कुणाच्या पाठीवर अर्थव्यवस्थेचे ओझे?

पाकिस्तानात गेल्या आर्थिक वर्षात गाढवांची संख्या तब्बल एक लाखाने वाढली आहे, असे तेथील आर्थिक सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. याचा अर्थव्यवस्थेशी जवळचा संबंध आहे.
Donkey
DonkeySakal
Updated on

पाकिस्तानात गेल्या आर्थिक वर्षात गाढवांची संख्या तब्बल एक लाखाने वाढली आहे, असे तेथील आर्थिक सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. याचा अर्थव्यवस्थेशी जवळचा संबंध आहे.

पाकिस्तानात इम्रान खान यांनी त्या देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्या देशातील गाढवांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि परवेज मुशर्रफ यांच्या काळात गाढवांची संख्या साठ हजारांनी वाढायला एक दशकभर लागले होते. तथापि पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढणे हा विषय वरवरचा नाही; तो गहन आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार, भारतातील गाढवांची संख्या गेल्या वेळच्या तुलनेत ६२ टक्क्यांनी घटली आणि आता देशभरात अवघी लाखभर गाढवे शिल्लक आहेत. अनेक देश या समस्येने ग्रासले आहेत. याचे कारण तिचा आणि पाकिस्तानातील गाढवांच्या वाढत्या संख्येचा संबंधदेखील चीनमधून येणाऱ्या मागणीशी आहे. गाढवाच्या कातड्याचा वापर करून बनविलेल्या जिलेटिनचा उपयोग ‘इजियायो’ नावाच्या चिनी पारंपरिक औषधात होतो आणि हे औषध मानवी प्रतिकारशक्ती वाढविण्यापासून शरीराच्या विविध व्याधींवर रामबाण उपाय ठरते, असा अजब शोध चीनने लावला. अठराव्या शतकापर्यंत हे औषध केवळ राजघराण्यासाठी होते आणि केवळ काळ्या रंगाच्या गाढवाच्या त्वचेचा वापर व्हावा, अशी अट होती. कालांतराने यात भेसळ होऊ लागली आणि अन्य प्राण्यांच्या कातडीचा वापर सर्रास होऊ लागला.

१९९० च्या दशकात चीनने आपल्या औषधनिर्माण मार्गदर्शक दस्तावेजात गाढवाच्या कातडीचा वापर अनिवार्य केला आणि चीनमध्ये लक्षावधी गाढवांची कत्तल सुरु झाली. याचे कारण ‘इजियाओ’ला मागणी आणि पर्यायाने मिळणारी किंमत वाढली. चीनमध्ये गाढवांच्या संख्येत झपाट्याने घट झाली. तेव्हा परदेशातून गाढवांच्या कातडीच्या आयातीला असणारे निर्बंध उठविण्यात आले आणि चीनने जगभरात जिथून शक्य आहे, तिथून गाढवांची कातडी मिळविणाकडे मोहरा वळविला.

कातडीची तस्करी

युगांडा, केनया, सेनेगल, माली आदी आफ्रिकी देशांतून कायदेशीर मार्गांपेक्षा गाढवांची आणि त्यांच्या कातडीची तस्करी होऊ लागली,याचे कारण या दोन्हीला प्रचंड भाव मिळू लागले. साहजिकच गाढवांच्या चोरीपासून गाढवांची संख्या घटणे, अशा अनेक समस्या या देशांसमोर उभ्या राहिल्या आणि त्यांनी चीनला गाढवांच्या होणाऱ्या निर्यातीवर बंदी घातली; पण त्याने समस्या सुटली नाही. वाघाच्या कातड्याची जशी चोरून तस्करी होते, तशी ती गाढवाच्या कातडीची होत राहिली. मात्र यामुळे गाढवांवर उदरनिर्वाहासाठी विसंबून असणाऱ्या अनेकांची ससेहोलपट झाली. याचे कारण गाढवांच्या किंमती दहादहा पटींनी वाढल्या आणि चोरीला गेलेल्या गाढवाच्या जागी दुसरे गाढव विकत घेणे गरिबांना अशक्य होऊन बसले. गरीब देशांच्या अर्थव्यवस्थेला नख लागू लागले. काही देशांनी मग गाढवांच्या कत्तलीवर निर्बंध घातले. पण त्यामुळे समस्या आणखी बिकट झाली.

पाकिस्तानात २००० साली गाढवांची संख्या ३८ लाख होती. ती आता ५६ लाखांपर्यंत गेली आहे. पाकिस्तानात देखील गाढवांची संख्या घटू लागली होती कारण गाढवांची आणि त्यांच्या कातडीची बेकायदेशीर तस्करी होत होती. तस्करी रोखण्यासाठी याला कायदेशीर स्वरूप देण्याचा निर्णय खैबर पख्तुनवाला प्रशासनाने घेतला. त्यासाठी पद्धतशीर गर्दभ पैदास प्रकल्प उभारण्याचे ठरविले आणि त्यात चीनही गुंतवणूक करण्यास तयार झाला. यासाठी चीनी कंपन्या ८ अब्ज डॉलरपर्यंत गुंतणवूक करण्यास राजी होत्या व आहेत आणि त्या बदल्यात पाकिस्तान पुढील तीन वर्षांत ऐंशी हजार गाढवांची निर्यात चीनला करेल. चीनमध्ये गाढवाच्या मांसाला मागणी आहे आणि कातड्यालाही. परकीय चलनाच्या बाबतीत पाकिस्तानच्या तिजोरीत खडखडाट असताना गाढवांच्या या निर्यातीतून तिजोरीत काही भर पडेल अशी पाकिस्तानला अपेक्षा आहे. तेंव्हा चीन वारेमाप किंमतींनाऔषध विकणार आणि त्यासाठी गाढवे पुरवून पाकिस्तान आपली तिजोरी भरणार असा हा गाढवाच्या पाठीवर अर्थव्यवस्थेचा भार टाकण्याचा परस्परानुकूल व्यवहार आहे.

भारतात गाढवांची संख्या कमी होण्यामागे असणाऱ्या संभाव्य कारणांकडे ही सगळी स्थिती अंगुलीनिर्देश करते. त्यामुळे हा इशारा वेळीच ओळखणेही गरजेचे. चीनचे चोचले पुरविताना गाढवांचा वंशसंहार करून आपल्या देशातील गरिबांच्या उदरनिर्वाहाचा बोजवारा वाजविण्याच्या प्रयोगातून अनेक आफ्रिकी देशांचे हात पोळले आहेत. आता पाकिस्तान चीनची मागणी पूर्ण करून आपली तिजोरी भरू पाहत आहे. सामान्यतः गाढवपणा हा माणसाच्या मूर्खपणाला समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. कोणाच्या तरी अर्थव्यवस्थेचे ओझे कोणाच्या तरी पाठीवर टाकणाऱ्या माणसाच्या गाढवपणामुळे खऱ्याखुऱ्या गाढवाला मात्र जीवालाच मुकावे लागते.

पाकमधील संख्यावाढीचे रहस्य

केनयाने गाढवांच्या व्यावसायिक कत्तलखान्यांना परवानगी दिली आणि त्यामुळे केनयातून गाढवांचा संहार झालाच; पण जेथे बंदी होती तेथून तस्करी होऊ लागली. याचा फटका केनयाला बसला आणि आता केनयानेही गाढवांची संख्या वाढावी म्हणून कत्तलखान्यांवर नुकतीच बंदी घातली आहे. त्याने चीनची हव्यासी भूक कमी होणारी नाही. इथिओपियाने व्यावसायिक कत्तलखान्यांना परवानगी दिली आहे आणि आता पाकिस्तानच्या गाढवांना चीनने लक्ष्य केले आहे. पाकिस्तानमधील गाढवांची संख्या वाढली आहे ती या पार्श्वभूमीवर.

- राहूल गोखले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.