संपादकीय : ‘समृद्धी’च्या पहाटेची आस

मुंबई-नागपूर यांना जोडणाऱ्या ‘बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा’चा पहिला टप्पा येत्या कांही दिवसांत सुरू होईल.
Samruddhi way
Samruddhi waysakal
Updated on

मुंबई-नागपूर यांना जोडणाऱ्या ‘बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा’चा पहिला टप्पा येत्या कांही दिवसांत सुरू होईल. या मार्गावरील नागपूर ते शिर्डीपर्यंतची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांतून हा मार्ग जातो. मराठवाड्याला दक्षिण व उत्तर भारताशी जोडणाऱ्या सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे कामही निम्म्याहून अधिक झाले आहे.

नागपूर-रत्नागिरी महामार्ग, तसेच इतर पालखीमार्गांची कामेही प्रगतिपथावर आहेत. काही दिवसांपासून औरंगाबाद या प्रमुख शहरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाविषयी येथील महानगरपालिकेचे प्रशासक व स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनचे सीईओ या नात्याने आस्तिककुमार पांडे यांनी कार्यवाही सुरू केली आहे.

महाराष्ट्रात विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश अत्यंत मागास समजले जातात. किंबहुना ते आहेतच. अजूनही या दोन्ही प्रदेशांत विकासाचा मोठा अनुशेष आहे. उद्योग, उच्च व तांत्रिक शिक्षण, कारखानदारी, पाण्याची उपलब्धता, आरोग्य व रस्ते सुविधांबाबतीत हे प्रदेश इतरांच्या तुलनेत मागे आहेत. राज्यस्थापनेची साठ वर्षे सरली तरी ही अवस्था आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यातील रस्त्यांची कामे मार्गी लागत आहेत, ही सुखद बाब आहे. रेल्वेच्या विकासाची गती मात्र मंदावलेली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात मराठवाड्याला भागवत कराड यांच्या रूपाने केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपद आणि रावसाहेब दानवे यांच्या रूपाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रिपद लाभले आहे. केंद्रात कॉँग्रेसची सत्ता असताना एकाच वेळी दोन केंद्रीय मंत्रिपदे औरंगाबाद व जालनेकरांना मिळाली नव्हती. मात्र आता उभयतांच्या रूपाने रस्ते व रेल्वेचे जाळे बळकट होऊ शकेल, अशी आशा आहे. परवाच रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी जालन्याला पीटलाइन मंजूर केल्याची घोषणा केली होती. मात्र ती करताना औरंगाबादच्या मागणीकडे मंत्र्यांचे दुर्लक्ष झाले आहे.

औरंगाबादचे राज्याच्या पर्यटन, सामाजिक व राजकीय नकाशावरचे महत्त्व लक्षात घेता आणखी एक पीटलाइन औरंगाबादला होणे गरजेचे असल्याचे मत रेल्वे क्षेत्रातील अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. लातूर येथेही अशाच स्वरूपाच्या पीटलाइनची मागणी आहे. या पीटलाइन्स तयार झाल्या तर नांदेड, पूर्णाबरोबरच तीन पीटलाइन्स मराठवाड्याला मिळतील. औरंगाबाद व जालन्याच्या पीटलाइन्समुळे मनमाडवरचा ताण कमी होईल, तसेच मराठवाड्याला लांब पल्ल्यांच्या गाड्या मिळू शकतील.

त्याचा लाभ प्रवाशांना होईल. त्याशिवाय या भागातील जिल्ह्याजिल्ह्यांच्याही वेगवेगळ्या मागण्या आहेत, ज्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. याबरोबरच मराठवाड्यात असलेला मात्र स्थानिक प्रवाशांना फारसा उपयोग नसलेला दक्षिण मध्य रेल्वेचा नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडावा, अशी रेल्वे संघटनांची खूप वर्षांपासूनची मागणी आहे. ती यंदाच्या अर्थसंकल्पात फलद्रूप व्हावी, अशी अपेक्षा आहे.

औरंगाबादला शेंद्रा पंचतारांकित, ऑरिक औद्योगिक सिटी, वाळूज व इतर औद्योगिक वसाहतींचे जाळे असल्याने इथे पीटलाइन अधिक गरजेची आहे. त्या दृष्टीने कराड व दानवे मंत्रिद्वय प्रयत्नशील आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन मराठवाड्यातून नेण्याची मागणी केली आहे, तसेच चव्हाण यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जालना ते नांदेड असा जोडसमृद्धी महामार्गही मंजूर करवून घेतला आहे. त्याच्या भूसंपादनाची कामे सध्या सुरू आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर मराठवाड्यातील तब्बल पाच जिल्हे समृद्धी महामार्गाशी जोडले जातील.

मुंबई, नागपूर, पुणे, नाशिकपाठोपाठ औरंगाबाद शहरातही मेट्रोच्या मागणीने उचल खाल्ली आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड, महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडे यांच्या प्रयत्नातून त्यासाठीचा कार्यारंभ आदेश नुकताच देण्यात आला. पहिल्या टप्प्यात वाळूज ते शेंद्रा डीएमआयसीपर्यंत मेट्रो व उड्डाणपुलाचा डीपीआर तयार करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनने महाराष्ट्र रेल्वे कॉर्पोरेशनची नियुक्तीही केली आहे. हा डीपीआर नऊ महिन्यांत पूर्ण होणार आहे. ही सर्व कामे खरोखर मार्गी लागली तर रस्ते व रेल्वेच्या पायाभूत सुविधांची पहाट झाली आहे, असे म्हणावे लागेल. राज्याच्या समग्र विकासाला गतिमान करणारीच ती बाब असेल. ती पहाट लवकरात लवकर उजाडो, हीच अपेक्षा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.