतील. अर्थात धोकागटातील सर्वांची अशीच व्यवस्था करता येणार नाही हे उघड आहे. काहींना शहरातच राहणं अपरिहार्य असेल. त्याखेरीज अनपेक्षितपणे धोकागटात न टाकलेल्या एखाद्या व्यक्तीला गंभीर लक्षणं दिसतीलही. पण धोकागटाचा एक मोठा हिस्सा सुरक्षित जागी गेला, तर उरलेल्यांची काळजी घेणं तुलनेनं सोपं होईल. रुग्णालयांवरचा ताण काही प्रमाणात तरी कमी झाल्यावर वैद्यकीय सेवा अधिक प्रभावी होईल. ती होण्यासाठी गंभीर लक्षणं लवकर कशी ओळखायची, कधी रुग्णालयात दाखल करणं आवश्‍यक आहे याचं प्रबोधन, शहराच्या प्रत्येक भागातील लोकांना आवश्‍यकता वाटल्यास काही मिनिटातंच रुग्णवाहिका उपलब्ध कशी होईल यावर प्रशासनाचा भर असायला हवा. धोकागटाची चांगली व्यवस्था केली तर मग काम करणा-या वयोगटाला रोजगार, व्यवसायाची कामं जवळजवळ पूर्ववत करता येतील. फार फार तर चित्रपट, सभा आणि मिरवणुका तेवढ्या बंद ठेवाव्यात. बाकी व्यवहार सुरू राहिले तर रोजगार आणि आर्थिक परिस्थिती पुन्हा सुधारू लागेल. हा झाला एक उपाय. दुसरा म्हणजे कामासाठी बाहेर जाणा-या कर्मचा-यांच्या घरात एखादी वृद्ध व्यक्ती राहणं अपरिहार्य असेल तर त्यांना विशेष काळजी घ्यावी लागेल. बाहेरून आल्याआल्या त्यांना एकदम भेटू नये. कपडे बदलून, हातपाय धुवून, शक्यतो अंघोळ करून मगच त्यांच्याजवळ जावं. अशा बारीकसारीक गोष्टींमध्ये धोकागटातील व्यक्तींना जपावं लागेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छतेच्या सवयी. मास्क वापरला आणि सॅनिटायझरची बाटली ठेवली म्हणजे झालं असं नाही. थुंकण्यासारख्या सवयींचा नायनाट करण्याची चळवळच चालवावी लागेल. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबद्दलचा दंड नुसता कागदावर राहून उपयोग नाही. प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणीत आला पाहिजे. स्वच्छता कर्मचारी खूप महत्त्वाचा आहे. डॉक्‍टर आणि परिचारिकांच्या सुरक्षिततेची जेवढी काळजी घेतली जाते, तेवढी प्रत्येक स्वच्छता कर्मचा-याची घेतली जायला हवी. अशा धर्तीवर असतील बिरबलाचे उपाय. धोकागटाची जास्तीतजास्त काळजी घ्यायची आणि काम करणा-या वर्गानी दुप्पट जोमानं परत कामाला लागायचं. त्यानं विषाणूचा लगेच नायनाट होणार नाही. तो टाळेबंदीनीही होण्याची चिन्हे नाहीतच. पण मृत्यू मोठ्या प्रमाणावर टाळता येतील आणि मृत्यू टळले तर विषाणू काही काळ इकडे तिकडे बागडेना का! शेवटी बादशहाचे उपाय करायचे की  बिरबलाचे याचा निर्णय आम जनतेचा असला पाहिजे, तो फार काळ लादता येणारही नाही.

(लेखक जीवशास्त्रज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.