Sakal Editorial Article : हौस ऑफ बांबू - 'पुरुषोत्तम' साठीचा झाला नव्हं..!

Purushottam Karandak Result : दोन वर्षापूर्वी गुणवत्ता नसल्यामुळे परीक्षकांनी आख्खा पुरुषोत्तम करंडकच जागच्या जागी ठेवून दिला होता.
Purushottam Karandak Result
Purushottam Karandak Result esakal
Updated on
Summary

शहरी भाषेपेक्षा ग्रामीण लहेजा भाव खाऊन जातो, हे खरं. पण एकांकिकेचं (Ekankika Natya Spardha) वजन या एकाच बाबीवर अवलंबून असतं, असाही समज व्हायला नको.

-कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! धुंदी अजून उतरत नाही. गुंगी अजून गेली नाही. रंगपंचमीच्या दिवशी गावभर भटकल्यानंतर संध्याकाळी घरी येऊन घासलेटाने अंगावरचा रंग काढून नुसताच वरणभात मिटल्या डोळ्यांनी पोटात ढकलून अंथरुणात स्वत:ला ढकलून देत बिनघोर झोपण्याचा काळ कसा असतो, ते सध्या अनुभवत्ये आहे. पुरुषोत्तम करंडकाच्या एकांकिकांचा जवळपास महिनाभराचा स्पर्धा-सोहळा पार पडल्यानंतर आलेला हा शिणवटा आहे. अर्थात आमच्यासारख्या प्रेक्षकांची ही अवस्था, तर पुरुषोत्तम गाजवणाऱ्या कलावंत मुलामुलींची स्थिती काय असेल? मी समजू शकत्ये…

पुरुषोत्तम करंडकाचा निकाल (Purushottam Karandak Results) आठवडाभरापूर्वीच लागला. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ आज (शनिवारी) भरत नाट्य मंदिरात संध्याकाळी पाचनंतर पार पडेल. नाटककार चं. प्र. देशपांडे यांच्याहस्ते गरवारे कॉलेजच्या (Garware College Pune) चमूला करंडक बहाल केला जाईल. या चमूनं सादर केलेली ‘बस नं. १५३२’ या एकांकिकेनं परीक्षकांसह सगळ्यांनाच चमकवलं होतं. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचा जयराम हर्डीकर करंडक आयएमसीसीच्या ‘सखा’ या एकांकिकेनं पटकावला. यंदाची बातमी अशी की सर्वच्या सर्व पुरस्कारांचं करंडकासकट नीट वाटप झालं.

Purushottam Karandak Result
हौस ऑफ बांबू : जीव दिव काय च्या मारुं..?

गुणवत्तेअभावी पारितोषिकांऐवजी रोख बक्षिसं देण्याची वेळ आली नाही. दोन वर्षापूर्वी गुणवत्ता नसल्यामुळे परीक्षकांनी आख्खा पुरुषोत्तम करंडकच जागच्या जागी ठेवून दिला होता. तेव्हा नाट्यविश्वात बरीच खळबळ माजली होती. गेल्या वर्षीही काही पुरस्कार दिले गेले नव्हते. यंदा मात्र सगळं नीट पार पडलं, ही नटेश्वराची कृपा. ‘महाराष्ट्र कलोपासक’तर्फे आयोजित ‘पुरुषोत्तम’चं हे ५९वं वर्ष होतं. कोरोनाचा काळ सोडला, तर तरुण कलावंतांचं हे हक्काचं मैदान गेली ५८ वर्ष चालू आहे.

स्पर्धेचे संस्थापक आणि दिग्गज नेपथ्यकार राजाभाऊ नातू यांचं हे जन्मशताब्दीवर्ष. स्वत: तंत्रनिपुण असूनही त्यांनी नाट्यकलेतला गाभा मानल्या जाणाऱ्या तीन बाबींवरच भर ठेवून स्पर्धा सुरु केली. अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन. बाकी रंगभूषा, प्रकाशयोजना, ध्वनियोजना वगैरे तांत्रिक बाबी असतात; पण परीक्षकांच्या समोरच्या गुणतक्त्यात त्यांचे रकानेच नसतात. त्यामुळे भपकेबाज काहीतरी करुन चमकण्याचा खटाटोप आपोआप टळतो. हे अतिशय स्तुत्य.

Purushottam Karandak Result
हौस ऑफ बांबू : मी कचरा करणार नाही...!

‘बस नं. १५३२’ आणि ‘सखा’ यामध्ये कोण डावं, कोण उजवं हे ठरवणं कठीणच होतं. काही वर्षांपूर्वी भरधाव बस पळवून माणसं चिरडणाऱ्या संतोष माने प्रकरणाचा धागा ‘बस नं. १५३२’ मध्ये अतिशय कल्पकतेनं आणला गेला होता, तर ‘सखा’ ही कृष्ण-सुदामाची अगदी वेगळीच गोष्ट आहे. तरुणांच्या लिखाणाच्या प्रेरणा आपल्या आसपासच्या वास्तवातूनच प्रखरतेनं येऊ लागल्या आहेत, हे कळून चुकलं. आणखी एक गोष्ट जाणवली. पुरुषोत्तम करंडकासारख्या स्पर्धेत अनेक कॉलेजांचे चमू उतरतात. वर्षभर मेहनत करतात. नाटकवाल्यांचे अड्डे जमतात. त्यात शहरी मुलं असतात, आणि ग्रामीणही. पण ग्रामीण बाज आणि भाषा असली की यश हमखास मिळतं, असा आडाखा या हौशी मुलांनी लावला आहे का?

शहरी भाषेपेक्षा ग्रामीण लहेजा भाव खाऊन जातो, हे खरं. पण एकांकिकेचं (Ekanki Natya Spardha) वजन या एकाच बाबीवर अवलंबून असतं, असाही समज व्हायला नको. परीक्षकांसाठी आणि रसिकांसाठीही ही सावधगिरीची घंटा आहे. अंतिम फेरीपर्यंत आलेल्या सगळ्याच एकांकिका छान होत्या. स्पर्धेतून मराठी रंगभूमीला आणि चित्रपटसृष्टीला इतके तालेवार कलावंत मिळाले आहेत की बघायला नको. ‘पुरुषोत्तम’ १९६३ मध्ये सुरु झाली, तेव्हा पहिली दोन्ही वर्षे डॉ. जब्बार पटेल नावाच्या तरुण कलावंतानं बाजी मारली होती. पुढच्या काळात सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, अमृता सुभाष, निपुण धर्माधिकारी, योगेश सोमण, अमेय वाघ असे अनेक कलावंत या एकांकिका स्पर्धेनं रंगभूमी-चित्रपटसृष्टीला दिले. यंदाही त्यात दमदार भर पडत्ये आहे, याचा अंदाज आला. सगळ्यांचं अभिनंदन!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.