देशात गेल्या २-३ आठवड्यांच्या काळात कोविड-१९ संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत झालेली तीव्र वाढ म्हणजे शतकातून एखाद्या वेळेस येणारी आपत्ती ठरली आहे. हे संकट लक्षात घेऊन, सरकारची संपूर्ण यंत्रणा त्वरेने कामाला लागली आहे. वैज्ञानिक समुदाय, आरोग्य विभागातील व्यावसायिक आणि नागरी प्रशासनासोबतच, संरक्षण दलांनी देखील या अदृश्य पण प्राणघातक शत्रूशी सुरु असलेल्या लढाईत उडी घेतली आहे.
भारतीय लष्कर, हवाई दल, नौदल तसेच संरक्षण दलाच्या वैद्यकीय सेवा विभागाचे महासंचालक, संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ), शस्त्रास्त्रे निर्मिती मंडळ, संरक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सरकारी क्षेत्रातील संस्था; तसेच राष्ट्रीय छात्र सेना, छावणी मंडळे यासारख्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील इतर अनेक संस्थाही जनतेच्या वेदना कमी करण्यासाठी अनेक उपक्रम राबवित आहेत. वैद्यकीय व्यावसायिकांच्या अतिरिक्त सेवा उपलब्ध करून देणे, नव्या सुविधा उभारणे, मित्रदेशांकडून मिळणारा ऑक्सिजन देशात आणण्यासाठी तसेच आलेला साठा देशात योग्य त्या भागात पोचविण्यास हवाई दलाची मालवाहतूक विमाने वापरण्यात येत आहेत. ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पांची उभारणीही करण्यात येत आहे.
आपत्कालीन आर्थिक मंजुरीचे अधिकार
संरक्षण दलांनी नागरी प्रशासनाला शक्य असलेली सर्व मदत पुरवावी, असे निर्देश मी दिले आहेत. संरक्षण दलांच्या क्षमतांवर सामान्य लोकांची श्रद्धा असते.आणि विश्वास आहे. संरक्षण दलांना आपत्कालीन आर्थिक मंजुरीचे अधिकार दिले आहेत जेणेकरून फॉर्मेशन कमांडर हे विलगीकरण सुविधा अथवा रुग्णालये यांची उभारणी करतील. तसेच आवश्यक उपकरणांची, वस्तूंची, मालाची किंवा गोदामांची खरेदी आणि दुरुस्ती ही कामेही करू शकतील. संरक्षण दलाच्या वैद्यकीय सेवा विभागाचे महासंचालक, लष्कर, नौदल, हवाईदल, अंदमान-निकोबार कमांड यांच्या कमांड मुख्यालयातील वैद्यकीय शाखांचे प्रमुख यांच्यासह नौदलाचे कमांड वैद्यकीय अधिकारी आणि हवाई दलाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (मेजर जनरल आणि समकक्ष किंवा ब्रिगेडियर आणि समकक्ष)आणि संयुक्त कर्मचारीवर्ग यांना असलेल्या आर्थिक मंजुरी अधिकाराच्या व्यतिरिक्त हे नवे आर्थिक मंजुरीचे अधिकार असतील.
सशस्त्र दलांचा वैद्यकीय सेवा विभाग, डीआरडीओ, शस्त्रास्त्रे निर्मिती मंडळ, संरक्षण विभागांतर्गत सरकारी क्षेत्रातील संस्था तसेच छावणी मंडळे यांनी दिल्ली, लखनौ,पाटणा, इत्यादी भागांत अद्ययावत रुग्णालये उभारली. इतर ठिकाणी संबंधित राज्य सरकारांच्या विनंतीनुसार, अशा सुविधा उभारल्या जात आहेत. विविध लष्करी रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांसाठी ७५० खाटांची वेगळी सुविधा तयार ठेवण्यात आली आहे. सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवा विभागानेही देशात १९ रुग्णालयांत चार हजारहून अधिक खाटा आणि ५८५ अतिदक्षता सुविधा असणारी केंद्रे यांची या कामासाठी तरतूद केली आहे. दिल्लीमधील बेस रुग्णालय कोविड रुग्णालयात परिवर्तीत केले असून तेथे खाटांची क्षमता वाढवून ती एक हजार करण्यात आली आहे.
‘डीआरडीओ’ने नवी दिल्ली व लखनौत प्रत्येकी ५०० खाटांची सोय असणारी कोविड सुविधा केंद्रे, अहमदाबाद येथे ९०० खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय तसेच कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे पाटणा येथील रुग्णालय कोविड रुग्णालयात परिवर्तीत करून तेथे ५०० खाटांची सोय केली. मुजफ्फरपूर आणि वाराणसी येथे कोविड रुग्णालये उभारण्याचे काम वेगात सुरु आहे.
डॉक्टरांची उपलब्धता
सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवा विभागाने विविध रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ, अति-विशिष्ट तज्ञ आणि निमवैद्यकीय कर्मचारी यांच्यासह अतिरक्त डॉक्टरांची सेवाही उपलब्ध करून दिली आहे. माझ्या मंत्रालयाने, लघु सेवा कमिशन मिळालेल्या डॉक्टरांना ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत सेवाविस्ताराला मंजुरी दिल्याने २३८ जादा डॉक्टरांची सेवा उपलब्ध झाली आहे. नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या वैद्यकीय व्यावसायिकांनाही पुन्हा सेवेत घेण्यात आले. संरक्षण दलातील ज्येष्ठ माजी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ५१ अति-ताण असलेल्या ECHS अर्थात ‘माजी कर्मचारी योगदान आरोग्य योजने’तील रुग्णालयांमध्ये तीन महिने कालावधीत रात्रपाळी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाचा अतिरिक्त कंत्राटी कामगारवर्ग नेमण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, सशस्त्र दल वैद्यकीय सेवेचे महासंचालक या आठवड्यात कोविड -१९ संबंधित समस्यांसाठी दूरध्वनीवरून सल्लामसलत सुविधा देणार आहेत. निवृत्त डॉक्टरांना त्यात सहभागी करून घेतले जाईल.
ऑक्सिजन संयंत्रे
टाटा ऍडवान्सड सिस्टम्स लिमिटेड, बंगळूरू येथे ३३२ आणि कोईमतूरमध्ये ४८ वैद्यकीय ऑक्सिजन संयंत्रासाठी आपूर्ति आदेश जारी करण्याबरोबरच ‘डीआरडीओ पीएम केअर्स निधी’ अंतर्गत ५०० वैद्यकीय ऑक्सिजन संयंत्र निर्मितीचे काम सुरू केले आहे. अनेक सरकारी संरक्षण उपक्रमांनी सीएसआर अंतर्गत वेगवेगळ्या राज्यांतील स्थानिक सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन संयंत्रे खरेदीला देखील गती दिली आहे. या व्यतिरिक्त,लष्करी दल वैद्यकीय सेवेच्या महासंचालकांनी २३ मोबाईल ऑक्सिजन निर्मिती प्लांट्स ची मागणी देखील जर्मनीच्या एका कंपनीकडे नोंदवली आहे. हे प्लांट एका आठवड्यात भारतात येणे अपेक्षित आहे. त्याशिवाय, मोठ्या आकाराच्या २३ (३०० ली/मिनिट ते ७५० ली/मिनिट क्षमता) ऑक्सिजन प्लांट्ससाठीही निविदा जारी करण्यात आल्या आहेत.जेणेकरून लष्करी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकेल.
सार्वजनिक कंपन्यांचाही पुढाकार
हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि.,आयुध निर्माण मंडळांकडूनही कोविड केअर सेवा, ऑक्सिजन बेड्स अश सेवा-सुविधा देशभरात विविध ठिकाणी, स्थानिक राज्य सरकारांशी समन्वय साधून दिल्या जात आहेत. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड(HAL)ने कर्नाटकात बंगळूरू इथे १८० खाटांचे कोविड केअर सेंटर तयार केले असून त्यात अतिदक्षता विभाग आणि व्हेंटीलेटरही असतील. संरक्षण क्षेत्रातल्या सार्वजनिक संस्थांनी बंगळूरू येथे २५० खाटांचे ‘कोविड केअर सेंटर’ तयार करून कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत ते महापालिकेला सुपूर्द केले आहे. ओडिशाच्या कोरापुट येथे ७० खाटांचे, महाराष्ट्रात नाशिक येथे ४० खाटांचे अशी रुग्णालयेही कार्यरत आहेत. उत्तरप्रदेशात लखनौ इथे २५० खाटांचे कोविड सुविधा केंद्र स्थापन करण्याचे काम HAL ने हाती घेतले आहे.
सध्या, ३९ छावणी मंडळे देशाच्या विविध भागात असलेल्या सुमारे १,२४० खाटांच्या माध्यमातून ४० रुग्णालयांमध्ये सेवा देत आहेत . ३७ छावणी मंडळामध्ये ऑक्सिजन युक्त खाटांची व्यवस्था आहे. राष्ट्रीय छात्रसेनेचे अधिकारी, संयुक्त कमांडिंग ऑफिसर्स आणि ओआर्स यांच्याकडे लष्करी तुकड्या मदतीसाठी पाठवणे आणि राज्य सरकारांना कोविड विरुधाच्या लढाईत सर्वतोपरी मदत करण्याचे आणि लसीकरण मोहिमेतही सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सशस्त्र दले आणि संरक्षण विभागाच्या विविध आस्थापना या कोविड लढ्यात राज्य प्रशासन/स्थानिक स्वराज्य संस्थांना सहकार्य करत आहेतच, त्याशिवाय, लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. हे सगळे करीत असताना देशाचे संरक्षण करण्याची जबाबदारीही ते पार पाडत आहेत. कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरु असतांना जेव्हा संपूर्ण देश या कोविडविरुद्धच्या लढाईत एकवटला आहे, त्यावेळी, देशाला विजयी बनवण्यासाठी संरक्षण दले समाजाच्या खांद्याला खांदा लावून नव्हे, तर एक पाउल पुढे ठेवून वाटचाल करत आहेत. अशा कठीण संकटकाळातच, त्या संकटाशी लढण्यासाठी अदम्य इच्छाशक्ती आणि लढवय्या वृत्तीची गरज असते आणि तेच साहस आज संपूर्ण देश दाखवत आहे.
नागरिकांसाठी वैद्यकीय सेवा-सुविधा
संरक्षण खात्याने पुढील गोष्टी पुरवल्या आहेत.
लखनौ, प्रयागराज येथे प्रत्येकी १०० खाटा.
मध्य प्रदेशात, सागौर येथे रुग्णवाहिकांसह ४० खाटांची विलगीकरण सुविधा.
भोपाळ, जबलपूर येथे प्रत्येकी १०० खाटा, तर ग्वाल्हेर येथे ४० खाटा.
झारखंडच्या नामकुम येथे ५० खाटांची विलगीकरण सुविधा.
पुणे येथे ६० आयसीयू खाटा आणि नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे २० खाटा, तर राजस्थानमधील बारमेर येथे १०० खाटा.
अहमदाबाद आणि पाटणा येथे लष्कराचे वैद्यकीय अधिकारी तैनात.
विविध भागात ऑक्सिजन पुरवण्यासाठी २०० वाहनचालक सज्ज.
हवाई दल आणि नौदलाकडून लॉजिस्टिक सहाय्य.
वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा
वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी मालवाहू विमानानी ५० फेऱ्यांच्या माध्यमातून ११४२ मे.टन क्षमतेचे ६१ ऑक्सिजन कंटेनर वाहून आणले. देशभरात, ०५ मे २०२१ पर्यंत त्यांनी ३४४ उड्डाणे केली आणि ४५२७ मे.टन क्षमतेचे २३० कंटेनर आणले. वैद्यकीय ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय नौदलाने जहाजे तैनात केली आहेत. ५ मे रोजी बहारिन येथून ‘आयएनएस तलवार’ मधून पहिली खेप मंगलोरला आणण्यात आली. आयएनएस कोलकाता, आयएनएस कोची, आयएनएस तबर, आयएनएस त्रिकंद, आयएनएस जलाश्व आणि आयएनएस ऐरावत ही इतर जहाजे प. आशिया आणि आग्नेय आशियातील विविध देशांमधून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनने भरलेले क्रायोजेनिक कंटेनर आणि संबंधित वैद्यकीय उपकरणे आणण्यासाठी तैनात केली आहेत. अरबी समुद्रात तैनात कोची, त्रिकंद आणि तबर या जहाजाच्या दुसऱ्या तुकडीलाही राष्ट्रीय प्रयत्नात सामील करून घेण्यात आले आहे. लष्कराने आग्रा येथे दोन नागरी ऑक्सिजन प्लांट दुरूस्त केले आहेत ज्यायोगे दररोज १,८०० सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरु होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.