पुस्तक - सफर आ. श्री. केतकर
र विचंद्रन अश्विनचे नाव ऐकले नाही, असा क्रिकेटप्रेमी नसेल. परंतु भारताकडून खेळताना अनिल कुंबळेच्या खालोखाल कसोटी सामन्यांत ५१६ बळी मिळवणाऱ्या ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने सिद्धार्थ मोंगाच्या साथीने लिहिलेल्या या आत्मचरित्रात्मक पुस्तकात भारताला अनेक विजय मिळवून देण्यात मोठा हिस्सा असलेल्या त्याच्या पराक्रमाबाबत, मिळवलेल्या बळींबाबत वाचायला मिळेल, अशी अपेक्षा करणाऱ्यांची निराशा होईल. नंतर मात्र त्याच्या बालपणापासूनच्या जागतिक विजेतेपदापर्यंतच्या प्रवासाची कहाणी मिश्किल शैलीत वाचताना त्यांची निराशा नक्कीच दूर होईल. चेन्नईच्या पश्चिम मंबालम या उपनगराच्या पहिल्या गल्लीत सुरुवात झाल्यापासून, २०११मधील वानखेडे स्टेडियम वरील जागतिक क्रिकेट विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघात स्थान मिळवण्यापर्यंतचा अश्विनचा प्रवास त्याने सिद्धार्थ मोंगाच्या साथीने लिहिलेल्या या पुस्तकात आहे.
मध्यमवर्गातील त्याच्या कुटुंबाने व्यावसायिक क्रिकेटपटू होण्यासाठी आवश्यक साहित्य कसे मिळवून दिले, याबरोबरच क्रिकेटवेड्या गल्लीत वाढण्याचा आनंद किती असतो हे अश्विन सांगतो. शाळेतील आपल्या प्रेमप्रकरणाचाही उल्लेख करतो. पुस्तकाचा मोठा भाग लहानपणातील आठवणींचा आहे. क्रिकेट खेळण्याचा आनंद आपण लुटत होतो, चेन्नईतील सामने प्रत्यक्षात आणि दूरच्या शहरांतील सामने दूरचित्रवाणीवर पाहणे आवडायचे हे सांगतो. आईनेच त्याला लेग स्पिन अवघड वाटत असेल, तर त्याऐवजी ऑफ-स्पिन गोलंदाजी कर असे सुचवले. नशिबाने वडीलही त्याच्याएवढेच क्रिकेटवेडे असल्याने त्यांचा मोठा आधार होता. त्यांनी अश्विनचे क्रिकेटप्रेम वाढायला प्रोत्साहनच दिले. सामने पाहायलाही दोघेजण बरोबरच जात.क्रिकेटप्रेमामुळे शाळेत जाणे टळावे म्हणून ‘आजारा’ने त्याचे पोट दुखू लागे. त्यामुळे त्याला १९९९ मधील ब्रिजटाऊन कसोटीत वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियावर एक गडी राखून मिळवलेला विजय आणि ब्रायन लाराची नाबाद १५३ धावांची खेळी पाहता येते. हा त्याचा गूढ ‘आजार’ भारताने विंडीजवर ‘पोर्ट ऑफ स्पेन’ला विजय मिळवला तेव्हाही अचानक परततो. वडिलांनी मात्र हे गूढ ओळखलेले असते.
त्याच्या निवेदनात अनेक जागी मिश्किलपणा आहे. तामिळनाडू संघातला त्याचा साथीदार असलेल्या अनिरुद्ध श्रीकांतबद्दल तो म्हणतो, आम्ही दोघेही आघाडीचे फलंदाज मोठ्या संख्येने धावा करायचो... पण गोव्याविरुद्ध त्याला माझ्यापेक्षा जास्त सामने खेळायला मिळाले. (जाणकारांना ठाऊक असते की गोव्याविरुद्ध मोठी खेळी करणे सोपे होते.) क्रिकेट आणि अभ्यासातही आश्वासक काही घडत नसल्याने त्याला चेन्नईतील प्रथेनुसार घराबाहेरील पाटीवर ‘रविचंद्रन अश्विन, बारावी’, असे लिहावे लागेल का काय असे वाटत होते. पण ही भीती अनाठायी होती. तो इंजीनिअर बनला. चेन्नईच्या क्रिकेट संस्कृतीबद्दल सांगताना त्याने भारत-पाकिस्तान कसोटीचे उदाहरण दिले आहे. त्यावेळी पाकिस्तानने सामना जिंकल्यावर स्टेडियममध्ये एकदम शांतता पसरली. पाकिस्तानचे खेळाडू तंबूत परतत असताना स्टेडियमच्या एका भागात प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवू लागले. वसीम अक्रम आश्चर्याने'' पाहातच राहिला. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसले. नंतर एकामागून एक असे सर्वच स्टँडमधील प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवू लागले. अशी भरघोस दाद मिळाल्याने पाकिस्तानच्या खेळाडूंनीही प्रेक्षकांना अभिवादन करत मैदानाला फेरी (व्हिक्टरी लॅप) मारली. हेच खरे क्रीडाप्रेमी, गुणग्राहक प्रेक्षक !
अश्विनने या पुस्तकात आत्मप्रौढीपर काहीही लिहिले नसले, तरी ज्यांनी त्याला भक्कम आधार दिला ते आईवडील आणि आजोबा यांच्याबाबत मात्र तो कृतज्ञतेने लिहितो. डब्ल्यू. व्ही. रामनसारख्या प्रशिक्षकांचे ऋण मान्य करतो. यामुळे तो वाचकांशी वेगळे नाते जोडतो. ज्यांना या खेळात नाव कमवायचे आहे, त्यांनी वाचायलाच हवे असे हे पुस्तक. ज्यांना ‘ऑफ-स्पिनर’ व्हायचे आहे, त्यांनाही ते खूप काही शिकवून जाईल. पुस्तकातून अश्विनच्या मैदानात असताना आणि मैदानाबाहेरच्या वागण्यातून मनाची जडणघडण कशी आहे हे कळते. त्याचा विचारी, स्वतःची मते स्पष्टपणे मांडण्याचा स्वभाव जाणवतो. त्याबरोबरच मोठा खेळाडू बनण्यासाठी कोणते गुण आवश्यक असतात हेही उमगते. आपली फलंदाजी कशी सुधारत गेली, (त्याने कसोटीत सहा शतके केली आहेत आणि मोक्याच्या वेळी फलंदाजी करून संघाला विजयी केले आहे) याचे निवेदनही त्याने केले आहे. ''आपल्या हीरोंची दुरूनच पूजा करा, पण ज्यावेळी त्यांच्या जवळ जाल तेव्हा त्यांच्यातील एक बनण्याचा प्रयत्न करा,'' असेही सहजपणे सांगतो. राहुल द्रविडची प्रस्तावना पुस्तकाचे मोल वाढविणारी आहे.
पुस्तकः आय हॅव द स्ट्रीट्स
लेखक : रविचंद्रन अश्विन आणि सिद्धार्थ मोंगा;
प्रकाशक : पेंग्विन;
पाने : २००;किंमत : ५९९ रुपये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.