ब्राझीलमध्ये नुकत्याच झालेल्या ‘जी-२० यंग आंत्रेप्रिन्युअर्स अलायन्स’ परिषदेत सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार पुण्यातील अलाईव्ह रिजनरेटिव्ह वेलनेस या वैद्यकीय क्षेत्रातील स्टार्ट-अपचे संस्थापक रिषी तांदूळवाडकर यांनी पटकावला. या परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. या वर्षी या परिषदेत जगभरातील पाचशे तरुण उद्योजक सहभागी झाले होते, त्यात रिषी तांदूळवाडकर यांनी प्रथम पुरस्कार मिळवत, वैद्यकीय क्षेत्रातील नावीन्यपूर्ण स्टार्ट-अपमध्येही भारत आघाडीवर असल्याचे जगाला दाखवून दिले.
पुण्याचे नावही जगाच्या नकाशावर झळकवले. जगभरातील आरोग्यसेवा क्षेत्रामधील हजारो प्रतिनिधी या परिषदेला आले होते. सौदी अरेबियाचे राजपुत्र फहाद एम अल सौद यांच्यासह दक्षिण आफ्रिकेचे ब्राझीलमधील राजदूत एच.ई. वुसी माविम्बेल यांच्यासह ‘युरोपियन कॉन्फडरेशन’च्या सदस्यांचाही परिषदेत सहभाग होता. हे यश भारतीय बुद्धिमत्ता, उद्योजकता यांचे महत्त्व अधोरेखित करते. भारत स्टार्ट-अप क्षेत्रात जागतिक केंद्र बनण्याकडे वाटचाल करत आहे, त्यात अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. वैद्यकीय क्षेत्राचा वाटाही त्यात आहे. देश निरोगी असेल, तर त्याचा भविष्यकाळही उज्ज्वल व मजबूत असतो. त्यामुळे सर्वांना किफायतशीर दरात उपचार उपलब्ध करण्यासाठी; तसेच निरामय आरोग्यासाठी आवश्यक सुविधा मिळण्यासाठी सरकारही प्रयत्नरत आहे. या वाटचालीत अशा युवा उद्योजकांच्या नावीन्यपूर्ण आणि अत्याधुनिक स्टार्ट-अपचे हे जागतिक यश मोलाचे आहे. यामुळे सर्वांना अत्याधुनिक उपचार देशातच आणि किफायतशीर मिळतील, संशोधनालाही चालना मिळेल. वैद्यकीय संशोधन, उत्पादन आणि सेवा क्षेत्रात भारताचे महत्त्व जागतिक स्तरावर आणखी ठाशीव होण्यास हातभार लागेल. रोजगार निर्मिती, परकी गुंतवणूक, प्रगत देशांशी या क्षेत्रातील सहकार्यही वाढण्यास मदत होईल.
या पार्श्वभूमीवर, रिषी तांदूळवाडकर यांचे यश निश्चितच उल्लेखनीय आहे. त्यांनी २०१९ मध्ये अलाईव्ह रिजनरेटिव्ह वेलनेस या स्टार्ट अपची पुण्यात स्थापना केली. आपल्या शरीरातील पेशींच्या आश्चर्यकारक पुनर्निमाण शक्तीचा वापर करून निरोगी, सशक्त दीर्घायुष्यासाठी प्रत्येक व्यक्तीस मदत करणे ही यामागची मुख्य संकल्पना आहे. या स्टार्ट-अपद्वारे त्यांनी अत्याधुनिक उपचार पद्धती विकसित केली आहे. यामुळे सेल फ्रॅक्शन थेरपीद्वारे आपल्या शरारीची झिज होण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी करून वंध्यत्व, मधुमेह, पार्किन्सन अशा आजारांशी लढण्याची क्षमता वाढवणे शक्य झाले आहे. येथे व्यक्तीच्या गरजेनुसार ‘आयव्ही वेलनेस थेरपी’ही उपलब्ध आहे. त्यामुळे दैनंदिन जीवन अधिक सक्षमपणे जगणे शक्य आहे. ‘अलाईव्ह’मध्ये ४५ वयाच्या महिलेने जगातील पहिल्या स्टेम सेल बाळाला जन्म दिला असून, आतापर्यंत ४० ते ४५ बाळांचा जन्म या अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे झाला आहे. मातृत्वापासून वंचित अनेक महिलांना यामुळे मातृत्वाचा आनंद मिळाला आहे; तसेच पक्षाघाताने विकलांग झालेल्या मुलाला ऑटोलॉगस सेल फ्रॅक्शन (ACF) थेरपीद्वारे नवजीवन दिले आहे.
या अत्याधुनिक उपचार पद्धतीचा वापर करून आरोग्य दीर्घकाळ राखता येऊ शकेल आणि दीर्घायुष्य अधिक निरोगीपणे जगता येईल. यामुळे देश अधिक आरोग्यदायी आणि समृद्ध होईल. दुर्धर रोगांवर या पद्धतीने उपचार करता येऊ शकतील. त्यासाठी ‘अलाईव्ह’तर्फे संशोधन सुरू आहे. जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या विविध आजारांवरील उपचाराबाबत त्यांचे काम सुरू असून,आरोग्याबाबत जागरूकता करणे, या अत्याधुनिक उपचार पद्धतीबाबत लोकांना माहिती देणे यासाठी रिषी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या नाविन्यपूर्ण उद्योजकतेची दखल जागतिक पातळीवर घेतली गेल्याने देशाचा बहुमानच झाला आहे. मानवी आरोग्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या एका नव्या उद्योगक्षेत्राची दारे यानिमित्ताने खुली झाली आहेत. यामुळे शाश्वत, रुग्ण-केंद्रित उपचार पद्धतीमध्ये, आरोग्यसेवेच्या मापदंडामध्ये बदल घडवून आणण्यात रिषी तांदुळवाडकर यांच्यासारख्या अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल, यात शंका नाही. भविष्यात आरोग्य सेवा क्षेत्रात अमूलाग्र बदल होण्यासाठी अशा स्टार्ट-अपना चालना मिळणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.