भाष्य: माध्यमांचे चौकटीबाहेरचे क्षितिज

editorial
editorial
Updated on

केवळ मालिकाच नाहीत तर चित्रपट, माहितीपट, शैक्षणिक पट यांचीही निर्मिती ही नवी  वेबमाध्यमे मोठ्या प्रमाणावर करू लागली आहेत. या निमित्ताने आता पारंपरिक वाहिन्यांना एक समांतर यंत्रणा आपल्या ज्ञान, माहिती, मनोरंजनाच्या अवकाशात स्थिरावू लागली आहे. प्रेक्षक वाढत्या संख्येने तिकडे आकृष्ट होत आहेत.

गेले वर्षभर कोरोनाचे थैमान सुरुच आहे. लघुउद्योग, पर्यटन, विमान सेवा, हॉटेल उद्योग यांना सर्वात मोठा फटका बसलेला आपण पाहात आहोत. नाट्य व्यवसायही कठीण काळातून जात आहे. चित्रपटगृहात दिसणाऱ्या मोकळ्या खुर्च्या या उद्योगाच्या विपन्नावस्थेच्या करुण कथा सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर ओ.टी.टी. -ओव्हर द टॉप म्हणजेच वेब माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या मनोरंजन क्षेत्राची भरारी थक्क करणारी आहे. गेल्या ७-८ वर्षात या व्यासपीठांची संख्या नऊवरुन ३० पर्यंत गेली आहे. इंटरनेट वापरामध्ये आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. ‘अर्न्स्ट अँड यंग’ यांच्या अहवालानुसार भारतात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ५७ कोटीपर्यंत पोहोचली आहे. यात दरवर्षी १३ टक्के वाढ अपेक्षित आहे. याचाच परिणाम म्हणून की काय २०२१मध्ये या क्षेत्रात तब्बल १९०० कोटी रुपये एवढा पैसा गुंतवला जाणार आहे. किमान ५०० नवे कार्यक्रम, काही चित्रपट यंदा फक्त वेब माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मागील वर्षी २२० मालिका /कार्यक्रम या माध्यमांमधून निर्माण केले गेले. केवळ मालिकाच नव्हे तर माहितीपटांना मिळणारा प्रतिसादही उत्साहवर्धक आहे. क्रीडाविषयक कार्यक्रमही आता मोठ्या संख्येने वेब माध्यमातून पडद्यावर दिसू लागले आहेत. ‘नेटफ्लिक्स’ या वेब व्यासपीठाने यंदा नव्या ४० मालिकांची घोषणा केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ तिप्पट आहे. क्रीडा क्षेत्रात तर विक्रमी गुंतवणूक होताना दिसते आहे. पुढील पाच वर्षात (२०२१-२५ ) तीस हजार कोटी रुपये या माध्यमात गुंतवले जाण्याची चिन्हे आहेत. 

नवे नेपथ्य, नवी आव्हाने : राज आणि नीती

नव्या पर्वाची चाहूल

वाहिन्यांवरील कार्यक्रम किरकोळ पैसे खर्च करुन डिशच्या माध्यमातून बघणाऱ्यांची संख्या आपल्याकडे प्रचंड आहे. पण आता चांगली वर्गणी भरुन, पैसे मोजून कार्यक्रम पाहणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढते आहे. मागील वर्षी सुमारे तीन कोटी प्रेक्षकांनी सव्वापाच कोटी संकेतस्थळांची वर्गणी भरली होती. यंदा वर्गणीदारांची संख्या चार कोटीपर्यंत पोहोचेल आणि सात कोटी संकेतस्थळांची वर्गणी ते भरतील, असा अंदाज आहे. हा प्रवाह मनोरंजन उद्योगात, डिजिटल माध्यमात एक नवा पायंडा पाडताना दिसतो.
गोष्ट सांगायची तर ती रंगवून सांगता आली पाहिजे, त्या गोष्टीतले सर्व चढउतार, सर्व संघर्ष, उत्कर्षबिंदू  मुक्तपणे आणि खर्चाचा बाऊ न करता मांडण्याचा अवकाश निर्मात्याला दिला तर सांगणाऱ्यालाही मजा येते आणि ऐकणाऱ्यालाही. याचे पक्के भान या क्षेत्रातील संबंधित कंपन्यांना आहे. एक दिवसात दोन-तीन भाग उरकून टाका आणि; वाहिन्यांच्या आणि प्रेक्षकांच्या गळ्यात कार्यक्रम मारा असली तडजोड इथे नाही. विशेष म्हणजे आपल्याला पाहिजे, तेव्हा हे कार्यक्रम आपण पाहू शकतो. वेब माध्यमाचे हे प्रेक्षककेंद्रित वैशिष्ट्य बहुसंख्य रसिकांना आकर्षित करत आहे.

वेब विश्वात सैर

केवळ मालिकाच नाहीत तर चित्रपट, माहितीपट, शैक्षणिक पट यांची ही निर्मिती ही वेबमाध्यमे मोठ्या प्रमाणावर करु लागली आहेत. या निमित्ताने आता पारंपरिक वाहिन्यांना एक समांतर यंत्रणा आपल्या ज्ञान, माहिती, मनोरंजनाच्या अवकाशात स्थिरावू लागली आहे. हा बदल म्हणजे एका नव्या पर्वाची चाहूलच म्हणावी लागेल. ‘दूरदर्शन’ जेव्हा एकमेव होते तेव्हा अर्थातच स्पर्धेसाठी समोर कोणी नसल्यामुळे आपल्या निर्मितीमूल्यांची काटेकोर तपासणी करण्याची गरज कधी वाटली नाही. परिणामतः या कार्यक्रमाचा दर्जा घसरत गेला. खाजगी वाहिन्या झगमगाटात सुरु झाल्या आणि अल्प कालावधीत लोकप्रियही. आता नेमके हेच आव्हान खाजगी वाहिन्यांपुढे ‘ओटीटी’ने उभे केले आहे. एकसारख्या तोंडावळ्याच्या कचकड्याच्या मालिका, चावून चोथा झालेली कथानके, प्रेक्षकांच्या भावनांना हात घालणारे तेच तेच फॉर्म्युले याचा आता प्रेक्षकांना कंटाळा येवू लागला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्यक्रम, चित्रपट आता सहज उपलब्ध होऊ लागल्यामुळे प्रेक्षक पारंपरिक मालिकेच्या जगातून काढता पाय घेऊ शकतात. विदा (डेटा) ही आता खूप कमी खर्चात उपलब्ध होत असल्यामुळे पारंपरिक प्रेक्षकांनीही या नव्या वेब विश्वात सैर करण्यास सुरवात केली आहे . केवळ हिंदीच नव्हे तर बंगाली, तमिळ,तेलगु आणि आपल्या मराठी भाषेतील कार्यक्रमही या व्यासपीठावरुन उपलब्ध आहेत,याचा सकारात्मक परिणाम होऊन, स्पर्धेच्या वातावरणामुळे या मालिका विश्वात काही चांगले बदल व्हावेत, अशी अपेक्षा आहे.

जीवनाच्या छटा टिपणारे चित्रकार

याचा अर्थ असा नव्हे की वेब मालिका सरसकटपणे उच्च दर्जाची निर्मिती करत आहेत. अनेक वेब मालिका शिवराळ भाषेत आणि असमर्थनीय हिंसाचारात लडबडलेल्या आहेत. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, याची आठवण त्यांना वारंवार करून द्यावी लागत आहे. पण एकूण या कार्यक्रमांमध्ये, भंपकपणा कमी आणि दृश्यात्मक ऐवज विपुल असतो.  केवळ प्रेक्षकांसाठीच नव्हे तर आपल्या प्रतिभावान दिग्दर्शकांसाठी,अभिनेत्यांसाठी हे वेब विश्व जागतिक स्तरावर नाव मिळवून देणारे एक उत्तम व्यासपीठ झाले आहे. ‘सॅक्रेड गेम्स’, ‘एके व्हर्सेस एके’ या मालिका जगभरात अनेक भाषेत गेल्या. नीरज पांडेची ‘स्पेशल ऑप्स’, हर्षद मेहता वर आधारित ‘स्कॅम,१९९२’, द फॅमिली मॅन, पाताळलोक, मिर्झापूर, पंचायत, आसूर या मालिका भारतीयच काय, पण परदेशातील प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरल्या आहेत. कोरोना काळात म्हणजे २०२०मध्ये मोबाईलवर ४.६ तास एवढा सरासरी वेळ भारतीयांनी घालवला. २०१९ पेक्षा हे प्रमाण ३०% नी जास्त होते. यंदाही यात वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. याचा व्यावसायिक लाभ उठवण्यासाठी ‘ओटीटी’ संकेतस्थळांनी मोबाईलसाठी खास वर्गणीच्या योजना आणल्या आहेत. जगाची बाजारपेठ १३.४ % नी वाढण्याचे संकेत देताना भारताची वेब बाजारपेठही २०२४ पर्यंत २८.५ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज ‘प्राईस वॉटर हाउस’ या आर्थिक क्षेत्रातील ख्यातनाम संस्थेने वर्तवला आहे.

यंदा वेब माध्यम घोडदौड करणार असल्याचे हे अनुमान तार्किक कसोट्यांवर आधारित असले तरी जगभरात अजूनही करमणूक क्षेत्रांवर चित्रीकरण आदी गोष्टींवर असलेली बंधने पाहता हे उद्दिष्ट साध्य होईलच, याची खात्री देता येणे अवघड आहे. पण भारतीय प्रेक्षक या नव्या पर्यायाला सकारात्मक प्रतिसाद देत आहे, हा बदल लक्षणीय आहे. २०२०च्या सर्वेक्षणानुसार आजही सर्वात आघाडीवर आहे ते यु ट्यूब हे माध्यम. महिन्यात सरासरी २६ तास प्रेक्षक यासाठी देतात. वर्गणी हा उत्पन्नाचा मोठा हिस्सा असलेल्या या व्यासपीठाच्या वर्गणीच्या उत्पन्नात यंदा ४२% एवढी घसघशीत वाढ झालेली दिसते. दूरदर्शन, खाजगी वाहिन्या हे दोन टप्पे ओलांडून ‘ओव्हर द टॉप’ हे तिसरे पर्व आपल्याकडे खऱ्या अर्थाने आघाडी घेताना दिसते आहे.
ने
टफ्लिक्सचे प्रमुख रीड हस्टिंग्ज यांना एकदा एका पत्रकाराने विचारले होते की तुमचा प्रमुख प्रतिस्पर्धी कोण आहे, त्यावर ते म्हणाले होते, ‘झोप’. यातील अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी प्रेक्षक या वेब जगताकडे किती प्रमाणात आकर्षित होत आहेत, हे वास्तवच या विधानातून अधोरेखित होते.
keshavsathaye@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.