मागील पाच वर्षात विदर्भातील कर्मयोगी फाउंडेशनने संत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांचे विचार जपत तब्बल २१७ गावांमध्ये ४५ हून अधिक विविध उपक्रम राबवून केलेले मानवतावादी कार्य थक्क करणारे आहे.
- देवीदास लाखे, नागपूर
पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील इसापूर या छोट्याशा गावातून २००२ मध्ये एक तरुण बुटीबोरीत आला. खासगी कंपनीत काम करीत आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करीत असतानाच वडिलांची साथ सुटली. लहान लहान गोष्टीसाठी करावा लागणारा संघर्ष यामुळे सामाजिक जाणिवा प्रगल्भ होत गेल्या. आपल्यासारखे जीवन अनेकांच्या वाट्याला आहे, किंबहुना कित्येक जण आपल्यापेक्षा हलाखीच्या परिस्थितीत आहेत, ही वस्तुस्थिती लक्षात आल्याने गरजू, निराधार, उपेक्षित आणि ज्यांचे कुणी नाही अशांसाठी काम करण्याचा संकल्पच त्याने केला.केवळ बोलून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीवरच भर द्यायचा, हेसुद्धा सुरवातीलाच ठरवले. मार्ग गवसल्याने अल्पावधीतच सत्य, सातत्य, समर्पण आणि शिस्त या चतुःसूत्रीवर चालणारी, स्वतःच्या महिनाभराच्या मिळकतीतून एक दिवसाचा पगार गरजूंसाठी काढणारी २४ जणांची टीम कर्मयोगी फाउंडेशनच्या कर्तव्यरूपी वटवृक्षाखाली एकत्र आणली. असे कर्ते व्यक्तिमत्त्व म्हणजे पंकज ठाकरे.
‘लोकसेवा’ हेच कर्मयोगीचे ब्रीदवाक्य आहे. नवरात्रोत्सवात देवीची साडीचोळीने ओटी भरली जाते. परंतु प्रत्यक्षात या साडीचोळीची ज्यांना गरज आहे अशा विधवा, निराधार, गरजू महिलांना कर्मयोगी फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी साडीचोळीची भेट दिली जाते. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, शालेय साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदतीचा हात असे अनेक उपक्रम कर्मयोगीच्या माध्यमातून राबविले जातात. या ध्येयवेड्या तरुणाने आदर्श ग्राम निर्मितीसाठी ब्राह्मणी गावाची निवड केली. सहकाऱ्यांसह केलेल्या श्रमदानातून गावात नंदनवन फुलवले. २०१९ मध्ये केंद्राच्या स्वच्छशक्ती पुरस्कारासाठी देशभरातून जी १२ गावे निवडली गेली त्यात ब्राह्मणीचा क्रमांक लागला. कोरोना काळात जिवाची पर्वा न करता सवंगाड्यांना सोबत घेऊन दररोज ३०० लोकांना ७१ दिवस अन्नदान, गोरगरिबांना ५१ क्विंटल अन्नधान्य वाटप, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी चहा, फराळ व जेवणाची व्यवस्था करण्यासोबत अस्थी उचलण्याचे कार्य करण्यात आले.
विधवाताईंच्या मुलींचे शिक्षण थांबू नये म्हणून ३०२ विधवाताईंच्या मुलींना सायकल वाटप, एकल महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी १२८ शिलाई मशिन वाटप, वृद्ध मंडळींप्रती कृतज्ञता जपत १९९ गावांतील १० हजारांहून अधिक ज्येष्ठांना काठीचे वाटप, हजारो लोकांची नेत्र तपासणी करून चष्म्यांचे वाटप एवढेच नव्हे तर १०४ गावांमध्ये घरोघरी जाऊन प्रेमरूपी अभियान राबवीत त्यांचे सुख-दुःख जाणून घेत अनेकांना शक्य ती मदत केली. अल्पभूधारक शेतकरी, विधवाताईंच्या मुलींना शिक्षणासाठी व लग्नासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत, विधवाताईंसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करून परिवर्तनाची नांदी ‘कर्मयोगी’ने दिली. फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या लोकांना छत्री वाटप, कामगारांच्या मुलींसाठी बुटीबोरीत विविध सुविधांनी सुसज्ज अभ्यासिका सुरू केली.
दरवर्षी १ मे या कामगार दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, गरीब मुलींना शिक्षणासाठी मदत, अन्नदान करून प्रत्यक्ष कृतीतून हा दिवस साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त डिसेंबर महिना ‘सेवामास’ म्हणून साजरा केला जातो. या ३१ दिवसांत ३१ गावांत ३८ कार्यक्रम घेऊन एक आदर्शच कर्मयोगीने समाजासमोर ठेवला. गणपती उत्सवात आई-वडिलांची सेवा करणाऱ्या मुलांचा सत्कार, संयुक्त कुटुंब पद्धती जपणाऱ्या कुटुंबीयांचा सत्कार, उत्तुंग यश मिळविणाऱ्यांचा सन्मानित करीत प्रत्यक्ष कृतीतून गणेशोत्सव साजरा केला जातो. गावागावांत श्रमदान, ग्रामस्वच्छता सप्ताह, रस्त्यांचे खड्डे बुजविण्यापासून नदीघाट, मोक्षधाम स्वच्छता, वृक्षारोपण, प्रेमाची वागणूक देत लोकांच्या मदतीला मोठ्या प्रमाणात धावून जाणे असे अनेक उपक्रम पंकज ठाकरे ‘कर्मयोगी फाउंडेशन’मार्फत राबवितात.
निर्माण केली ओळख
ग्रामीण भागात कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, गरीब मुलीचे शिक्षण व लग्न पैशाअभावी थांबू नये, कोणत्याही माणसाचा जीव पैसा, उपचाराअभावी जाऊ नये अशी व्यवस्था उभारण्याचा तसेच गाव अन् गाव स्वच्छ सुंदर व समृद्ध करण्याचा कर्मयोगींचा प्रयत्न आहे. आपल्या कृतिशील कार्यातून लोकांच्या मनावर राज्य करणारे, प्रभावी वक्तृत्व व गोरगरिबांच्या भल्यासाठी तळमळीने कार्य करणारे कर्मयोगीचे संस्थापक, अध्यक्ष पंकज ठाकरे यांनी ‘जे बोलतो ते करून दाखवितो’ ही प्रामाणिक ओळख मनामनांत निर्माण केली.
प्रेरणादायी हातांची गाथा
माणूस उभा राहतो तो परस्परांच्या प्रेरणांतून. लढणारे हात संकटात सापडलेल्यांना प्रेरणा आणि जिद्द देतात, प्रसंगी मार्गही दाखवितात. अशाच काही लढवय्यांच्या प्रेरणादायी कथा आपल्यासमोर सादर करत आहोत. तुमच्या शेजारी असेच लढणारे लोक असतील तर त्यांची संघर्षगाथा आम्हाला पाठवा. यासाठी फक्त एकच करायचे आहे. क्यूआरकोड स्कॅन करून किंवा नावासह editor.pune@esakal.com या मेलवर तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर माहिती पाठवावी. निवडक संघर्षगाथांना आम्ही प्रसिद्धी देऊ.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.