हौस ऑफ बांबू

डॉ. संगीता बर्वेंचं काम त्या तोडीचं आहे
डॉ. संगीता बर्वेंचं
डॉ. संगीता बर्वेंचं sakal
Updated on

न अस्कार! लहानपणापास्नं मी डायरी लिहितेय. खणात बऱ्याच डायऱ्या साठल्या आहेत. नेमका आकडा नाहीच्च सांगणार! पूर्वी मी शाळेच्या वह्यांची कोरी पानं गोळा करुन त्याची वेगळी वही करायचे. (कोरी पानं बरीच असायची…) त्या वहीवर छानदार अक्षरात तारीखबिरीख घालून दैनंदिनी लिहायचे. पुढे त्या वह्या घरच्यांच्या हाती लागल्या…जाऊ दे.

आमच्या अत्यंत लाडक्या लेखिका आणि बालमैत्रीण डॉ. संगीता बर्वे यांच्या ‘पियुची वही’ला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, तेव्हा अचानक मला माझ्या डायऱ्या आठवल्या. डॉ. संगीता बर्वेंची ‘पियुची वही‘ हे अतिगोड पुस्तक आहे. सुट्टीच्या काळात बाहेर कुठे जायला न मिळालेली चिमुकली पियु एक खिडकी रंगवते, आणि मग त्या खिडकीतून तिला नवं विश्वच गवसतं. नवं आकाश, नवे ढग, नवे पक्षी,

नवी झाडं, नवा भवताल…तिचं स्वत:चं नवं नवं विश्व! मज्जा!! ‘पियुची वही’ वाचेपर्यंत मी तशी मोठी झाल्ये होत्ये. पण तरीही कित्ती एंजॉय केलं. पियुची वही वाचून काही चिमुकल्यांनी डायरी लिहायला सुरवात केली, असं कुठंतरी वाचलं होतं. माझी डायरी वाचून घरच्यांनी त्या जाळल्या!! छे, ते सगळं जाऊ दे.

डॉ. संगीता बर्वे या आयुर्वेदिक आहारतज्ज्ञ आहेत. आयुर्वेदिक आहारतज्ज्ञ म्हटलं, की कुणालाही हिंग्वाष्टक चूर्ण आठवेल. पण बर्वेबाई तशा नाहीत. वाटतं की पटकन पर्समधून चॉकलेट काढून देतील!! (पण देत नाहीत!) मुलांसाठी त्यांनी कित्तीतरी गंमतगाणी, कविता लिहिल्या. गोष्टी लिहिल्या. सुनीती नामजोशी यांच्या इंग्रजी पुस्तकाचा त्यांनी ‘अदितीची साहसी सफर’नावाचा अनुवाद केला आहे. तो मुळातून वाचा. अप्रतिम अनुवाद आहे. बालसाहित्याचा अनुवाद हा वाटतो तितका सोपा प्रकार नाही. आधीच आपल्या मराठीत बालसाहित्याची वानवा आहे. वास्तविक ज्या भाषेच्या साहित्यात बालवाङमय समृद्ध असतं, ती भाषा जग जिंकते. आमच्या लहानपणी भा. रा. भागवत वगैरे लेखक मंडळी होती. त्यांनीही मुद्दाम ज्यूल व्हर्नच्या विज्ञान कादंबऱ्यांचे मराठी अनुवाद केले होते. शिवाय स्वतंत्र ‘फास्टर फेणे’ लिहिलाच होता. डॉ. संगीता बर्वेंचं काम त्या तोडीचं आहे, तोडीचं कशाला? एक पाऊल पुढे टाकणारं आहे. माझ्या डायऱ्या घरच्यांनी बंबात घातल्या नसत्या तर…जाऊ दे, झालं!!

‘पियुची वही’ला मिळालेलं यश म्हणूनच आशादायक वाटतं. झाड आजोबा, गंमत झाली भारी, उजेडाचा गाव, अशी कितीतरी पुस्तकं त्यांनी मुलांसाठी लिहिली आहेत. डॉ. बर्वेबाईंच्या साहित्य अकादमी पुरस्कारानंतर काही बालसाहित्यकार निर्माण होतील, अशी अपेक्षा ठेवू या का? एकट्या बर्वेबाईंनी तरी किती लिहायचं? माझ्या डायऱ्या घरच्यांनी जाळल्यानंतर पुढे बराच काळ मी डायरी लिहिणंच सोडलं. नाहीतर…जाऊ दे, जाऊ दे!

डॉ. संगीता बर्वे या मूळच्या बेलापूरच्या. बेलापूर म्हंजे नवी मुंबईचं नव्हे, श्रीरामपूर तालुक्यातलं बेलापूर! गाणंही घरात होतंच. माहेरचं हे वातावरण सासरी बर्व्यांच्या घरी येऊन द्विगुणित झालं. कारण सासुबाई होत्या, गेल्या जमान्यातल्या थोर गायिका मालती पांडे-बर्वे!! ‘लपविलास तू हिरवा चाफा…’आठवलं ना? ‘त्या तिथे पलिकडे तिकडे माझिया प्रियेचे झोपडे’, ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम…’किती तरी गाणी घरात, माजघरात नांदत होती…

सुवर्णभस्म, हिरडा, बेहडा, गुळवेल, त्रिभुवनकीर्ती, गुग्गुळ असली नावं असलेल्या विश्वात राहून डॉ. बर्वेंनी मनातली पियु जपली,हेच मला थोर वाटतं. त्यांच्या बालगीतांचे कार्यक्रम मी मोठेपणीही जाऊन बघितले, ते त्यासाठीच. डॉक्टर संगीता बर्वेंची ‘पियुची वही’ चिरायु होवो, आणि ‘सरुची वही’ बंबात गेली ती जावो! जाऊ दे ते आता…!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.