थेट नेतृत्वाला आव्हान देत ९ मार्च २००६ मध्ये राज ठाकरे यांना शिवसेनेतून बाहेर पडत मनसेचा सवता सुभा उभा केला.
महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी राजकारणाची थेट विभागणी झाली असताना १६ वर्ष पूर्ण करणारी ‘मनसे’ ताकद वाढविण्यासाठी काय प्रयत्न करते, यावर बरेच काही अवलंबून असेल.
थेट नेतृत्वाला आव्हान देत ९ मार्च २००६ मध्ये राज ठाकरे यांना शिवसेनेतून बाहेर पडत मनसेचा सवता सुभा उभा केला. राजकीय आणि कौटुंबिकदृष्ट्याही अवघड असणाऱ्या या निर्णयाचे राज्यातील युवकांनी उत्स्फूर्त स्वागत केले होते. शिवसेनेतील काही नेते आणि युवा कार्यकर्ते यांची फळी तयार करून मनसे राज्यभरात पोहोचविण्यात राज ठाकरे यशस्वी ठरले. या नव्या दमाच्या नेतृत्वाच्या पक्षाकडून युवा वर्गाच्या मोठ्या अपेक्षा होत्या. त्यामुळेच २००९च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे १३ आमदार विजयी झाले. हे यश मोठे होते. पुणे, मुंबई, नाशिक व ठाण्यातून हे यश मिळाले होते. या शहरी भागात पक्षाचा प्रभाव चांगला राहिल्याने २०१२ च्या महापालिका निवडणुकीत मुंबईत २८, पुण्यात २९ तर नाशिकमध्ये ४० नगरसेवक निवडून आले.
नाशिकमध्ये ‘मनसे’ला सत्ता मिळाली. पुण्यात सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून ‘मनसे’चा उदय झाला. पुण्यात ‘मनसे’च्या माध्यमातून बहुसंख्य नवे चेहरे महापालिकेत आले. मात्र, यातील काही नगरसेवकांनी पक्षापेक्षा स्ववाढीवर भर दिला. नेतृत्वाचेही पुण्याकडे लक्ष राहिले नाही. हे चित्र राज्यभर राहिले. परिणामी २००९मध्ये १३ आमदार असणारी मनसे २०१४ मध्ये एका आमदारापर्यंत आली. २०१७च्या महापालिका निवडणुकीत कामगिरी आणखी घसरली. मुंबईत फक्त एक, पुण्यात २९ वरुन दोन, नाशिकमध्ये सत्ता असताना पाच जागांवर समाधान मानावे लागले.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला सावरता आले नाही. पक्षाचा एकच आमदार विधानसभेत जाऊ शकला. या परिस्थितीत अद्याप फारशी सुधारणा झाली नाही. २०१४ मध्ये पक्षाने महाराष्ट्राची ‘ब्ल्यू प्रिंट’ जाहीर केली, पण त्याची कोणत्याच पातळीवर अंमलबजावणी होऊ शकली नाही. आज पक्षाचा कार्यकर्ता विस्कळीत झाला आहे. सुरुवातीच्या काळातील अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आहे. मराठी पाट्या, परप्रांतीयांना विरोध यापुढे जाऊन पक्षाने मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावे, आपल्या धोरणांमध्ये सातत्य ठेवावे, संघटनाबांधणीवर भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबईप्रमाणेच पुणे, ठाणे, नाशिक अशा मनसेचा प्रभाव असलेल्या भागांत गेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसला होता. यावेळी मात्र राज ठाकरे यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली असून, या प्रमुख शहरांमध्ये तेथील संघटनात्मक बांधणीवर वैयक्तिक लक्ष घातले आहे. पुण्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते सतत बैठका घेत आहेत. शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्याने पक्ष बांधणीवर भर दिला आहे. त्याचमुळे प्रथमच मुंबईच्या बाहेर पुण्यात पक्षाचा वर्धापन दिन साजरा होत आहे. गेल्या महापालिका निवडणुकांपेक्षा यावेळचे चित्र वेगळे आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार असून, भारतीय जनता पक्ष विरोधात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवली गेल्यास मनसेने भाजपसोबत युती करावी, अशी मागणी होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तूर्तास तरी स्वबळाचा पवित्रा घेतला आहे. मात्र वर्धापनदिन मेळाव्यात त्यासंदर्भात काही घोषणा केली जाणार का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष असेल. काँग्रेसपासून फारकत घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सतत सत्तेत राहिला आहे. राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर शिवसेना एकदा युतीत तर सध्या मुख्यमंत्री म्हणून सत्तेत आहे. या पार्श्वभूमीवर ‘मनसे’ला अस्तित्वासाठी झगडावे लागेल. हे निवडणुकीचे वर्ष त्यांच्यासाठी चांगली सुरुवात ठरु शकेल. त्यादृष्टीने आजचा वर्धापनदिन महत्त्वाचा असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.