राष्ट्रहिताच्या नजरेतून : त्यांना जातीयतेचा केक खाऊ द्या

२००५ मध्ये नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या पंधरा वर्षांच्या मतपेढीच्या राजकारणाला धक्का देत विजय संपादन केला.
Yogi Adityanath
Yogi Adityanath
Updated on

उत्तरप्रदेशचा बेरोजगार युवक नाराज असताना योगी आदित्यनाथ यांनी ‘जिना हवेत की सरदार पटेल ?’ असा पर्याय ठेवला. या नेत्यांच्या मृत्यूला सात दशकांचा काळ लोटला असताना उपाशीपोटी जनतेला ‘ब्रेड नसेल तर केक खा’ असे सांगण्याचा हा प्रकार आहे.

शुक्रवारी सकाळी योगी आदित्यनाथ यांनी ‘वे जिन्ना के उपासक है, हम सरदार पटेल के पुजारी है. उनको पाकिस्तान प्यारा है, हम मा भारती पर जान न्योछावर करते है.’ असे ट्विट केले. याला तिरस्कार म्हणा की अन्य काही पण या भावनेचा राजकीय अर्थ काढला तर तो अधिक गंभीर, खोल असू शकतो. (Sakal Editorial Article)

साधारणपणे २००४ पासून हिंदी पट्ट्यात सुरू झालेल्या घुसळणीत महत्त्वाकांक्षी भारताचे पहिले संकेत मिळणे सुरू झाले. २००५ मध्ये नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या पंधरा वर्षांच्या मतपेढीच्या राजकारणाला धक्का देत विजय संपादन केला. बिहारच्या युवकांनी त्यांना भरभरून कौल दिला. आता नितीशकुमार यांच्याकडून उत्तम भविष्याची अपेक्षा होती. यात दणदणीत विजय संपादन केला आणि तेव्हापासून ते सत्तेत आहेत. २००९ पर्यंत यूपीए केंद्रात सत्तेत आले. या आघाडीला २००४ च्या तुलनेत अधिक जागा मिळाल्याने आता महत्त्वाकांक्षी भारताच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात होईल अशी खात्री होती. जुन्या तक्रारींच्या राजकारणाची जागा आता महत्त्वाकांक्षी भारताच्या ध्येयाने घेतली असल्याचे तेव्हा म्हटले गेले.

भारतातील तरुणांना आणखी काय हवे होते? नंतरच्या काळात देशाच्या विकासाने चांगला वेग पकडला आणि त्याची फळे मिळण्याची पृष्ठभूमी तयार झाली. याचाच प्रतिध्वनी नरेंद्र मोदी यांना २०१४ मध्ये मिळालेल्या विजयात उमटताना दिसून आला. आशावादाच्या लाटेवर स्वार झालेल्या युवकांची ‘यूपीए-२’ काळात निराशा झाल्याने त्यांना मोदी यांचा विकास, रोजगार आणि भरभराटीचा विचार भावला. त्यांनी पाकिस्तान वा मुस्लिमांच्या विरोधात मतदान केले नव्हते. यानंतर मात्र आपला भूतकाळाच्या दिशेने उलट प्रवास सुरू झाला.

यूपी व बिहारच्या ज्या युवकांनी समृद्ध भारताचे स्वप्न बघितले होते, तेच रोजगाराच्या मुद्द्यावरून शासकीय मालमत्तेची विशेषतः रेल्वे डब्यांची होळी करीत आहेत. निवडणुकीचा प्रचार भरात असताना अलाहाबाद विद्यापीठाच्या वसतिगृहात त्यांना पोलिसांच्या लाठ्या झेलाव्या लागत आहेत. त्यांच्या रोषाचे कारण आहे तरी काय ? रेल्वेतील कनिष्ठ पदांच्या जवळपास सात लाख जागा आहेत. तुलनेत कमी शिक्षण असलेल्यांना या जागांसाठी अर्ज करता येणार आहेत. यातील प्रत्येक एका जागेसाठी ३५४ जणांनी अर्ज केले आहेत. याचाच अर्थ एकाचा विजय झाल्यास ३५३ जणांचा पराभव निश्चित आहे. या शक्यतेवर कोण नाराज होणार नाही ? आणि ही काही अखिल भारतीय स्तरावरील भरती नाही, हे विशेष.

या साऱ्या नोकऱ्या कारकुनी आणि बिगरतांत्रिक कामासाठीच्या आहेत. उत्तरप्रदेश टिचर्स एन्ट्रन्स एक्झामबाबतही अशीच परिस्थिती आहे. या भरतीच्या विरोधात असलेल्या असंतोषातही काही गोष्टी लपल्या आहेत. कमी शैक्षणिक पात्रतेसाठीच्या जागांसाठी उत्तम शैक्षणिक पात्रता असलेल्यांचा प्राधान्याने विचार होत आहे, हा या प्रक्रियेवरचा प्रमुख आक्षेप आहे. एखाद्या जागेसाठी किमान शैक्षणिक पात्रता निश्चित केली की कमी शिकलेले आणि भरपूर शिकलेले एकाच पातळीवर येतात असा याचा अर्थ. हेल्पर आणि सुरक्षा रक्षक या जागांसाठी कमी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अपेक्षित असताना इंजिनिअर, एमबीए झालेले, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आणि डॉक्टरेट झालेले यांचेही अर्ज आले आहेत. हा सारा प्रकार देशातील बेरोजगारीची भीषणता दाखविणारा आहे.

राष्ट्र वा संस्कृतीचे भवितव्य कोण एकदोन निवडणुका जिंकतो यावर ठरत नाही तर युवक काय विचार करतो यावर ठरते. भारतातल्या कोणत्याही छोट्या गावात वा निमशहरी भागात फेरफटका मारून बघा. तुम्हाला चहा वा पानाच्या टपरीवर चकाट्या पिटणारे युवक दिसतील कारण त्यांच्याजवळ कोणतेही काम नाही. यातील अनेक जण तर कॅरम, पत्ते खेळत नाहीत वा एकमेकांशी बोलतही नाहीत. ते त्यांचा मोबाईल बघत असतात. रोजगार, मिळकत, स्वाभिमान याच्यावर त्यांच्याजवळ मोफत डाटाचा उतारा आहे. यातून त्यांना मनोरंजन, प्रचार, पोर्नोग्राफी आणि टाइमपास मिळतो. हा नवा केक ते सध्या खात आहेत. पण सामुहिक निराशेचा बांध जेव्हा फुटेल तेव्हा ते भारताला परवडणार नाही. तेव्हा कोणी कोणती निवडणूक जिंकली याचे महत्त्व उरणार नाही. हाताला काम नसलेले बेरोजगारांचे तांडे हा राष्ट्रीय सुरक्षा आणि स्थिरतेपुढील मोठा धोका आहे.

(अनुवाद:किशोर जामकर)

सात दशकांत स्थितीत बदल नाही

पदवीधर युवकांकडे काम नसल्यानेच त्यांना कनिष्ठ पदांसाठी अर्ज करावे लागले, हेही वास्तव यानिमित्ताने पुढे आले आहे. अशा स्थितीत जिना वा सरदार पटेल असा पर्याय तुम्ही ठेवता तेव्हा या दोन्ही नेत्यांचा मृत्यू झाला तेव्हा तुमच्या ९५ टक्के मतदारांचा जन्मही झाला नव्हता याचा विसर पडण्यासारखे आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर ज्यांच्याजवळ गरिबीमुळे ब्रेड विकत घेऊन खायची क्षमता नाही त्यांना केक खा, असे सांगण्यासारखे आहे. गेल्या ७० वर्षांत परिस्थिती बदललेली नाही. आजोबा, वडील यांच्याप्रमाणे तुम्हीही बेरोजगार आहात, हेही तुम्ही युवकांना वेगळ्या पद्धतीने सांगत आहात. पण मागच्या पिढीने नेतृत्व निवडण्यात केलेली चूक सुधारण्याची संधी या पिढीला निश्चितच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.