आयत्या पिठावर रेघोट्या

नावीन्याचा ध्यास घेऊन अद्वितीय असे संशोधन करणे, नवनवीन विद्याशाखांना जन्माला घालणारे, नवी पहाट दाखवणारे संशोधन रोडावत असल्याचे धक्कादायक निष्कर्ष हाती आले आहेत.
recently published study concluded that rate of innovative research has declined drastically
recently published study concluded that rate of innovative research has declined drasticallysakal
Updated on
Summary

नावीन्याचा ध्यास घेऊन अद्वितीय असे संशोधन करणे, नवनवीन विद्याशाखांना जन्माला घालणारे, नवी पहाट दाखवणारे संशोधन रोडावत असल्याचे धक्कादायक निष्कर्ष हाती आले आहेत.

नावीन्याचा ध्यास घेऊन अद्वितीय असे संशोधन करणे, नवनवीन विद्याशाखांना जन्माला घालणारे, नवी पहाट दाखवणारे संशोधन रोडावत असल्याचे धक्कादायक निष्कर्ष हाती आले आहेत.

त्याची कारणमीमांसा करताना, पदोन्नतीसाठी संशोधकांवर शोधनिबंध सादर करणे, संशोधकांचे घटलेले वाचन तसेच मोठ्या समूहात काम करताना नावीन्याबाबतची उदासीनता अशा बाबी निदर्शनाला आल्या आहेत.

वि ज्ञानविषयक संशोधन करताना अनेकजण मळलेल्या वाटेने जातात. जे संशोधन चालू आहे तेच काहीसे पुढे नेतात. आहे तेच बरोबर असल्याचे सिद्ध करणे किंवा पूर्वीच्याच संशोधनाची री ओढणे अशातच शास्त्रज्ञ रमलेले असतात.

काही शास्त्रज्ञ प्रचलित सिद्धांतास नावीन्यपूर्ण संशोधनाने आव्हान देतात. प्रचलित धारणा, समज खोडून काढतात (कोपर्निकसपूर्वी पृथ्वीकेंद्रित विश्वाची धारणा होती ती कोपर्निकसनी बदलून टाकली.), संशोधनाच्या नव्या वाटा धुंडाळतात.

विज्ञानात नवी शाखा उदयास आणतात (क्वान्टम मेकॅनिक्स -पुंज यांत्रिकी), एखादे संशोधन कित्येक वर्षांनी पुढे नेऊन ठेवतात (पॉलीमरेज चेन रिअॅक्शन टेक्निक -पीसीआर तंत्र). अशा नावीन्यपूर्ण संशोधनाचे प्रमाण कमालीचे घटलेले आहे, असा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संशोधनाचा निष्कर्ष आहे.

पूर्वीच्याच संशोधन विषयावर अवलंबून असलेले एकाच दिशेने जाणारे संशोधन, अर्थात शोधनिबंध आणि स्वामीत्वहक्क (पेटंट्स, एकस्वे) मोठ्या प्रमाणात वाढत आहेत; याउलट नव्या वाटा धुंडाळणारे संशोधन आणि एकस्वे यांची संख्या रोडावत आहे. सध्या दिवसाला सुमारे तीन हजार या गतीने वर्षाला सुमारे दहा लाख शोधनिबंध प्रसिद्ध होतात.

यातील बहुतेक संशोधने आयत्या पिठावर रेघोट्या मारणारीच आहेत, असे हा शोधनिबंध सांगू पाहतो. ‘नेचर’ या प्रख्यात विज्ञान शोधपत्रिकेच्या ४ जानेवारीच्या अंकात अशा प्रकारच्या संशोधनाची मीमांसा करणारा अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी मायकेल पार्क, त्याच विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक रसेल फंक व अॅरिझोना विद्यापीठातील एरिन लिहे यांचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

सीडी निर्देशांकाची मोजपट्टी

या संशोधकांनी शोधनिबंधातील नावीन्य व स्वामित्व हक्कामागील नावीन्यपूर्ण संशोधन हरवत आहे या निष्कर्षास येण्यापूर्वी १९४५-२०१० या कालावधीतील साडेचार कोटी शोधनिबंध आणि ३९ लाख एकस्वे यांचा अभ्यास आणि विश्लेषण केले. हे संशोधन करताना त्यांनी एक ‘कन्सॉलिडेटींग, डिस्रप्टिव्ह इंडेक्स’ (सीडी निर्देशांक) वापरला आहे.

या निर्देशांकावरून एखादा शोधनिबंध चाकोरीबाहेरील संशोधनांती लिहिला आहे किंवा पारंपरिक संशोधनाची री ओढणारा आहे किंवा एखाद्या एकस्वामागे चाकोरीबाहेरील संशोधन आहे ते कळू शकते. यातील नवीन वाटा चोखाळणाऱ्या किंवा क्रांतीकारी संशोधनास त्यांनी ‘डिस्रप्टिव्ह’ संशोधन शब्द वापरला आहे.

जे संशोधन पूर्वीच्याच संशोधनावर अवलंबून असते त्यास ‘कन्सॉलिडेटींग’ संशोधन असा शब्द वापरला आहे. यापैकी डिस्रप्टिव्ह शब्दाचा अर्थ व्यत्ययकारी आणि कन्सॉलिडेटींगचा अर्थ आहे बळकटी आणणे. या दोन शब्दांवरून त्यांनी ‘सीडी निर्देशांक’ नामयोजना केली आहे.

ज्या शोधनिबंधात संदर्भ म्हणून पूर्वीच्या शोधनिबंधाचा उल्लेख केला जातो, ज्या शोधनिबंधांत संदर्भ म्हणून पूर्वीच्या अनेक शोधनिबंधांचा उल्लेख असतो त्या शोधनिबंधांचा सीडी निर्देशांक कमी असतो.

पूर्वीच्याच संशोधनाची री ओढणारे हे संशोधन असते, ते नावीन्यपूर्ण असत नाही. शोधनिबंधांना हे शास्त्रज्ञ कन्सॉलिडेटींग किंवा ‘चाकोरीबद्ध शोधनिबंध’ म्हणतात. उदा. जनुकीय बदल केलेल्या सोयाबीनसाठी एकस्व मिळविणे, इलेक्ट्रॉन कणाचे स्वरूप विशद करणारा शोधनिबंध.

याउलट जो शोधनिबंध भविष्यातील अनेक शोधनिबंधांमध्ये संदर्भ म्हणून उल्लेखला जातो, ज्या शोधनिबंधांत संदर्भ म्हणून पूर्वीचे शोधनिबंध कमी प्रमाणात वापरले जातात त्यांचा सीडी निर्देशांक जास्त असतो. त्यांना हे शास्त्रज्ञ ‘डिस्रप्टिव्ह’ किंवा व्यत्ययकारी असे म्हणतात.

यातील संशोधन नावीन्यपूर्ण व नवोन्मेषी असते. उदा. फ्रान्सिस क्रिक व जेम्स वॅटसन यांचा १९५३चा डिऑक्सी रायबोन्युक्लिक अॅसिडच्या (डीएनए) पिरगाळलेल्या दुहेरी साखळी (डबल हेलिक्स) स्वरूपातील रचना विशद करणारा शोधनिबंध.

अशी संशोधने क्रांतिकारी किंवा डिस्रप्टिव्ह आहेत. सध्या अशा संशोधनांची वानवा आहे. अशा संशोधनांचा सीडी निर्देशांक जास्त असतो. असे संशोधन प्रस्थापित समजांना मागे टाकून आहे त्या संशोधनस्थितीत व्यत्यय आणतात, नवीनच क्षेत्र निर्माण करतात.

या संशोधकांनी उच्च दर्जाची जी शोधनियतकालिके समजली जातात त्यातील शोधनिबंध आणि नोबेल पारितोषिक विजेते शोधनिबंधांचा दर्जा घसरला नसेल किंवा किमान घसरला असेल असे गृहीत धरून त्यांचाही अभ्यास केला.

त्यांना आढळले की अशा शोधनिबंधांचाही दर्जा घसरत आहे, नावीन्यही घटत आहे. फरक एवढाच की अशा शोधनियतकालिकांमधील सध्याची संशोधने नवाचारात किंवा नावीन्यामध्ये कमी पडत असली तरी अतिउच्च दर्जाची नावीन्यता असणाऱ्या शोधनिबंधांची संख्या स्थिर आहे. खरे तर चाकोरीबद्ध व व्यत्ययकारी अशी दोन्ही प्रकारची संशोधने वैज्ञानिक प्रगतीसाठी आवश्यक असतात.

परंतु अलीकडील शास्त्रज्ञांचा ओघ चाकोरीबद्ध संशोधनाकडे अधिक आहे. संशोधनाच्या आरोग्यासाठी हे योग्य नाही, असेही हे संशोधक म्हणतात. या शास्त्रज्ञांनी वापरलेल्या निर्देशांकावरून असे लक्षात येते की, वैज्ञानिक संशोधनाच्या तुलनेत सामाजिक शास्त्रांमध्ये नावीन्यपूर्ण व दर्जेदार संशोधनांचा खूप मोठा अभाव आहे.

अलीकडील शास्त्रज्ञांचा कल अशा संशोधानांकडे का असावा याचीही कारणमीमांसा काही गृहितकांच्या सहाय्याने केली. त्यातील गृहितके म्हणजे सहजरीत्या हाताला लागणारे फळ तोडण्याकडे सर्वांचा ओढा असतो.

ज्ञानवृक्षाच्या सर्वात खालच्या फांदीला लागलेले फळ सहजरीत्या तोडता येते. अलीकडे अनेक मोठे संशोधन प्रकल्प चालविले जाताहेत. त्यामध्ये हजारो शास्त्रज्ञ असतात. पार्क व त्यांच्या सहकाऱ्यांनी अशा मोठ्या प्रकल्पातील संशोधनातील नावीन्य व दर्जा यांचा अभ्यास केला. त्यांना आढळले की शास्त्रज्ञाच्या लहान समूहाकडून अधिक नावीन्यपूर्ण संशोधन होत आहे.

नावीन्यपूर्ण किंवा नवोन्मेषी (डिस्रप्टिव्ह) संशोधन का घटत आहे याचाही या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. त्यांच्यानुसार शैक्षणिक क्षेत्रामध्ये संशोधन, शोधनिबंधांची संख्या पदोन्नतीसाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याने अनेक संशोधक दर्जाची, नावीन्यतेची फिकीर न करता शोधनिबंधामागून शोधनिबंध लिहितात.

विद्यापीठांमध्ये संशोधनासाठी विशिष्ट निधी पुरविला जातो, त्यामुळे संशोधनांची (शोधनिबंधांची आणि एकस्वांची) संख्या भरमसाठ वाढते; तितकेच नावीन्यही हरवत आहे. संशोधकांवर संशोधन करून शोधनिबंध लिहिण्यासाठी दबाव आणला जातो. अर्थातच त्यामुळे दर्जा व नावीन्यतेचा बळी जातो.

यावर उपाय म्हणजे संशोधकांना शोधनिबंधांची संख्या महत्त्वाची नसून दर्जा, त्यातील नावीन्य महत्त्वाचे असते, असे त्यांना निधी पुरविणाऱ्या संस्थांनी बजावले पाहिजे. संशोधकांनी मोठ्या प्रमाणात वाचन करावे, विस्तारणाऱ्या ज्ञानाच्या अवकाशात कालानुरूप राहण्यासाठी संशोधकांनी अधिक वेळ दिला पाहिजे.

एखाद्या दुसऱ्या प्रकल्पावरून संशोधकांचा, संशोधनाचा दर्जा निश्चित करण्याऐवजी दीर्घ काळ चालणाऱ्या प्रकल्पांना महत्त्व द्यावे. १८९९मध्ये अमेरिकेचे कमिशनर ऑफ पेटंट्स, चार्ल्स ड्युएल म्हणाले होते, ‘‘ज्या गोष्टींचा शोध घेणे शक्य आहे त्या गोष्टी शोधून झाल्या आहेत. शोधण्यासारखे नवीन काही राहिलेले नाही.’’

परंतु त्यानंतरच खूप मोठे आणि तुलनेने नावीन्यपूर्ण शोध लागले. विज्ञानाच्या अंताचे भाकीत खोटे ठरले. परंतु पार्क आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याबाबतची धोक्याची घंटा वाजविली आहे. सध्याचे संशोधन विज्ञानास अंताकडे घेऊन चालले नसले तरी मंदावत आहे आणि तेच खूप चिंताजनक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()